व्हीएस न्युज - पुण्यातील २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अंधेरीचा रहिवाशी असून लग्नास नकार दिल्याने त्याने तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवलं होतं. तरुणीवर शारिरीक अत्याचार करताना आरोपी तरुणाने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. अखेर अडीच महिन्यांनी आरोपीच्या तावडीतून पळ काढण्यात तरुणीला यश मिळालं. तेथून पळ काढताच तरुणीने पुण्यातील आपल्या बहिणीचं घर गाठलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानतंर पोलिसांनी कारवाई करत आरोपी सय्यद आमीर हुसेन याला त्याच्या अंधेरीमधील घरातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता तिला गोड पदार्थातून गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. तरुणी एका वर्षांपूर्वी गोव्यातून पुण्याला शिफ्ट झाली होती. ‘जेव्हा तरुणी आरोपी हुसेनच्या घरी गेली तेव्हा तिला गोड पदार्थ खाण्यासाठी देण्यात आला. त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं होतं. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आरोपी हुसेनने तिला मोबाइलमध्ये बलात्कार करतानाचा शूट केलेला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केलं.
सुरुवातीला त्याने ३० जूनपर्यंत तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवलं. यादरम्यान तो सतत तरुणीवर बलात्कार करत होता. इतकंच नाही तर चामडी पट्ट्याने मारहाणही करत होता. त्याने तरुणीचं डेबिट कार्ड काढून घेत त्यातून ४० हजार रुपये काढून घेतले होते’, अशी माहिती ओशिवारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत ३० जूनला आरोपी हुसेनने आपल्या सोडून दिल्याचं सांगितलं आहे. ‘मात्र यादरम्यान तो सतत माझा पाठलाग करत होता. ३ जूनला त्याने फोन करुन घरी आली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. ३ जुलैला त्याने मला पुन्हा त्याच्या घरी जाण्यास भाग पाडलं’, असं तरुणीने तक्रारीत सांगितलं आहे.
आरोपी तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने नकार दिला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘तरुणीने सांगितल्यानुसार आरोपी तरुण तिला कपड्याच्या सहाय्याने बांधून लैंगिक अत्याचार करत होता. जर लग्न केलं नाही तर तुला देहविक्रीय करणाऱ्यांकडे विकू अशी धमकीही दिली होती’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी हुसेनने आपण याआधी अशाच प्रकारे दोन तरुणींना टार्गेट केलं होतं असं तरुणीला सांगितल्यांचं पोलिसांनी सांगितलं आहे.
२५ ऑगस्ट रोजी तरुणी आरोपी हुसेनच्या घरातून पळ काढण्यात यशस्वी झाली. पळ काढल्यानंतर तरुणीने पुण्यातील बहिणीचं घर गाठलं. नातेवाईकांनी तिला कोथरुड पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. ‘प्रकरण ओशिवारा पोलिसांकडे सोपवण्यात आलं असून ते तपास करत आहेत’, अशी माहिती कोथरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे यांनी दिली आहे.
आरोपी हुसेनला अंधेरी न्यायालयात हजर केलं असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तरुणीला देण्यात आलेलं गुंगीचं औषध तसंच व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेला मोबाइल मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
व्हीएस न्युज - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत असे वक्तव्य पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.
बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना महामार्गावरील ‘खड्ड्यासोबत सेल्फी’ काढून पाठविला आहे. जसे रात्रीचा दौरा करुन कोकणातील लोकांना वेड्यात काढलं तसे पुणेकरांना काढता येणार नाही. मुंबईला जाताना पुणे मार्गाने जावे लागते त्यामुळे ‘येड घेऊन पेडगावला जाण्याचा’ तुमचा स्वभाव आम्हाला चालणार नाही. तारीख पे तारीख देवून लोकांना किती दिवस वेड्यात काढणार एक दिवस जनताच तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा नाना काटे यांनी दिला.
