व्हीएस न्यूज – नवीन संशोधनासाठी भारताला आजही पाश्चात्य देशांवर अवलंबून रहावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या नगरसचिव चित्रा बाविस्कर यांनी चिंचवड येथे केले.
अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसचिव चित्रा बाविस्कर बोलत होत्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मिलिंद वाणी, सुरेश बागड, प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक दीपक येवले, प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मालपुरे, संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा प्रतिभा पाखले, युवा अध्यक्ष प्रशांत ब्राम्हणकर यावेळी उपस्थित होते. दहावीतील नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.
बाविस्कर म्हणाल्या की, पालकांनी लहानपणापासून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि जिज्ञासू प्रवृत्तीला खतपाणी घातले तरच अधिकाधिक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळतील. जे संशोधक होणार नाहीत, ते आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्चितच सरस कामगिरी करून दाखवतील. धकाधकीच्या जीवनात आजचा भारतीय तरुण फक्त पैसा, प्रमोशन ह्याच्याच मागे धावत आहे. मात्र, देशाला संशोधकांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी संशोधन क्षेत्रात उतरायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे म्हणाले की, समाजाचे संघटन होण्यासाठी प्रबोधन संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्रबोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अशावेळी समाजातील संघटनामुळे गरजू घटकापर्यंत पोहचता येणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी संघटन मजबूत असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षपदी किरण अमृतकर, महिला अध्यक्षपदी भारती दशपुते, युवक अध्यक्षपदी स्वप्निल पाचपुते तसेच सामुदायिक विवाह सोहळा समन्वयकपदी रविंद्र मालपुरे यांची निवड जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे यांनी ही निवड केली. मिलिंद वाणी, सुरेश बागड, दीपक येवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ऋतुजा अमृतकर यांनी केले. प्रा. उदय पाटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002