व्हीएस न्युज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंधुरे याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात आणले असता न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी त्याला ७ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.
सचिन अंधुरे हा प्रत्यक्ष मारेकरी आहे, त्याच्याकडून हत्यार आणि वाहन ताब्यात घ्यायचे आहे. त्याने ट्रेनिंग कुठे घेतली, कोणी त्याला ट्रेनिंग दिली होती याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर येऊ शकते त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. दरम्यान, माझ्या भावावरील आरोप चुकीचे असून त्याला याप्रकरणात फसवलं जात आहे असा आरोप आरोपीचा भाऊ प्रवीण अंधुरे यांने न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.
शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे तो कोल्हापूर नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.
श्रीकांत नावाच्या आणखी एका व्यक्तिला जालन्यातून अटक करण्यात आली असून त्यामुळे पुढच्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाचवर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अणदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणात तपासाच्या प्रगतीबद्दल मुंबई उच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त करुन सीबीआय आणि विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघडणी केल्यानंतर दोन आठवडयांनी ही अटकेची कारवाई झाली आहे.
न्यायाधीश एससी धर्माधिकारी आणि न्यायाधीश भारती दानग्रे यांच्या खंडपीठासमोर दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने राज्यातील स्थिती समाधानकारक नाही. पोलिसांवर दगड फेकले जात आहेत. जमाव रस्त्यावर आहे. बस जाळल्या जात आहेत. हे सर्व दु:खद आहे असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
दोन्ही हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडू न शकल्याबद्दल न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटी दोघांची कानउघडणी केली होती. तुम्ही अधिकारी काश्मीर ते त्रिपुरापर्यंत प्रवास करता पण रिकाम्या हाताने परत येता या शब्दात सुनावले व तपास अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. सरकार बदलतील पण तुम्हाला तपास करावा लागेल. तुम्ही तुमच्या अहवालात तेच तेच सांगत आहात. अजून तपासात प्रगती का नाही झाली ? असा सवाल न्यायालयाने विचारला होता.
व्हीएस न्यूज – पुणे विद्यापीठ चौकातील तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला नाकाबंदी करून पकडले आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. दरम्यान, विद्यापीठ चौकात भरदिवसा गर्दीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. समीर किसन येणपुरे (वय 39, रा. मेहदले गैरेज, एरंडवणा) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोळीबार करणा-या शुक्राचार्य मधाळे आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
समीर याचा फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय आहे. तर, आरोपी शुक्राचार्य मधाळे याची एरंडवणे भागात टपरी होती. अतिक्रमण विभागाने मधाळे याची टपरी तोडली. समीर येणपुरे याच्या सांगण्यावरुनच अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली, असा संशय मधाळे याला होता. शनिवारी समीर विद्यापीठ चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या शुक्राचार्य याने समीर याच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या समीर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वर्दळीतील आणि भरदिवसा घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गोळीबार करणा-या शुक्राचार्य आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले आहे. चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
महिन्याभरानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश.
व्हीएस न्यूज – हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मोबाइलचे मेमरी कार्ड परत केले नसल्याने मित्राचा खून केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच 16 जुलै 2018 रोजी रहाटणी येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी अनिल श्रावण मोरे (वय 39, रा. सायली पार्क, भैय्या चाळ, रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय 39, मुळगाव चिंबळी ता. खेड जि. पुणे) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.
रहाटणी येथे 16 जुलैला सकाळी सुतार याचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान सुतारकाम करणारा अनिल आणि पवन हे दोघे मित्र होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली होती.
पवन याचा मृत्यू झाल्यापासून अनिल याने मोबाईल फोन बंद करुन ठेवला असल्याची, माहिती पोलिसांना मिळाली. अनिल हा बावधन येथील एका शाळेत सुतारकाम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत पवन याने हातउसने दिलेले 800 रुपये व मोबाईलचे मेमरीकार्ड परत केले नव्हते. त्यामुळेच पटाशीच्या साहाय्याने खून केल्याची कबूली अनिल याने दिली, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड मधल्या ताथवडे भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच पोटच्या दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःहा आत्महत्या केली. पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर हा मन सून्न करुन सोडणारा प्रकार सामोर आला.
