व्हिएस न्युज - रोजंदारी सफाई कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करुन त्यांना कामावर लागलेल्या तारखेपासून वेतन व विविध भत्त्याच्या फरकाच्या सुमारे ९६ कोटींच्या रकमेपैकी निम्मे म्हणजे ४८ कोटींची रक्कम दोन महिन्यात कोर्टाकडे जमा करावी, असा निकाल जळगाव येथील औद्योगिक न्यायालयाने दिला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
महापालिकेत कार्यरत रोजंदारीवरील ६४५ सफाई कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करून त्यांना त्यानुसार वेतन, लाभ द्यावेत अशी मागणी करणारी याचिका जळगाव महापालिका कामगार युनियनने ३ ऑक्टोबर २००७ रोजी जळगाव येथील औद्योगिक न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने २६ सप्टेंबर २०१७ला निवाडा देत या कर्मचाऱ्यांना कायम सेवेतील सर्व लाभांसह सवलती देण्याचे आदेश दिले होते.
आदेशाची अंमलबजावणी नाही
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाची महापालिकेने कोणतीही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कामगार युनियनने पुन्हा औद्योगिक न्यायालयात आदेशाच्या अंमलबजावणी होण्यासंदर्भात फेब्रुवारी २०१८ला तक्रार दाखल केली. या आदेश व तक्रारीस महापालिका प्रशासनाने मार्च २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.
संघटनेचा अंतरिम अर्ज
दरम्यानच्या काळात कामगार युनियनने पुन्हा औद्योगिक न्यायालयात अंतरिम अर्ज करुन सफाई कामगारांच्या थकीत वेतन फरकाच्या ९६ कोटी ६५ लाख ७७ हजार ६८० रुपये अदा करण्यासंदर्भात मागणी केली.
दोन महिन्यांत ४६ कोटी भरा
त्यावर नुकताच युक्तिवाद पूर्ण होऊन औद्योगिक न्यायालयाने महापालिकेस या थकीत रकमेपैकी निम्मे म्हणजे ४६ कोटी ३२ लाख ८८ हजार ६४० रुपये दोन महिन्यांच्या आत न्यायालयाकडे जमा करावी, असे आदेश दिले आहेत. औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एस.व्ही. सूर्यवंशी यांनी हे आदेश २० सप्टेंबर २०२२ रोजी दिले आहेत.
पुढील काळात दणका बसणार
महाराष्ट्रात मानधन, रोजंदारी, कंत्राटी कामगार पध्दतीचा सुळसुळाट झाला आहे, राज्यात अनेक खाजगी, शासकीय संस्थेसह शेकडो महापालिका, नगरपालिका, नगरपरीषदा, नगरपंचायत, जिल्हापरीषदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी, धर्मदाय, देवस्थान संस्था यांच्या प्रशासनाविरोधात अशाच प्रकारचे विविध खटले प्रलंबित आहेत, या पुढील काळात नक्कीच लाखो कामगारांना न्याय मिळणार आहे, तसेच चुकीच्या धोरणांमुळे शासकीय, खाजगी उद्योग अस्थापनांसह लेबर काँट्रॅक्टरनां न्यायलयाचा दणका बसणार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे कामगार नेते हनुमंत लांडगे यांनी दिली आहे.
