व्हीएस न्यूज – ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली, लवकर ये रे, ये, रे विठूराया, तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल, अशा एकापेक्षा एक सरस अशा भावपूर्ण काव्यरचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. निमित्त होते ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित हरी मुखे म्हणा या कवी संमेलनाचे.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव होते. यावेळी साहित्यिक सुरेश कंक ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, कार्यक्रमाचे संयोजक व मंडळाचे कार्यवाह प्रदीप बोरसे, कवयित्री शोभा जोशी, शरद शेजवळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात राज अहेरराव यांनी सुरुवातीला आजच्या पावन दिनाची कशी होईल हो उतराई, आज पुरूष सारे विठ्ठल, स्ञिया दिसे रखुमाई या ओळी सादर केल्या. ते पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर हे जगाच्या पाठीवर एकमेव असे संत होऊन गेले की त्यांनी विश्वात्मकतेचा संदेश दिला. ते समजण्यासाठी त्यांना देव म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून बघावे. त्यांनी आपल्या आचरणातून स्ञियांना सन्मान, सर्व पंथांना समदृष्टीने बघणे, सहनशीलता, विनम्रता, समता,बंधुता, अध्यात्मातून मुक्ती प्राप्त करून देण्याचे मार्ग सुचवले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने ज्ञानेश्वर फक्त वाचू नये तर त्यांच्या अभंगाचा भावार्थ आचरणात आणावा. माउलींनी समाधी घेऊन 721 वर्षे झाली. आजही त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आळंदीला येऊ शकते.
सुरेश कंक म्हणाले की, माउलींचे पसायदान प्रेम, करूणा आणि अखंड मानव जातीला त्यांच्या कल्याणाचा सन्मार्ग दाखवणारा महामंञ आहे. पसायदान आणि माउलींचा हरीपाठ तोंडपाठ असून चालणार नाही तर कृतीने अंगीकारला पाहिजे. दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरीनामाचा, भक्त नामात रंगला या भजनाने माधुरी विधाटे यांनी कवी संमेलनाचा प्रारंभ केला. याच पाञातून वाहे, शुद्धसा ओलेपणा. हे इंद्रायणीचे मनोगत नंदकुमार मुरडे यांनी व्यक्त केले. ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली. हे गीत आय. के. शेख यांनी सादर केले. लुसलुसणारी हिरवी पाने, कोकीळेचे मंजुळ गान अशी सुंदर शब्दकळा लेऊन असा ऋतुराज वसंत अवतरला राजेंद्र घावटे यांच्या शब्दांतून. लवकर ये रे, ये, रे विठूराया अशी आर्त साद घातली नितीन यादव यांनी. तर तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल अशा शब्दात एकत्वाची सुरेख अनुभूती वर्षा बालगोपाल यांनी दिली.
अशोक कोठारी, नंदकुमार कांबळे, मधुश्री ओव्हाळ, राधा वाघमारे, भाग्यश्री कुलकर्णी, प्राची देशपांडे, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुमन दुबे या कवींच्या रचनांनी वातावरण भक्तीमय झाले. ह.भ.प. श्यामराव गायकवाड यांनी संजीवन समाधीचा सोहळा शब्दांतून मूर्तिमंत साकारला. माउलींचा जीवनपट उलगडत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी सूञसंचालन केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. पसायदानाने या भक्तीमय सोहळ्याची सुरेल सांगता झाली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002