व्हीएस न्युज - संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विजय भोसले, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. नाना रसाळ, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड. संतोष मोरे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.
अॅड. पी. एस. कांबळे म्हणाले की, देशाचे संविधान हाच आपला अभिमान असून त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य घटनेची प्रत माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी पिंपरी चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांना देण्यात आले.
यावेळी अॅड. स्मिता लांडे, अॅड. गोरख कुंभार. अॅड. सुनील कड, अॅड. योगेश थांबा, अॅड. किरण पवार, अॅड. आतिश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. मनीषा महाजन, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कड, अॅड. आतिश लांडगे, अॅड. सुनील माने, अॅड. पी. एस. कांबळे, अॅड. जिजाबा काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी 26/11 मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोरख कुंभार यांनी केले. स्मिता लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
व्हीएस न्युज - रावेत येथील कारमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल जवळून उघडकीस आली.
अमोल रविंद्र शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) आणि अनुपमा नवनाथ कारंडे ( वय ४१, रा. वाकड) अशी मयत दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास रावेतजवळील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल समोरील एका कारमध्ये अमोल आणि अनुपमा या दोघांचे मृतदेह आढळून आले.
दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - विक्रीसाठी आणलेला २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाच्या गांजासह एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
जुबेर मौला अत्तार (वय २९, रा. संदिप गायकवाड यांची चाळ, माळवडी, पुनवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी स्टाफसह त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी जुबेर अत्तार नावाचा तरुण संशयीतरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसून आला.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळीला पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी जुबेर अत्तार याला अटक केली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला हिंजवडी पोलीसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पिंपरीत गंभीर गुन्हे नावांवर असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.
शक्ती रामरतन बहोत (वय ३०, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) विशाल बबन गायकवाड (वय २२, रा. गिरजुबाबा मंदिरामागे, बौध्दनगर) मनोहर मारूती सुर्वे (वय रा. पत्राशेड, लिंकरोड), जिंतेद्र सावळाराम शिंदे (वय ३०, रा. भिमनगर, पत्राशेड पिंपरी) लक्ष्मण बाळू शिंदे (वय ३३, रा. वसंतदादा पाटील शाळेसमोर नेहरूनगर, पिंपरी) अशी तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नांवे आहेत.
वरील सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, इतर काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या पिंपरी पोलीस ठाण्यात नियुक्तीमुळे पोलीस कर्मचारी, सामाजिक, राजकिय, क्षेत्रातील लोकांमध्ये चैतन्य पहावयास मिळत असुन नागरिकांकडुन चांगला अधिकारी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
व्हीएस न्युज - कपड्याचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.ही घटना शुक्रवार (दि.२३) रात्री १० ते शनिवार (दि.२४) सकाळी साडेसातच्या दरम्यान अजमेरा "जे" सेक्टर शॉप नं.१ येथील वैष्णवी कलेक्शन या कपड्याच्या दुकानात घडली.
याप्रकरणी दुकानदार संभाजी धनराज मोरे (वय ३६, रा. वास्तु उद्योग कॉलनी १०/४ अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार,अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोरे यांचे अजमेरा जे सेक्टर येथे वैष्णवी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातली गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज - पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२४) दुपारी चिंचवड स्टेशन येथे करण्यात आली. याप्रकरणी संदीप लक्ष्मण शेडगे (वय ३८, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, अनिता संजय भापकर या महिलेस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेडगे हे मोहननगर, चिंचवड येथील सुमीत प्रा. लि. या कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कामाला होते. त्यावेळी तिथे साफसफाईचे काम करणाऱ्या अनिता या चोरी करीत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक अर्जुन कांबळे यांना शेडगे यांनी दिली होती. यामुळे अनिता यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन अनिताने शेडगे यांनी आपल्याला आनंदनगर, चिंचवड येथे मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यात केली. तसेच शनिवारी (दि.२४) शेडगे यांना फोन करुन चार हजार रुपये दिल्यास तुझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेते, असे म्हणत खंडणीची मागणी केली. यावर शेडगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि घडलेला घटनाक्रम पोलीसांना सांगितला.
पोलिसांनी शेडगे यांना आरोपी अनिता हिला पैसे नेण्यासाठी चिंचवड स्टेशन येथे बोलवण्यास सांगितले. ती पैसे नेण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. सहायक निरीक्षक शेवाळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - रिक्षाचालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून तो नदीपात्रात टाकून देण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उघडकीस आला. रिक्षाचालकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, हल्लेखोर आणि खुनामागचे कारण अद्याप समजले नाही़ सुनील पडवळ (४५, रा. दत्तवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक चेतन चव्हाण यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजपूत वीटभट्टीजवळ नदीपात्रातील काटवनातील मोकळ्या जागेत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली़ ही माहिती मिळताच डेक्कन पोलीस घटनास्थळी गेले़.
