व्हीएस न्यूज – लाल महाल येथून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यात पुण्यात दंगल घडवण्यासंदर्भात झालेल्या मोबाईल संवादावरुन दाखल करण्यात आलेला खटला मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या परवानगीने न्यायालयाने हा खटला मागे घेतला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी.गोटे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
लालमहल येथून 27 डिसेंबर 2010 रोजी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला होता. त्यावेळी भाजप, शिवसेना आणि मनसे पक्षातर्फे मोर्चा काढून प्रक्षोभक भाषणे केली होती. या पक्षांनी 28 डिसेंबर 2010 रोजी पुणे बंदचे अवाहन केले होते. विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच फरासखाना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी 28 डिसेंबर रोजी पुकारलेल्या पुणे बंद दरम्यान, शिवसेना आणि भाजपा हे आक्रमक आहेत. त्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याबाबतचा गोपनीय अहवाल विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिला होता.
त्यानंतर शहरात शांतता राहण्याच्या दृष्टीकोनातून तसेच स्फोटक परिस्थिती उद्भवू नये यासाठी 27 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी डॉ. गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्यात झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले हाते. हे संभाषण आक्षेपार्ह होते. त्या संभाषणामध्ये जाळपोळ करणे, दगडफेक करणे, रस्ते अडविणे, दहशत पसरविण, असा उल्लेख होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे आणि नार्वेकर यांनी अटकपूर्व जामिन मिळविला होता.
त्यानंतर या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले. फौजदारी प्रक्रीया दंड संहितेच्या कलम 321 नुसार राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीने 26 जुलै 2017 रोजी हा खटला मागे घेण्याचा आदेश दिला होता. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने 28 जुलै 2017 रोजी खटला मागे घेण्यासंदर्भात पत्रक काढण्यात आले होते. त्यानंतर आज हा खटला मागे घेण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002