दीपक बरमनने (३५) पोटच्या दोन मुलांची शुभम आणि रुपमची गळा आवळून हत्या केली. शुभम १० वर्षांचा तर रुपम आठ वर्षांचा होता. त्यानंतर दीपकने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. घराच्या समोर असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पती-पत्नी नोकरीला होते. दीपकने इतके टोकाचे पाऊल का उचलले ? त्यामागे काय कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
व्हीएस न्युज - शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाकडुन मा.अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना आखेरचा जय महाराष्ट्र करित युवराज दाखले म्हणाले कि "आदणीॕय माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. एक कवी मनाचे पर॔तु तरीही कणखर, एका पक्षाचे तरीही सर्व पक्षीयांच्या हृदयामध्ये स्थान असलेले एक विलोभनीय व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. खरंच एका काळाचा अंत झाला आहे...
अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त आघाडी चे सरकार कसे चालवावे याचे उत्कृष्ट उदाहरण 1999 ते 2004 या काळात देशासाठी अर्पण करून दिले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मताचाही त्यांनी कायम आदर केला. देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी कायम प्राथमिकता दिली. आजच्या विध्वंसक व द्वेषाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्वव्यापी राजकारणाची कमी कायम जाणवत राहील. त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे."
बँकेची टेक्नॉलॉजी, फायरवॉल इतकी मजबूत असताना हा दरोडा पडलाच कसा? आणि हे सगळं होत असताना बँकेला याची कुणकुणही कशी लागली नाही? असा प्रश्न पडला आहे.
व्हिएस न्युज - कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा पडला आहे, तोही केवळ 2 तास आणि 13 मिनिटात आणि गायब झाले 94 कोटी 42 लाख रुपये. बँकिंग विश्वाला हादरवणारी ही घटना 11 आणि 13 ऑगस्टला घडली आहे. बँकेची टेक्नॉलॉजी, फायरवॉल इतकी मजबूत असताना हा दरोडा पडलाच कसा? आणि हे सगळं होत असताना बँकेला याची कुणकुणही कशी लागली नाही? असा प्रश्न पडला आहे.
खातेदारांची बनावट व्हिसा कार्ड तयार करण्यात आली. ती वापरुन 21 देशात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढले. प्रत्यक्षात खऱ्या व्हिसा कार्डचा वापर झाला नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे 13 कोटी 50 लाख ट्रान्सफर करण्यात आले. जे रिकव्हर करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचा दावा केला जातोय.
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!
दरम्यान, हा दरोडा नेमका पडला कसा, यासाठी हॅकर्स काय करतात याबद्दल आम्ही सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट मुस्लीम कोसर यांच्याशी बातचीत केली. मुस्लीम कोसर यांच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या नेटवर्कमध्ये सर्व्हर असतात. हे बहुतेककरून स्विफ्ट या नावाच्या सिस्टिमचे हे सर्वर असतात. अटॅकर आधी या सर्व्हरला छेद देण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वी झाल्यावर ते सर्व्हरला हॅक करतात. एकदा हे झालं की त्यांचं काम सोपं होतं. त्यांनतर बँकेतून भारताबाहेरच्या इतर खात्यांमध्ये पैसे पाठवणं शक्य होतं. हे पैसे पाठवण्याचं काम अनेक पातळीवर करणं शक्य आहे.
यातली शेवटची पायरी म्हणजे 'कॅश आऊट'... म्हणजे फेरफार केलेले हे पैसे त्या अकाऊंटमधून पैसे बाहेर काढणं. कॅश आऊटही अनेक पद्धतींनी होऊ शकतं. ते पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये पाठवू शकतात, एटीएम कार्डही वापरलं जाऊ शकतं. एक मोठी रक्कम बँकेतून हॅक करून काढल्यावर ती अनेक अकाऊंटमध्ये छोट्या-छोट्या रकमेच्या स्वरूपात विभागली जाते. त्यामुळे कॅश आऊट करण सोपं होतं. त्यामुळे हा हल्ला ट्रेस बॅक करणंही कठीण होऊन बसतं, असं मुस्लीम कोसर सांगतात.
व्हीएस न्युज - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवार दि 14 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी महापुरुषांच्या-क्रांतिकारी वीरांच्या सन्मानार्थ,तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याजोगी पिंपरी चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे "युवा स्वातंत्र्य रॅली" चे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली मध्ये तरुण वर्ग , महिला, लहान मुले जेष्ठ नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.पाऊसाची तमा न बाळगता भर पाऊसात देखील नागरिक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी माजी सैनिक, खेळाडू, यांचा सत्कार करण्यात आला.लहान मुलांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.तसेच नागरिकांना स्वातंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला मिठाई वाटुन शुभेच्छा देण्यात आल्या.
