व्हीएस न्युज - भारतातील माओवादी क्रांतीचे मूळउद्दीष्ट हे भारतीय लोकशाहीला मानणा-या नागरिकांचा बुद्धीभेद करणारे आहे. आदिवासींमधून सकारात्मक विचारांचे नेतृत्व उभे राहत असेल तर नक्षलवादी, माओवादी बंदुकीच्या धाकाने अशा व्यक्तींना संपवत आहेत. दलित माओवादी बनत नसून माओवादीच दलितांचा टार्गेट म्हणून वापर करीत आहे. माओवादी हे दलित समाजात आम्ही आंबेडकरवादी आहोत असे सांगतात आणि दुसरीकडे संविधान नाकारतात, हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच संसदीय मार्गाचा स्विकार केला आहे. कुठलीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.
चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष आहे. तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी उपस्थितांशी स्लाईड-शो व्दारे संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा देव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, सुहास पोफळे, गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, शिल्पा वाघुले, हेमा सायकर, कविता शिंदे, प्रा. महादेव रोकडे, विजय भिसे, कैलास बहिरट, राजेंद्र घावटे, दिलीप बोंबले आदी उपस्थित होते.
कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या की, नक्षलवाद किंवा माओवाद हा गेल्या पन्नास वर्षांपासून देशाला पोखरत आहे. यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. नक्षलवाद आता गडचिरोलीपुरता मर्यादित नसून शहरापर्यंत तो फोफावला आहे. 31 डिसेंबर 2017ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर तथाकथित बुद्धीवाद्यांना अटक करण्यात आले. त्यांनतर पुन्हा माओवाद व नक्षलवादावर चर्चा सुरु झाली. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही. शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढतो असे दाखविणारे हे ‘माओच्या’ विचाराने काम करीत असतात. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीत 1967ला उठाव झाला. तो प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. हे त्यांच्याच दस्तऐवजामधून दिसते. आदिवासींना जमिनी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून मतदानाऐवजी बंदुकीच्या जोरावर सत्ता हस्तगत करायची अशी शिकवण माओची आहे. आदिवासींसाठी माओवाद नसून उलट आदिवासी कायम माओवादासाठी वापरले जातात. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर शहरी भागातील अनेकांनी सोशल मिडियातून ‘#मी टू अर्बन नक्सल’ अशी भूमिका घेऊन नक्शलवाद्यांना पाठिंबा दिला. आदिवासी भागामध्ये नोक-या व विकास नाही; म्हणून माओवादी विरोध करतात. तर दुसरीकडे शिक्षित व्यक्ती पोलिस भरती झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ठार करतात. आमदार भिमा मंडावी यांना स्फोटकांचा वापर करून माओवाद्यांनी ठार केले. हे माओवादी समोरासमोर लढत नसून स्फोटकांचा वापर करून निव्वळ संशयावरून नक्सली कारवाया करतात. युगेंद्र मेश्राम या शिक्षकाला केवळ संशयावरून माओवाद्यांनी ठार केले. गाववाल्यांच्या जनमताच्या विरोधामुळे नंतर चूक झाली अशी पत्रके वाटून माफी मागितली. दंतेवाड्यात सीरपीएफच्या प्रशिक्षणार्थींचा बळी घेतला जातो. यातील अनेक जवान हे स्थानिकच आहेत. स्थानिकांच्या हक्कासाठी लढतो म्हणायचे आणि त्यांनाच ठार करायचे हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. माओवाद्यांना स्थानिकांचा विरोध आहे. त्यांचा फोलपणा उथळपणा मागच्या दोन पिढ्यांनी पाहिला आहे. म्हणून स्थानिक आदिवासी त्यांना आता विरोध करीत आहेत. त्यामुळे आदिवासी त्यांच्या मुलांना दूरच्या शाळेत, आश्रमात शिकवत आहेत. आता माओवाद्यांना भरती करण्यासाठी तरूण मिळत नाहीत. ते तेथील शिक्षित तरूणांवर दबाव आणतात. विरोध केला तर ठार करतात. 2012ला पुण्यात बसेसमध्ये माओवाद्यांनी त्यांच्या नेत्यांना साडावे अशी मागणी करीत भगत सिंग यांचा फोटो वापरून पत्रके लावली होती. त्यातून शहरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा माओवाद्यांचा हेतू होता. शहरी माओवाद म्हणजे वेगवेगळ्या संस्था, संघटनांमधून, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांमधून तरुणांना हेरून नक्षली कारवायांसाठी उद्दिपित केले जाते.
शहरी भागातील माओवाद रोखण्यासाठी नागरिकांना शस्त्र हातात घेण्याची गरज नाही तर पोलिसांचे, सीआरपीएफ जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा गडचिरोली, छत्तीसगड मधील हिंसकता शहरात फोफावेल. माओवाद रोखण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था संवेदनशील आणि लोककेंद्रीत असणे आवश्यक आहे. माओवादी भांडवल करत असलेल्या समस्यांवर उपाययोजना केली पाहिजे. विचारधारेचे हे युद्ध शस्त्रांव्दारे जिंकता येत नाही. शहरी आणि जंगल भागातील माओवादी कारवायांना भिन्न प्रतिसाद आहे. वेगाने अस्तित्वात येणा-या फ्रंट संघटना व कायद्याच्या मर्यादा ही माओवाद रोखण्यापुढील आव्हाने आहेत, असेही कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवारी (10 मे 2019) सायं. 7 वाजता गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे सती मंदोदरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी प्रज्ञा पिसोळकर यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत कुंभोजकर यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुकरी कल्लपा जमखंडी यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रज्ञा पिसोळकर यांना वृक्ष लागवडीचा छंद असून त्या कनेक्टींग या संस्थेत समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. कनेक्टींग ही संस्था आत्महत्या करणा-या व्यक्तीस व आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशनाचे काम करते.
स्वागत कविता शिंदे, तर सुत्रसंचालन सुजाता पोफळे व आभार हेमा सायकर यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002