व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महिनाभरात बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
शहरातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार बारणे यांनी उद्योजकांच्या विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी बारणे यांनी वरील घोषणा केली. या बैठकीत पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक प्रमोद राणे, सुरेश म्हेत्रे, रंगनाथ गोडगे पाटील, जयंत कड यांनी सरकारकडून उद्योजकांना असलेल्या अपेक्षा मांडल्या. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या योजना, जीएसटी करप्रणाली, शासनाची उद्योग व कामगारविषयक धोरणे यावपर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
खासदार बारणे म्हणाले की, शहराच्या विकासात उद्योगांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळे समन्वयातून उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्य शासन व केंद्र शासनाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना महिनाभरात शहरात बोलवून त्यांच्याबरोबर उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात येईल. आवश्यकता असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबरही उद्योजकांची बैठक आयोजित केली जाईल. जीएसटी अंमलबजावणीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर शहरातील उद्योजकांची बैठक घडवून आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर आपण यापूर्वीत संसदेतही आवाज उठवला आहे, असे सांगून बारणे म्हणाले की, शासन, प्रशासन व उद्योजक यांच्या समन्वयातून आपल्याला मतदारसंघाचा विकास घडवायचा आहे. उद्योगांचे प्रश्न केंद्र सारकारच्या विविध मंत्रालयांशी संबंधित आहे. त्या मंत्रालयांकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. नवी मुंबई येथील नियोजित विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहचता येईल, अशा रस्त्याचे नियोजन सुरू असल्याने उद्योजकांनी काळजी करू नये, असा दिलासा ही बारणे यांनी दिला. राष्ट्रीयीकृत बँकांकडून वित्तपुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक तो समन्वय साधून देण्यात येईल. उद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्याची सूचनाही बारणे यांनी केली. औद्योगिक प्रगती करत असतानाच उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करून शहराच्या व देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहनही बारणे यांनी यावेळी केले.
संदीप बेलसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकांना सर्वाधिक कर भरावा लागतो. महाराष्ट्रात विजेचे दर प्रचंड आहेत. शासकीय धोरणे, अनास्था आणि भ्रष्टाचार यामुळे उद्योग चालविणे कठीण होऊन बसले आहे. एमआयडीसीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होण्यास उद्योग संघटनेचा विरोध आहे. प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी वसुलीचे प्रकार,चोऱ्या यांना पायबंद बसला पाहिजे. रेडझोनचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवड होण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचनाही त्यांनी केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडसाठी लवकरात लवकर स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी अपेक्षा प्रमोद राणे यांनी व्यक्त केली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी शासनाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करून त्यांची विद्यार्थी क्षमता वाढवावी. पुण्यात आयआयटी, आयआयएम सारख्या शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात, अशी सूचना योगेश बाबर यांनी केली. आजारी असलेल्या लघु-मध्यम उद्योगांच्या पुनर्वसनासाठी बीआयएफआर सारखे मंडळ स्थापन करण्यात यावे. ईएसआय हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीवर उद्योजकांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी रंगनाथ गोडगे पाटील यांनी केली. उद्योगांकडून मिळणाऱ्या महसूलाच्या प्रमाणात केंद्राने देखील उद्योगांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुरेश म्हेत्रे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उद्योजक प्रवीण भालेसेन यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002