शुक्रवारी मुंबई–गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी करण्यासाठी बांधकाम चंद्रकांत पाटील गेले होते. परंतु रात्रीच्या वेळी बांधकाम मंत्री आल्याने त्यांच्या निदर्शनास रस्त्यावर खड्डे दिसलेच नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
त्यांनी रात्रीच्या वेळी रस्त्याची पाहणी केल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण कळलं नाही. या मार्गावर रात्री उशिराने दाखल झाल्याने बांधकाममंत्री यांची सफरही आलिशान वाहनातुनच घडली. बांधकाममंत्र्यांचा महामार्ग पाहणीचा दौऱ्यामुळे त्याठिकाणच्या प्रवासी व वाहन चालक यांना दिलासा मिळेल अशी आशा होती .
परंतु त्यांनी रात्रीची रस्त्याची पाहणी ही एकूणच बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाला पाठिंबा देण्यासाठी होती अशी चर्चा कोकणातील नागरिकांत सुरु झाली आहे. सर्व महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे तशीच अवस्था मुंबई-बेंगलोर महामार्गवरती आहे. मुंबई-गोवा महामार्गवरती रात्री दौरा करुन काहीच खड्डे दिसले नाहीत त्यांची पुनरावृत्ती पुणेकरांच्या बाबतीत होवू नये म्हणून कोल्हापूर-मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी दौरा दिवसा करण्याची मागणी नाना काटे यांनी केली आहे
व्हीएस न्युज - घराशेजारी राहणाऱ्या महिलेने सतत होणाऱ्या भांडणाच्या रागातून महिलेने तरुणावर कुऱ्हाडीने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री साडे सातच्या सुमारास पिंपरी मधील विठ्ठलनगर येथे घडली.
सविता जाधव असे वार केलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रविण भागवत (वय 30, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि प्रवीण विठ्ठलनगर येथे शेजारी-शेजारी राहतात. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून वारंवार भांडण होत होते. दोन दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर सोमवारी दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा वाढला आणि सविता हिने प्रवीणला ठार मारण्याचा उद्देशाने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये प्रवीण गंभीर जखमी झाला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
सरावासाठी खेळाडूंना इनडोअर स्टेडियम ची गरज - केदार जाधव.
व्हीएस न्युज - भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव यांनी सोमवारी मोदीबाग पुणे येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री/माजी आय. सी. सी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
त्यावेळी 'एशिया कप' मध्ये केदार ची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल शरद पवार यांनी त्याचे अभिनंदन करत त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यादरम्यान केदार जाधव यांनी पावसाळ्यात क्रिकेटपटूंना होणाऱ्या गैरसोयी बद्दल माहिती दिली. तसेच सरावासाठी खेळाडूंना इनडोअर स्टेडियम ची गरज असल्याचे ही सांगितले. मुबई क्रिकेट संघटना, बी.सी.सी.आय आणि आय. सी. सी मध्ये आजही शरद पवार यांचा जम कायम आहे म्हणुनच पवार साहेबांनी या समस्यांकडे लक्ष घालावे असी विनंती केदार जाधव यांनी यावेळी केली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इम्रानभाई शेख यांनी , पिंपरी चिंचवड च्या क्रिकेट खेळाडूंना पी.डी.सी.ए मध्ये दुय्यम स्थान मिळत असून पिंपरी चिंचवडची लोकसंख्या लक्षात घेता पिंपरी चिंचवड उदयोन्मुख खेळाडूंसाठी एम.सी.ए ईनव्हिटेस्नल लिग साठी स्वतंत्र संघ तयार करण्याची मागणी शरद पवारांकडे केली, व तोपर्यंत एम.सी.ए च्या वतीने आयोजित आमंत्रीत सामन्यांमध्ये पी.डी.सी.ए च्या संघामध्ये पिंपरी चिंचवड च्या क्रिकेट खेळाडूंना समान हक्क मिळावा अशी मागणी केली व पिंपरी चिंचवड साठी नवीन क्लब रेजिस्टर करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ सिनेट सदस्य मा. अभिषेक बोके,हेमंत ऊभे,निलेश पुजारी,विक्की वाघे जावेद बाबर शेख हे उपस्थित होते.
व्हीएस न्युज - थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर सोडले आहे.
