रहाटणी, शास्त्रीनगर, नखातेवस्ती परिसरात दूषित पाणीपुरवठा
पिंपरी- चिंचवड
2017-11-13
व्हीएस न्यूज – रहाटणी, शास्त्रीनगर, नखातेवस्ती परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याविरोधात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिला वर्गाकडून बांगड्यांचा हार घालण्याचा इशारा शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने शहर प्रमुख युवराज दाखले यांनी दिला आहे.
त्यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेतील अधिकारी मुजोर झाले आहेत. गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय नेत्यांची व ठेकेदारांची चमचेगिरी करण्याची सवय त्यांना लागली आहे. शास्त्रीनगर, नखाते वस्ती, रहाटणी परिसरातील महिला दूषित पाण्यामुळे त्रस्त आहे. त्यातच काही भागात विस्कळीत स्वरुपाचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करुनही जाणून-बुजून कानाडोळा केला जात आहे. निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना सामान्यांच्या प्रश्नांचे काहीही देणे घेणे नाही. पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.