व्हीएस न्यूज – सांगलीतील पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरण राज्यातील पोलिसांना चांगलेच महाग पडले होते. असे असताना देशात सर्वाधिक कोठडीतील मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘क्राईम इन इंडिया २०१६’ च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशातील पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात केली आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. २१ प्रकरणांत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्र (१६) झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (११) आणि गुजरात (११) या राज्याचा क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीत मृत्यू नोंदले गेले असून येथे घडलेल्या बारा घटनांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर, तीन प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात किंवा कोठडीत घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून आले आहे. कोठडीत आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३८ घटना झाल्या आहेत. त्यानंतर विविध आजारांमुळे २८ जणांचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. गुन्हेगारांसोबत कोठडीत असताना झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाला. तर, तपासासाठी बाहेर घेऊन जाताना अपघात होऊन देखील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोठडीतून पळून जाताना चारजण ठार झाले आहेत.
पोलीस अधिकारी किंवा कर्मचा-यांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या घटना आठ असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. कोठडीत असताना पळून गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोठडीतून १३२० आरोपी पळून गेले आहेत. त्यापैकी ९५० जणांना अटक करण्यात आली. कोठडीतील आरोपी पळून जाण्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्यप्रदेश (१३३) आघाडीवर आहे. त्यानंतर (२८२) आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002