व्हीएस न्यूज - सरकार एकही काम वेळेवर करत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतकरी कर्जमाफी, अनधिकृत बांधकामे, शास्ती कर असे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यव्यापी प्रलंबित प्रश्न घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निगडी ते आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील,माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांचा सरकारच्या विरोधात उद्रेक दिसून आला.
अजित पवार म्हणाले की, सरकार जबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे अशा प्रकारची आंदोलने करावी लागत आहेत. सरकारच्या विरोधात यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची आंदोलने करणार असून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मुख्य मुद्दा असणार आहे. मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये पेपर तपासले न गेल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. राष्ट्रवादीच्या राज्यात वीज कपात बंद होती. यांनी कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीज कपात केली. आज राज्याचे पोलिस जनतेला मारत आहेत. सांगली जिल्ह्यात जिवंत माणसाला मारुन जाळण्याचा प्रकार घडला. असं जिवंत माणसाला मारणार हे सरकार आहे, अशा शब्दात पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली.
जीएसटी लावताना सामान्यांचा विचार केला नाही. आमची सत्ता असताना शहराला स्वच्छतेचा मान मिळवून दिला. आत्ताचे शहर बघितले तर सगळीकडे कचऱ्याचे ढिग साचले आहेत. शास्ती कर रद्द करणार होते, पण तो रद्द झाला नाही. त्याचप्रमाणे रेड झोनचा प्रश्नही सोडविला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते. परंतु, एकाच्याही हातावर दमडीही ठेवली नाही. कोपर्डी प्रकरणात दिरंगाई केल्याने हे हल्लबोल आंदोलन करावे लागत आहे,असेही पवार यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002