संविधानाची शपथ घेऊन कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी सर्व राजकीय पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य अभिषेकदादा बोके,रविकांतजी वरपे यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे , नगरसेविका वैशाली काळभोर,सुलक्षणा शिलवंत/धर,नगरसेवक विक्रांत लांडे, विजय लोखंडे,अरुण बोऱ्हाडे होते , माजी नगरसेवक मारुभापकर,शिवसेनेकडून कामगार नेते इरफान सैय्यद, रुपेश कदम,आर पी आय वाहतूक चे प्रदेशअध्यक्ष अजीज शेख,शहर संघटक अल्ताफ शेख , पुणे युथकाँग्रेसचे युवानेते मानस पगार, संभाजीब्रिगेड तर्फे नकुल भोईर, अपना वतनचे सिद्दीकभाई शेख,अंनिस तर्फे संजय बारी शेकाप व अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.
राष्ट्रगीताद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे आयोजन इम्रान युनूसभाई शेख आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते.
व्हीएस न्युज - दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार क्लब, अवैध लॉटरी, हातभट्टी, अवैध ताडी, लॉज मधील वेश्या व्यवसाय, गुटखा, पॅगोची अवैध वाहतुक सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून दिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवासी नथ्थू पिराजी शिंदे यांनी केली आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अवैध्य धंद्याबाबत दिघी पोलिस स्टेशनला सात ते आठ तक्रार अर्ज केले. तसेच झोन फोर कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग, सामाजिक सुरक्षा विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारीचे अर्ज दिले. परंतु, पोलिस प्रशासनाकडून याबाबत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. दिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मटका, कधी वडापाव दुकानात कधी सलुनच्या दुकानात चालतो. लॉजमध्ये मोबाईलवर फोटो दाखवून ग्राहकांना वेश्या पुरवल्या जातात. जुगार क्लब, हातभट्टी, अवैध्य ताडी जागा बदलून चालू आहे. अशा सर्व अवैध धंदे चालवणाऱ्या धंदे वाल्यांना एम.पी.डी.ए. लावण्याचे राज्यात विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९८१ मध्ये सुधारणा विधेयक शासनाने विधान परिषदेत नागपुर अधिवेशन २०१८ मध्ये मंजूर केले आहे. परंतु दिघी पोलीस स्टेशन शासनाच्या अधिनियम १९८१ च्या सुधारीत विधेयकाच्या विरोधात काम करत आहे. तसेच, मोठे हप्ते खाऊन दिघी पोलिस स्टेशन च्या हद्दीत, मटका, जुगार क्लब, अवैध लॉटरी, वेश्या व्यवसायावर अवैध ताडी, हातभट्टी अशा धंदेवाल्यांना मदत करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या ठिकाणी चालू आहेत अवैध धंदे –
दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देहुफाटा व्यायाम शाळेजवळ, दिघीगाव दत्तनगर जवळ ममता स्वीट होम, तसेच तनिष कंट्रक्शन शेजारी मटका अड्डे चालु आहेत. देहुफाटा पेट्रोल पंप जवळ तसेच बारासू हॉटेल, दिघी जुना जकात नाकाजवळ जुगार क्लब चालु आहे. दिघीतील पोलीस स्टेशनच्या हद्दीत २७ लॉज चालु आहेत. अनेक लॉजमध्ये ५ ते २० मुली ठेऊन वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे. तसेच दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत डुडुळगाव, देहुफाटा, मॅगझीन चौक, आदर्श नगर, दत्तनगर, दिघी येथे हातभट्टी व ताडीचे १२ गुत्ते सुरू आहेत. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३२ लहान मोठे अवैध ढाबे सर्व प्रकारची दारु विकतात. देहुफाटा ते मोशी व देहुफाटा ते विश्रांतीवाडी मार्गावर २०० पॅजो गाड्या प्रत्येकी १० सिटे भरून वाहतुक करतात. पोलीस स्टेशन हप्ते घेऊन ओव्हर लोड गाड्या भरण्याचे काम याठिकाणी सुरु आहे. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ गुटखा होलसेलची गोडाऊन असून ७० पान टपरीवर गुटखा विक्री चालते. भाई लोकांची हप्ते वसुली अन्यथा दुकानदाराच्या गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार या ठिकाणी नवीन नाही. या संदर्भात पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी यांना तक्रार अर्ज दिले. तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुंडांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की व मारहाण केली. याबाबतही पोलिसांना तक्रार दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - प्रभाग क्रमांक ९ मधील खराळवाडी येथील सोनकर रेसिडेन्सि समोरील परिसरात सर्व रस्त्यांच्या पेव्हिंग ब्लॉकची आणि ड्रेनेजची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी अखिल वाल्मिकी समाज चे माजी महासचिव नरेश रामकिशन जीनवाला यांनी केली आहे. नरेश जिनवाल यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे लेखी निवेदन दिले आहे त्यात असे म्हणले आहे की,
"प्रभाग क्रमांक ९ मधील खराळवाडी येथील सोनकर रेसिडेन्सी समोरील परिसरात रस्त्यांची खुपच दुरावस्था झाली असुन रस्त्यामधे मोठमोठे खड्डे झालेले आहेत, पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत, रस्त्याच्या बांधणीकडे व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे एकही रस्ता सुसज्ज नाही. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने सदर खड्यात पाणी साचल्यामुळे अपघाताच्या घटना यापूर्वीही घडलेल्या असुन पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, शाळेतील लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता तात्काळ येथील रस्त्यांची आणि हड्रेनेजची डागडुजी करावी आवश्यक ठिकाणी तात्काळ मुरूम व पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात यावे अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल".
सदरील कामाची चौकशी करून ठेकेदार, अभियंता व इतर प्रशासन स्थापत्य विभाग यांची चौकशी करून अहवाल उपलब्ध करून ठेकेदार, अभियंता यांच्यावर उचित कारवाई करावी.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवडच्या २० लाख जनतेची पोलीस आयुक्तलयाची आता प्रतीक्षा संपणार आहे.अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज उद्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ध्वजारोहण करून सुरू केलं जाणार आहे.महानगर पालिकेच्या ऑटोक्लस्टर इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कामकाजाचा शुभारंभ होईल.मात्र प्रत्यक्षात तिथं केवळ आयुक्तालय नावाचे फलक आणि ध्वजारोहनाचं साहित्य पोहचल आहे. त्यामुळं आयुक्तालय सुरू करण्याची घाई नेमकी कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जातोय.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच खऱ्या अर्थाने प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या इमारतीत कामकाज सुरू होणार आहे.मात्र याठिकाणच्या सुशोभीकरणाचे काम १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह नाहीत.म्हणून आयुक्तलयाच तात्पुरत्या स्वरूपात कामकाज हे महानगर पालिकेच्या ऑटोक्लस्टर येथून सुरू करण्याची घोषणा झाली.अवघ्या काही तासात ही घोषणा पूर्ण होणार अशी आस शहरवासीय लावून आहेत.मात्र प्रत्यक्षात ऑटोक्लस्टर मध्ये केवळ आयुक्तलयाच नाम फलक आणि ध्वजारोहनच साहित्य पोहचलेले आहे.या व्यतिरिक्त कामकाज सुरू करण्यासाठी ना कोणतं साहित्य पोहचलय ना सोयीसुविधा.त्यामुळे आयुक्तलय सुरू करण्याची घाई कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
तर खऱ्या अर्थाने प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या इमारतीत याचं कामकाज सुरू केलं जाईल. तेथील सर्व काम हे महापालिका पूर्ण करणार आहे. परंतु महापालिकेची ही टेंडर प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही.त्यामुळं खऱ्या अर्थाने आयुक्तलयाच कामकाज कधी सुरू होणार याच उत्तर अनुत्तरित राहात आहे।एकंदरीतच हा सर्व अनागोंदी कारभार पाहता, आयुक्तालय केवळ नावापुरत सुरू होईल अस दिसत आहे.यामुळे शहरवासीयांची सुरक्षा रामभरोसे कायम राहणार हे नक्की.