प्रभाग क्रमांक 24 थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुक्करांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून डुक्करांच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन दिले होते. त्यांना डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
थेरगाव परिसरात 200 ते 300 डुक्करे आहेत. त्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त असून पालिका डुक्करांचा बंदोबस्त करत नाही. त्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांना भेट दिल्याचे, नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या एकेरीतील वादातून पिंपरी-चिंचवड पालिकेतील आक्रमक स्वभावाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आता अधिक आक्रमक झाले आहेत. भाजपने अविश्वास ठराव आणलेले नाशिक पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे तुम्हाला नको असतील, तर आम्हाला द्या, असा आहेर त्यांनी भाजपला दिला आहे.याव्दारे त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या कथित भ्रष्टाचाराला रोख लावून आपला अपमान करणाऱ्या आयुक्तांना धडा शिकविण्याचा दुहेरी हेतू यामागे साने याचा असल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत हर्डीकर व साने यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याच दिवशी साने यांनी हर्डीकर यांच्यावर सडकून टीकाही केली होती. दरम्यान, मुंडे प्रकरण समोर आले. नाशिक पालिकेत सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दिला होता.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तो तूर्त टळला. हा धागा पकडून त्यांना मुंडे नको असतील, तर आम्हाला ते द्या, अशी मागणी साने यांनी केली आहे. याव्दारे भाजपला आपले भय ना भ्रष्टाचार या घोषणेनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये कारभार करता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच हर्डीकर यांनी त्यांना अज्ञानी संबोधल्याचा वचपा काढून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. मुंडेंना पिंपरीत आणण्याची मागणी करून त्यांनी वादग्रस्त हर्डीकर यांच्या बदलीचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. वेळ पडली,तर मुख्यमंत्र्यांकडे ती सुद्धा करू, असे ते सरकारनामाशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, आयुक्तांबरोबर त्यांचे सहकारी अधिकाऱ्यांनाही साने यांनी दुसरीकडे लक्ष्य केले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा चुकीचा डीपीआर बनवून पालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोचविणारे सह शहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांना निलंबित करून त्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याजोडीने पालिका गैरकारभाराविरुद्ध या ना त्या प्रकारे आवाज उठविण्याचे त्यांचे काम सुरूच असून दररोज एक दोन प्रकरणात ते आयुक्तांना निवेदन देत आहेत. त्यामुळेच वैतागलेल्या आयुक्तांनी साने यांचा भर बैठकीत परवा अपमान केल्याचे समजते.
व्हीएस न्युज - चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य आरोपी अदयाप फरार होता. फरार असलेल्या मुख्य आरोपीला चिंचवड पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातून अटक केली.
रणजित बाबू चव्हाण (वय 23, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. यापूर्वी चिंचवड पोलिसांनी आकाश लांडगे खून प्रकरणात स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लांडगे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी रणजित घटना घडल्यापासून फरार होता. चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. रणजित आरसोली, ता. भूम, जि. उस्मानाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने आरसोली या गावात जाऊन सापळा रचून रणजितला ताब्यात घेतले. रणजित याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ या पोलीस ठाण्यातील फरार आरोपी होता. यावरून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक आखाडे, शेलार, शिरसाठ, पोलीस शिपाई डोके, आंबटवार यांच्या पथकाने केली.
काय आहे रायबा उर्फ आकाश लांडगे प्रकरण ?
आकाश लांडगे आणि रणजित बाबू चव्हाण या तरुणाची एप्रिल-मे 2018 मध्ये भांडणे झाली. त्या रागातून रणजित याने त्याच्या स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, सोन्या वराडे आणि प्रफुल्ल ढोकणे या मित्रांच्या मदतीने आकाशचा चाफेकर चौकात मंगळवार (दि. 30) रोजी आकाशला अडवून कोयता आणि रॉडने पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि. 31 मे) पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला.
रणजित चव्हाण याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मयत आकाश देखील गुन्हेगार होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 395,427 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याबाबतचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात पाठविले होते.