मृतदेहाच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारून त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता़ त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता़ पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला़ मृतदेह सापडला त्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यावर रिक्षा तसेच एक डायरी सापडली़ त्यात रिक्षामालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक दिला होता़ तसेच सुनील पडवळ असे स्वत:चे नावही लिहिले होते.
पोलिसांना यातील क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ती रिक्षा संदीप पासलकर यांची असल्याचे समजले. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलविण्यात आले. त्यांनी सुनील पडवळ हा त्यांची रिक्षा भाड्याने घेऊन चालवत असल्याचे सांगितले़ सुनील हा काही वर्र्षांपूर्वी मुंबईत मिलमध्ये काम करत होता. त्या वेळी त्याच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली होती. पासलकर यांनी मृतदेह पाहिला. त्या वेळी बोटे कापलेली दिसली. त्यावरून त्यांनी हा सुनील पडवळ याचाच मृतदेह असल्याचे ओळखले. त्याला दारूचे व्यसन होते. तो राहण्यास दत्तवाडी भागात होता. मात्र, अनेक दिवस तो घरीच जात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी सुनील याचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिला़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत़
व्हीएस न्युज - असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने संविधान दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली या वेळी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे शहर अध्यक्ष सुंदर कांबळे व महिला शहर अध्यक्षा सायरा बानू शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे संतोष रणसिंग , बबन शिरसाठ , नवनाथ डेंगळे ,कलिंदर शेख ,शबाना कुरेशी ,सौ शीतल कोतवाल ,सलमान शेख ,रोहन खंडागळे ,सौ. निर्मला कुशलकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पुणे शहरात नववर्षांपासून (१ जानेवारी २०१९) हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकतेच जाहीर केले. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ विचारात घेता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौक तसेच गल्लीबोळात कारवाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहरात रस्ते अपघातात मोठय़ा संख्येने दुचाकीस्वार बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढते अपघात तसेच त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेल्मेट परिधान केल्यास डोक्याला होणारी गंभीर स्वरूपाची दुखापत टाळता येईल, तसेच दुचाकीस्वाराचा जीवदेखील वाचेल, असे मत पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी व्यक्त केले आहे.
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमणे शक्य होणार नाही. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे सध्या एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी शहर परिसरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर १२४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सध्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
वादाचे प्रसंगदेखील टाळता येतील!
हेल्मेट सक्तीला मोठय़ा प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षांपासून शहरात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौकात हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कारवाई करण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करून संबंधित वाहनक्रमांकाच्या पाटीवरून त्याचा शोध घेण्यात येईल. त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई तसेच दंडाच्या रकमेचा संदेश मोबाइल क्रमांकावर पाठवता येईल. सीसीटीव्ही कारवाईमुळे वादावादीचे प्रसंग उद्भवणार नाहीत, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
दहा महिन्यांत १ कोटी ९० लाखांचा दंड वसूल
वाहतूक पोलिसांकडून गेल्या दहा महिन्यांत हेल्मेट परिधान न करणाऱ्या ३८ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ९० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - पुण्यातील एकता भाटी यांच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला वाहतूक पोलीस राजेश शेळके यांच्या धाडसामुळे अटक करण्यात यश आले. पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षकावर गोळीबार करुन पळालेल्या आरोपीला राजेश शेळके यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अटक करण्यात आली.
शिवलाल राव असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील चंदननगर भागातील इंद्रमणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) यांची बुधवारी सकाळी राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी शिवलाल राव (वय ३२) आणि मुकेश राव हे दोघे झेलम एक्स्प्रेसने पळ काढणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर आरोपींनी गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांनी मुकेश रावला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली होती. तर दुसरा आरोपी शिवलाल हा तिथून पळाला होता. त्यामुळे शिवलालचा शोध घेणे हे पोलिसांसाठी आव्हानच ठरले असते. मात्र, वाहतूक पोलीस दलात कार्यरत असलेले राजेश शेळके यांच्या प्रसंगावधानामुळे शिवलाल तुरुंगात पोहोचला.
शिवलालला कसे पकडले हे राजेश शेळके यांनी सांगितले. ते म्हणाले, संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मालधक्का चौकात एक आरोपी पळताना दिसला. त्याच्यामागे पोलीस देखील होते. त्या आरोपीने पोलिसांच्या दिशेने एकदा गोळीबार देखील केला. ते पाहून मी देखील आरोपीच्या मागे धावत गेलो. आरोपी पुन्हा चौकात गोळीबार करणार त्याच दरम्यान आम्ही एका भिंतींच्या बाजूला थांबलो. तेवढ्यात त्याने गोळीबार केला. त्यावेळी चौकात असलेले नागरिक त्या ठिकाणी आले. आरोपी शिवलाल राव हा चौकातील एका इमारतीमध्ये घुसला. आम्ही त्याच्या मागावर असल्याचे पाहताच शिवलालने पुन्हा आमच्यावर गोळी झाडली. आम्ही पुन्हा भिंतीच्या बाजूला थांबलो. प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. शेवटी आम्ही धाडस दाखवत आत गेलो. त्याला बाहेर पडणे काही शक्य नव्हते, असे त्यांनी सांगितले.