व्हीएस न्युज - पुण्यातील कॉसमॉस बँकेतील खाती परदेशातून हॅक झाल्याचा आरोप होत आहे. परदेशी हॅकर्सनी एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा बँकेने केला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉंगकॉंगमधून आपल्या बँकेतील खाती हॅक केली आणि तब्बल 95 कोटी रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार कॉसमॉस बँकेने पोलिसात केली आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मालवेअर व्हायरसचा वापर करुन कॉसमॉस बँकेच्या व्हिसा आणि डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे हॅकरने 12 हजार व्यवहार केले. बँक खात्यांमधून परदेशात तब्बल 78 कोटी रुपये, तर भारतात अडीच कोटी रुपये वळते केल्याचा आरोप होत आहे. 80.5 कोटी रुपये 11 ऑगस्टला वळते केल्यानंतर 13 ऑगस्टला असाच प्रकार घडला.
कॉसमॉस बँकेतील खात्यांवरुन हाँगकाँगच्या हँसेन बँकेमधे असलेल्या ए. एल. एम. ट्रेडींग कंपनी या नावाने असलेल्या बँक खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वळते करण्यात आले. असे एकूण 94 कोटी 42 लाख रुपये कॉसमॉस बँकेतील खात्यांमधून काढून घेण्यात आले. पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावर असलेल्या बँकेच्या मुख्यालयातील ए. टी. एम. स्वीच सर्व्हरवर मालवेअरच्या सहाय्याने हल्ला करुन हॅकिंग करण्यात आलं. बँकेकडून चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
कसा झाला अपहार?
दोन बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी स्विचिंग सिस्टिम असते. मात्र कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यासाठी आभासी स्विचिंग सिस्टिम मालवेअरच्या सहाय्याने तयार करण्यात आली. या आभासी स्विचिंग सिस्टिमने कॉसमॉसच्या व्हिसा आणि डेबिट खात्यांमधून 11 ऑगस्टला अवघ्या दोन तास तेरा मिनिटांमधे 12 हजार व्यवहार झाल्याचं दाखवलं.
आभासी स्विचिंग सिस्टिमने मागणी करताच कॉसमॉस बँकेच्या यंत्रणेने पैसे वळते केले. मात्र नंतर ही स्विचींग सिस्टिम खोटी असल्याचं लक्षात आलं. या 12 हजार व्यवहारांमधून तब्बल 80 कोटी 50 लाख रुपये एटीएमधून काढण्यात आले. या 80 कोटींपैकी 78 कोटी रुपये हे वेगवेगळ्या 21 देशांमधील एटीएम खात्यांमधून काढण्यात आले, तर अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढण्यात आले.
कॅनडातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याची माहिती आहे. तर भारतात काढण्यात आलेले पैसे हे प्रामुख्याने मुंबई आणि इंदूरमधून काढण्यात आले. दुसऱ्या प्रकारात कॉसमॉस सहकारी बँकेच्या खात्यांमधून हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेत 13.5 कोटी रुपये 13 ऑगस्टला वळते करण्यात आले. त्यासाठीही आभासी स्विचिंग सिस्टिमचा उपयोग करण्यात आला. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याचा अंदाज आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
व्हीएस न्युज - धीरज रामसिंग तामचीकर यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वीजेएनटी सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीजेएनटी सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने, प्रवक्ते फजल शेख, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक नगरसेवक मुलचंद भाट, विजय लोखंडे, शकुंतला भाट, विशाल काळभोर, इम्रान शेख, विनोद कांबळे, सचिन माने, विश्रांती पाडाळे, मनिषा गटकळ, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश पुजारी, साऊल शेख, सरोदा तामचीकर, धीरज तामचीकर, अमर गंभिरे, विजय दळवी, विलास महाजन विष्णू सरगर, भालदार गुलामअली, दिनेश पटेल, अरूणा बनसोडे, वर्षा तामचीकर, भुपेंद्र तामचीकर, श्रीकांत राठोड, रितेश तामचीकर, गणेश तामचीकर, सर्जेराव जगताप, विजय भाट, आकाश राठोड, देवी थोरात, प्रमोद ठाकूर, सोमश तामचीकर, विकी भाट सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, सैफ खान, सुर्यकांत पात्रे, अमर कांबळे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, शिवदास चिलवंत, शिवाजी सुरवसे, निर्मला माने, शादाब खान, देवी थोरात, विलास भाट, जहिर खान, सुनाज भाट, नरेंद्र तामचीकर, अशोक तामचीकर, सुनील अडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002