व्हीएस न्यूज – केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा संमत केल्यानंतर त्यासाठी आवश्यक नियमावली राज्य सरकारने केलीच नाही. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू ठामपणे मांडलीच नाही. म्हणूनच बैलगाडा शर्यतबंदीचा जू पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रति भाजप सरकारची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी येत्या शनिवारी (दि. 28) राज्यव्यापी आंदोलन करणार असून राज्यातील हजारो शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
भोसरी येथे बैलगाडा शर्यतीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार आढळराव पाटील म्हणाले, जलीकुट्टीबाबत तमीळनाडूतील जनतेने आंदोलन केले. तेथील मुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांनी दिल्लीत तळ ठोकून त्याबाबतचा वटहुकूम राष्ट्रपतींकडून मंजूर करून आणला. सहा महिन्यात कर्नाटकातही बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. परंतु, बैलगाडा शर्यतीचा कायदा संमत झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री महादेव जानकर बैलगाडीत बसून केवळ फोटोसेशनमध्येच रमले. परंतु, शर्यतीसाठी नियमावली केली नाही की राज्य सरकारतर्फे न्यायालयात लढले नाहीत. त्यामुळे बैलगाडा शर्यत बंदीचा जू पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.
कायदा संमत झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियमावली राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली. आज पेटाच्या विरोधात सत्तेत असणारे ओरडत आहेत. मात्र, पेटा इतकेच फडणवीसांचे सरकार गुन्हेगार आहे. कारण, महाराष्ट्र ऍनिमल वेल्फेअर असोशिएशन या शासकीय संघटनेवर ऍड. जयसिंन्हा हा पेटाचाच व्यक्ती अशासकीय संचालक म्हणून काम करतो आहे, जो या बैलगाडा शर्यतीविषयी राज्य सरकारच्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतो आहे. राज्य सरकारची ही भूमिका दुहेरीपणाचीच आणि दुटप्पी म्हणावी लागेल.
येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये बैलगाडा शर्यतीबाबत विधेयक आणल्यास ते मंजूर होईल आणि संपूर्ण देशातील बैलगाडाप्रेमी, शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कारण, लोकसभेने विधेयक मंजूर केल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयही त्याला विरोध करणार आहे. मात्र, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे तसा शब्द टाकला पाहिजे. त्याचप्रमाणे ऍड. जयसिन्हा यांना हटवावे, पेटाला विदेशातून मिळणाऱ्या पैंडीगची इर्डीतर्पेै चौकशी करावी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ताकदीने लढण्यासाठी दिग्गज वकील द्यावेत, अशी मागणीही आढळराव पाटील यांनी केली.
चाकणमध्ये पक्षविरहीत आंदोलन
शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि बैलगाडा चालक-मालकांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी येत्या शनिवारी (दि. 28) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे, तसेच आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे आदींना पत्र दिले आहे. राज्यभरातून सुमारे सोळा जिल्ह्यातील अंदाजे चाळीस ते पन्नास हजार शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे या पक्षविरहीत आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. श्रेयवादामध्ये बैलगाडा शर्यतीचा प्रश्न अडकून राहू नये. यासाठी सर्वच पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002