व्हीएस न्यूज - स्वावलंबन ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. आत्मनिर्भर झालो तरच ठरवलेले कोणतेही ध्येय सहज गाठता येते. मुलांनी आपली स्वतःची दिशा ओळखून मार्गक्रमण करावे. आपल्याला स्वतःला कळले पाहिजे की आपण कोठे आहोत. आपल्याला नेमके काय करायचे हे ज्याला कळतं तोच पुढे जाऊ शकतो.मोठे व्हायचे असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजेत. निरनिराळ्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी निश्चित त्याचा फायदा होईल. माणूस किती मोठा झाला यापेक्षा तो कसा मोठा झाला हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते.असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सांगवी येथे व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी येथे ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘चला आत्मनिर्भर होऊ या’ ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तानाजी मोरे होते. याप्रसंगी विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे, मुख्याध्यापिका प्रमिला बर्गे, पर्यवेक्षक चंद्रकांत शिंदे,प्रा. नितीन कदम,नवनाथ करंजुले, शरद ढोरे,प्रदीप पाटील, क्षितीज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षक आणि आई वडिलांनी तसे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षकासारखा भाग्यवानया पृथ्वीतलावर नाही. फक्त त्याचे कामावर, आपल्या विद्यार्थ्यांवर व आपण शिकवत असलेल्या विषयावर प्रेम आणि निष्ठा असली पाहिजे. चांगला माणूस, चांगले व्यक्तिमत्व घडविणे हे सर्वस्वी शिक्षकांच्या हातात असते. विद्यार्थी शिक्षकांचे मापन करत असतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार महत्वाची आहे. सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस कोणतेही आव्हान सहज पेलू शकतो.याकरिता शिकण्या-शिकविण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी हयगय करून चालणार नाही. कृतज्ञ असणे ही मानवी मूल्यांमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. खूप वाचा, मोठे व्हा, लिहा, मोठ्यांचा आदर करा, मान राखायला शिका.जे शिकाल ते उत्तमच शिका, जे कराल ते उत्तमच करा असे सांगत त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक प्रसंग मांडत सर्वांनाच अंतर्मुख केले.विद्यार्थ्यांनी साहित्य वाचले पाहिजे, आपले अनुभव, प्रसंग लिहिले पाहिजेत विविध उदाहरणे देत दोन तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष ढोरे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, विद्यापीठाच्या एकूण प्रक्रियेत विद्यार्थी हाच सर्वोच्च स्थानी असला पाहिजे असा माझा नेहमी आग्रह राहिला आहे. यापुढेही तो राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने उपलब्ध आहे. आपण शालेय पातळीवर शिक्षण घेताना आपले उद्दिष्ट निश्चित केले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर तुम्हाला ध्येय गाठणे सहज शक्य होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. प्रास्ताविकात नाना शिवले यांनी साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमातून साहित्य वाचन व लेखनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी या उद्देशाने ह्या उपक्रमाची मालिका शाळा महाविद्यालयात सतत सुरू सतत सुरू राहील असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय गजानन वाव्हळ यांनी करून दिला. आभार उपप्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे यांनी मानले. अतुल शिंदे, राजेश सावंत, अविनाश ववले, राजेंद्र करपे, संतोष निंबाळकर, बाजीराव लोखंडे, गुरूदास भोंडवे, संतोष बाबर,नंदकुमार कांबळे, किशोर जवळकर, यांनी विशेष सहकार्य केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002