व्हीएस न्युज - पुण्यातील लुल्लानगर चाैकात सीएनजी गॅसच्या गळतीमुळे एका रिक्षाला भर रस्त्यात अचानक आग लागली. या अागीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. सुदैवाने या अागीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. ही घटना रविवारी दुपारी अडीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नासीर बागवान (वय ४०) असे रिक्षाचालकाचे नाव अाहे. नासीर हा रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरुन बिबवेवाडीकडून काेंढव्याकडे जात हाेता. लुल्लानगर येथील चाैकातील सिग्नलला ताे थांबलेला असताना अचानक रिक्षातून धूर येत असल्याचे त्याच्या लक्षात अाले. ताे तातडीने रिक्षाच्या बाहेर पडला अाणि बाजूला जाऊन उभा राहिला. अवघ्या काही मिनिटात अागीने रिक्षाला चारही बाजूने घेरले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच काैंढवा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या दाेन मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. या अागीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे.
व्हीएस न्युज - दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (1 सप्टेंबर) होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी यावेळी दिली. यावेळी मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, चारुशिला जोशी, दिगंबर चिंचवडे, अतुल आचार्य, नितीन समगीर, महाद्रंग वाघेरे, बंटी ठोकळ, उत्तम गंगावणे आदी उपस्थित होते.
झिंजुर्डे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ, कडोलकर कॉलनी येथे शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिवंगत कामगार नेते यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, अध्यक्ष हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
शरद राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. एका गरीब कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
शरद राव यांचे दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय-हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटलेले, प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका-परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभियंत्यांची दैदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष लढ्याचे भिष्म पितामह विख्यात कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ॲड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या कार्यक्रमास कामगारांनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज – कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) पहाटे ताजे गावात घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरु आहे.
किरण बाळू कोरडे (वय 25, रा. सज्जनवाडी, ताजे, मावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ज्ञानेश्वर केदारी, बाळू शंकर केदारी, नितीन अर्जुन केदारी, बबन विठ्ठल केदारी, उमेश चंद्रकांत केदारी (सर्व रा. ताजे, मावळ) व काळू बाळू पिंपळे (रा. पिंपळोली, मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण पिंपरी येथील एका कॉफी शॉपमध्ये काम करतो. शनिवारी (दि. 1) रात्री उशिरा काम संपवून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो सज्जनवाडी येथील आपल्या घरी जात होता. किरण ताजे गावातील काशिनाथ केदारी यांच्या घरासमोर सर्व आरोपी थांबले होते. आरोपींनी किरणला थांबवून त्याच्या डोक्यात, चेह-यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. हा संपूर्ण प्रकार किरण याचा चुलत भाऊ अमोल कोरडे याने पाहिला. त्याने तात्काळ किरण याचा भाऊ सोमनाथ याला फोनवरून कळविले. सोमनाथ तात्काळ घटनास्थळी आला. त्यावेळी किरण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. सोमनाथ याने किरण याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. कामशेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महामेट्रोचे काम वेगात सुरू असून कासारवाडी येथे मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शहरात पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी मार्ग उखडून पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी महामहामार्गावर ठिक-ठिकाणी खोदाई करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे मेट्रोचे सुरू असलेले कामही अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश निकम यांनी निदर्शनास आणून दिली आहे. कासारवाडी येथील पिलरमध्ये सिमेंट अर्धवटपणे भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना घडल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी जबाबदार, असेही साने यांनी म्हटले आहे.
भाजपचे पदाधिकारी फक्त स्वतःला किती कामाचे ठेके मिळतील याकडेच लक्ष देत असून कामाच्या दर्जाकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे शहरातील आतापर्यत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करुन घेण्यात यावे. यामध्ये ठेकेदार दोषी आढळला तर त्वरीत त्याचे काम थाबंवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
व्हीएस न्युज - वाहतूक कोंडीमुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्या काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांमुळे कंपन्या स्थलांतर करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातून जाऊन हिंजवडीत काम करायचं म्हणजे आठ तासांच्या शिफ्टचा निम्मा वेळ म्हणजे साडे तीन ते चार तास फक्त प्रवासात जातात. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कंपन्यांचे सेमिनार किंवा इतर कार्यक्रमही हिंजवडीत घेता येत नाहीत. या कंपन्या आपले कार्यक्रम इतर शहरांमध्ये आयोजित करतात. कारण, वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणं शक्य होत नाही.
गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या अनुक्रमे बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित झाल्या होत्या. त्यातच आता आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतरित झाल्या आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केले आहे.
वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. छोट्या कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचं स्थलांतर हा रोजगाराच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002