'आरोपी आणि माझ्यात फक्त १५ फुटाचे अंतर होते. नागरिक इमारतीच्या परिसरात जमले होते. संतप्त नागरिक शिवलालच्या दिशेने दगड फेकत होते. तरी देखील त्याने आमच्यावर पिस्तूल रोखून धरून ठेवली होती. पिस्तूलमधील गोळ्या संपल्या होत्या. शेवटी माझ्या डोक्यात नवा प्लॅन आला', असे ते सांगतात. 'मी त्याला सांगितले की पिस्तूल फेकून दे नाही तर तुला लोक दगड मारत राहतील. शेवटी त्याने काही वेळाने पिस्तूल खाली टाकली आणि मी लगेचच त्याला पकडले', असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - चिंचवड एम्पायर इस्टेट जवळील ब्रिज खालील रेल्वे लाईनच्या कडेला एका लाल रंगाचा कापडी पिशवीमध्ये ४३ जिवंत काडतुसे कचरा वेचक महिलेला सापडली आहेत. पिंपरी पोलिसांनी सर्व जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे सापडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सात च्या सुमारास एका ५८ वर्षीय कचरा वेचक महिलेला कचरा गोळा करत असताना एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिजखालील रेल्वे लाईनच्या कडेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. यामुळे महिला घाबरली होती. यासंबंधी महिलेने पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिशवी मधील एकुण ४३ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहे.शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे सापडल्यामळे यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही सर्व काडतुसे कोणाची आहेत, या ठिकाणी कोणी आणून टाकली याचा शोध पिंपरी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्युज - शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला चौदा लाखांपर्यंत वाढून तो ७० लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झाले आहे. नव्या गाडय़ांच्या खरेदीला झालेला विलंब, जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या गाडय़ांवरील देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च, नादुरुस्त गाडय़ांमुळे संचलनात येत असलेले अडथळे, इंधन दरवाढ आणि आस्थापनेवरील खर्च यामुळे तोटा होत असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जवळपास दहा लाख प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. मात्र पीएमपीच्या निष्क्रिय कारभारामुळे उत्पन्न कमी आणि तोटा जास्त असेच चित्र अलीकडच्या काही वर्षांत पुढे आले आहे. यासंदर्भात पीएमपीला मिळणारे उत्पन्न, खर्च आणि होत असलेला तोटा यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेच्या प्रश्नोत्तराद्वारे लेखी विचारणा केली होती. त्यावर पीएमपीने दिलेल्या उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
पीएमपीची संचलनातील तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी अर्थसाहाय्य करावे, असा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यानुसार पीएमपी कंपनीची स्थापना झाल्यापासून या दोन्ही महापालिकांनी मिळून आत्तापर्यंत ९५३ कोटी ९३ लाख रुपये संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दिले आहेत. यामध्ये पुणे महापालिकेचा वाटा हा ५५० कोटी ८२ लाख रुपयांचा असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४०३ कोटी १० लाख रुपये दिले आहेत. दोन्ही महापालिकांकडून तूट भरून काढण्यासाठी अर्थसाहाय्य होत असले तरी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्यामुळे पीएमपीला तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. नव्या गाडय़ांच्या खरेदीची रखडलेली प्रक्रिया, घटती प्रवासी संख्या, आयुर्मान संपुष्टात आलेल्या पण मार्गावर धावणाऱ्या गाडय़ा, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करावा लागणारा मोठा खर्च, इंधनदरवाढ या कारणांचा फटका पीएमपीला बसला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सन २०१७-१८ या वर्षांत दिवसाला १ कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत होते. तर दिवसाचा खर्च हा २ कोटी ३४ लाख रुपये होत होता. दिवसा तोटय़ाचे प्रमाण हे ५६ लाख रुपये असे होते. सन २०१८-१९ या वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात पीएमपीचे दिवसाचे उत्पन्न १ कोटी ६८ लाख रुपये असून दिवसाचा खर्च २ कोटी ३८ लाख आहे. तर दिवसाला होणारा तोटा ७० लाख रुपये असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिवसाला होणारा तोटा ५६ लाख रुपये होता तो चौदा लाखांनी वाढून ७० लाखांवर पोहोचला असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तसेच गतवर्षीपेक्षा उत्पन्न दहा लाखांनी कमी झाले असून खर्चामध्ये दिवसाला चार लाखांची वाढ झाली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002