व्हीएस न्यूज - बालशिक्षणासाठी अंगणवाडी, बालवाडी ऐवजी खेळवाडी, शिशुवाडी विकसीत केली पाहिजे. वाढत्या वयाबरोबरच परावलंबीत्वाकडून स्वावलंबीत्वाकडे वाटचाल होत असते. मुलांना सामाजिक स्वावलंबनाचे धडे समजदार प्रौढांकडून पालकांकडून मिळणे आवश्यक आहे. आकलन करुन घेण्याचा मार्ग हा नेहमीच कृतिशील स्वयंशिक्षणातून पुढे जातो. योग्य वेळी, योग्य वयाशी सुसंगत अशा कृतिशील अनुभवातून मुले ज्ञान आत्मसात करतात. तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही असा मधला मार्ग शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ बाल शिक्षण तंज्ञ व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्य अधिवेशन आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात शुक्रवारी (दि. 27)बीजभाषण करताना पानसे बोलत होते. यावेळी उद्घाटक एसएनडीटी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु वसूधा कामत, अध्यक्षा अलका बियाणी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, डॉ. दिनेश नेहेते, मेघना बाक्रे, नझीर जमादार, विशाखा देशपांडे, नीता सणस आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
पानसे म्हणाले की, टीव्ही, मोबाईल, संगणक या नविन आकर्षक तंत्रज्ञानाविषयी समाजातील सर्वच थरात खूप मोठे आकर्षण आहे. बालशिक्षणाचे शास्त्र आणि या नव्या तंत्रज्ञानाची उपयुक्ततता याची सांगड कशी घालायची हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. बालशिक्षण म्हणजे शालेयपुर्व वय तीन ते सहा या वयोगटातील मुले. त्यांच्यासाठी अंगणवाडी, बालवाडी ऐवजी खेळवाडी, शिशुवाडी विकसीत केली पाहिजे. तसा अभ्यासक्रम बालशिक्षण परिषदेने तयार केला आहे. सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे शारीरिक व भावनिक विकास, सुक्ष्म व मोठ्या स्नायुंचा विकास, भावनिक व भाषेचा विकास अशा विविध क्षमतांच्या विकासाचे वय असते. या काळात वेगाने मेंदूमध्ये जडणघडण होत असते. त्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना साजेसे अनुभव त्यांना सातत्याने मिळावे लागतात. वाढत्या वयाबरोबरच परावलंबीत्वाकडून स्वावलंबीत्वाकडे वाटचाल होत असते. त्यासाठी त्याला सामाजिक स्वावलंबनाचे धडे समजदार प्रौढांकडून पालकांकडून मिळणे आवश्यक आहे. मावळत्या शतकाने शास्त्रज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विकास आणि यामुळे बदललेली जीवनशैली आपल्याला बहाल केली आहे. त्यामुळे साहजिकच या तिन्हींची सांगड घालून बालशिक्षणाची नवी शास्त्रीय मांडणी करणे गरजेचे आहे. यामध्ये बालकस्नेही दृष्टीकोण, बालविकासयोग्य दृष्टीकोण, भाविकाल दृष्टीकोण आणि युक्त तंत्रज्ञान दृष्टीकोण ठेवून ‘बालशिक्षण तंत्र व तंत्रज्ञान’ मध्यवर्ती ठेवून काम केले पाहिजे. बालशिक्षणात मेंदूविकासाला पूरक शिक्षण, अनुभव प्राप्ती आणि कृतिशील स्वयंम शिक्षणाचे अनुभव वयाला साजेसे असले पाहिजे. मानवी मेंदू हा उत्क्रांतिक्षम आहेत. भाषा एक त्याचे उदाहरण आहे. भाषा ही एक सामाजिक गोष्ट मानवी मेंदूत जाऊन बसली आहे. तंत्रज्ञानाच्या वर्षांनुवर्ष सरावनंतर तंत्रज्ञानही मेंदूमध्ये जागा पटकावून बसेल, आणि मग तंत्रज्ञानाचा वापरही मेंदू नैसर्गिक म्हणून स्विकारेल. त्याला शेंकडो वर्ष लागतील. मेंदू हा पंचेद्रियांच्या सहाय्याने शिकत असतानाही ‘पाहून शिकणे’ म्हणजे ‘दृष्टीने शिकणे’ मेंदूला अधिक प्रभावी वाटते. त्यामुळे टीव्ही, मोबाईल, संगणक या साधनांचा बालशिक्षणासाठी प्रभावी उपयोग होऊ शकतो मात्र याची मोठी मर्यादा आहे. आकलन करुन घेण्याचा मार्ग हा नेहमीच कृतिशील स्वयंशिक्षणातून पुढे जातो. योग्य वेळी, योग्य वयाशी सुसंगत अशा कृतिशील अनुभवातून मुले ज्ञान आत्मसात करतात. तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही असा मधला मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञान हे लहान मुलांच्या बाबतीत मेंदू घातक ठरु नये. मुलांना मिळणा-या वास्तव अनुभवाची जागा तंत्रज्ञानाने घेऊ नये. तसेच तंत्रज्ञानाचे स्वरुप शक्य तेवढे कृतिशील आणि विशिष्ट वयाला साजेसे असावे. असेही पानसे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान’ ही अधिवेशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. स्वागत प्रशांत शितोळे, सुत्रसंचालन सुप्रिया अत्रे आणि आभार मेघना बाक्रे यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002