व्हीएस न्यूज - विश्वाला मैत्री, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा सामाजिक समता तसेच न्यायाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे देऊन धम्मचक्र परिवर्तन केले. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याचे मार्गदर्शन संविधान करते. भारतीयांचे कल्याण संविधानाव्दारेच शक्य आहे. संविधान हाच खरा मानवतेचा आदर्श धर्मग्रंथ आहे. हा मानवतावादी विचार सर्व भारतीयांनी स्विकारला पाहिजे. असे मार्गदर्शन प्रबोधनकार, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.
पिंपळे गुरव येथे 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅंम्प, दापोडी परिसरातील संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि नागविदर्भ असोसिएशन तसेच सेहेचाळीस बुध्द विहारांच्या वतीने पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात रविवारी (दि. 8 ऑक्टोबर) आयोजित कार्यक्रमात माजी आमदार आण्णा बनसोडे, परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, ओबीसी परिषदेचे राज्य संघटक उल्हास राठोड, राहूल काकडे, ॲड. राजेश नितनवरे, ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे, संदीप नितनवरे, चंद्रकांत वाकोडे, प्रा. रवींद्र इंगोले, नयन अहिरे, सुनील निकम, दिपक म्हस्के, पारधे सर उपस्थित होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गोतसुर्वे म्हणाले की, मृत्यूनंतर पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा वर्तमानात चांगल्या गोष्टींचे आचरण करा, अशी शिकवण देणारा धर्म म्हणजे बौध्द धर्म होय. समाजात समतेने जगण्याचा मार्ग बुध्दांनी दिला. बुध्दांची पंचशील तत्व आचरणात आणल्यास दु:ख कमी होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब सुध्दा सुखकारक आयुष्य जगले असते. मात्र, त्यांनी बहुजनांसाठी त्याग केला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आधी स्वयंप्रकाशित व्हा. असेही गोतसुर्वे म्हणाले. स्वागत अमरसिंह आदियाल, सुत्रसंचालन दीपक म्हस्के आणि आभार नयन अहिरे यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002