व्हीएस न्यूज – उत्तर भारतीय भाविकांनी छट महापूजेच्या तिसऱ्या दिनी मावळत्या सुर्याला अर्ध्य अर्पित करून छटव्रताचा आणखी एक टप्पा पूर्ण केला. उद्योगनगरीत खूप मोठ्या संख्येने बिहार आणि उत्तरप्रदेशचे नागरिक वास्तव्यास असून गुरुवारी शहरातील वेगवेगळ्या घाटांवर आणि तलावांवर हजारोंच्या संख्येने भाविक एकत्रित झाले. पिंपरी, चिंचवड, मोशी, निगडी, वाकड, हिंजवडी अशा कित्येक ठिकाणी भाविकांनी आपल्या आराध्याची आराधना करून कुटुंबियांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना केली.
दुपारी चारपासून शहरातील वेगवेगळ्या घाटांवर श्रद्धाळुंची गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. सुप, हंगामी फळे व पूजेचे इतर साहित्य घेऊन महिला घाटावर पोहचल्या. आपल्या पूजेचे स्थान स्वच्छ असावे यासाठी श्रद्धाळुंनी आधीच घाटाची आणि नदीची स्वच्छता केली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिथे जिथे पूजा होणार आहे त्या सर्व घाट आणि तलावांची भाविक आणि छट पूजा समितीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली होती. स्थानिक जनप्रतिनिधींनी देखील उत्तर भारतीय बांधवांची सहायता केली आणि त्यांच्या या धार्मिक कार्यात सहभाग ही घेतला. महापालिकेच्या वतीने देखील काही घाटांची आणि तलावांची स्वच्छता करण्यात आली होती.
मोशी येथील टोलनाक्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने काशीतील प्रसिद्ध गंगारती प्रमाणेच येथे ही भव्य आरती करण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की,छटपूजेच्या निमित्ताने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, नगरसेविका मंदा आल्हाट, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे,प्रा. राधेश्यान मिश्रा उपस्थित होते. या सर्वांचा लालबाबू गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छटपूजेचे महत्व सांगताना लालबाबू म्हणाले की, लोकांच्या श्रध्देचा आणि आस्थेचे हे महापर्व आहे. यात उत्तम आरोग्य, परस्परांत प्रेम, सदभावनेचे समर्पण असते. या सणाच्या निमित्ताने सर्व सृष्टीचा निर्माता सूर्यदेवतेचे पूजन केले जाते. सूर्याबरोबरच सर्व प्राणी मात्रांचे जीवन सुखी सृध्द करणाऱ्या नदीचे ही महात्म्य आहे. नदी सर्वांचे जीवन समृध्द करते, यामुळे छठपूजा नदीच्या पाण्यात, घाटावरच साजरी केली जाते. आयोजन यशस्वी करण्यासाठी अक्रम शेख,प्रमोद गुप्ता, शामबाबू गुप्ता, सुनील सिंग, देंवेद्र पासवान, रामेश्वर गौड, रोहित प्रसाद, आदित्यकुमार, संजय विश्वकर्मा, उमेश सिंग, राजकुमार गुप्ता, मुन्ना सिंग, सतीश सिंग आदींनी घाटांवर आदींनी विशेष परिश्रम केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002