व्हिएस न्युज - अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहत असल्यामुळे आईने मारले आणि त्याचा राग मनात धरून शुल्लक कारणामुळे बारावी कक्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. तसेच या मुलाने स्वत:ला वाचविण्यासाठी आईने आत्महत्या केल्याचा बनवही रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लिम शेख (३७) या पती आणि मुलासह लोणी काळभोर पोलीस स्टेसनच्या हद्दीतील उरळी कांचन भागात राहायला होत्या. तस्लिम शेख यांनी आत्महत्या केली अशी माहिती सुरुवातीला पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी सुरु केली असता महिलेचा मुलगा जिशनने (१८) हत्या केली असल्याची कबूली दिली.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बारावीला असलेला जिशनला काही दिवसांपूर्वी अभ्यास करत असताना मोबाईल पाहतो या कारणाने रागावून आईने त्याला मारले होते. याचा राग मनात ठेवून जिशनने त्याच्या आईला आधी भिंतीवर ढकलले आणि नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली, मात्र रक्त न आल्याने त्याने आईला पंख्याला लटकवले आणि आत्महत्या केली असा बनाव केला होता. पोलिसांनी आरोपी जिशनला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातही अशीच घटना
पाच दिवसांपूर्वी घडली होती. पालघर जिल्ह्यातील विरार येथे एका मुलाने आईची हत्या केल्याची घटना घडली होती. घटनेपूर्वी आई आणि मुलामध्ये जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद इतका वाढला की, मुलाने रागाच्या भरात आईचा कपड्याने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विरार येथील २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हीएस न्युज - उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेत 'द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' या गीताचा समावेश असलेल्या आर आर आर चित्रपटाच्या चमूचे प्रतिष्ठित अशा 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले. हे ऑस्कर विजेते भारताने निर्माण केलेल्या सिनेमाच्या संपूर्ण युगाची नवी ओळख दर्शवतात, असे उपराष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सभागृहाला संबोधित करताना अधोरेखित केले.
ऑस्करमधील यश हे जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा आणि मान्यता याचाच आणखी एक पैलू असल्याचे धनखड यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, “या यशातून भारतीय कलाकारांच्या अलौकिक प्रतिभा, अफाट सर्जनशीलता आणि निष्ठा यांना मिळालेली जागतिक प्रशंसा दर्शवते.”
या यशामुळे भारतीय चित्रपट उद्योग मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. राज्यसभेतल्या या त्यांच्या अभिनंदन संदेशाच्या एक दिवस आधी, उपराष्ट्रपतींनी 'द एलिफंट व्हिस्परर'मध्ये 'निसर्गाशी असलेले आपले साहचर्य सुंदर प्रतिबिंबित केल्याबद्दल' प्रशंसा केली होती आणि 'नाटू नाटू' हे गाणे भारताच्या गतिशीलतेचे आणि उर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
माननीय सदस्यांनो, लॉस एंजेलिस येथे आयोजित ९५व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात मिळालेले यश हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. कुमारी कार्तिकी गोन्साल्विसचा पहिला चित्रपट "द एलिफंट व्हिस्पर्स" ने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर जिंकला आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआरच्या मिस्टर एम.एम.कीरावणी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि चंद्र बोस यांनी संगीतबद्ध केलेल्या "नाटू नाटू" या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर मिळाला.
‘द एलिफंट व्हिसपर्स’आणि आरआरआरच्या या यशामुळे भारतात बनलेल्या सिनेमाला एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे भारतीय चित्रपट उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीयीकरण होईल. हे यश भारतीय कलाकारांच्या महान प्रतिभा, अफाट सर्जनशीलता आणि पूर्ण समर्पणाचे जागतिक कौतुक देखील प्रतिबिंबित करतात.
आमच्या जागतिक उदय आणि ओळखीची ही आणखीन एक साक्ष आहे. माझ्या स्वत:च्या वतीने आणि संसदेच्या या वरिष्ठ सदनाच्या वतीने, मी "द एलिफंट व्हिसपर्स" डॉक्युमेंटरी आणि आरआरआर चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचे आणि चमूचे या महान कामगिरीबद्दल अभिनंदन करतो.
व्हिएस न्युज - ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नाविन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक आणि शाळांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गुरवारी दि.९ रोजी ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शाळा म्हणजे बालकांच्या सर्वागीण विकासाचे ठिकाण असते, शाळेच्या वर्गात देशाचे भविष्य घडते. ग्रामीण, दुर्गम विद्यार्थी घडविण्याचे गुरूजनांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. शिक्षकांचा खडतर वाटेवरील हा आशादायक प्रवास सर्वांसमोर यावा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
राज्यातील ६५ हजार ६३९ शासकीय शाळांमधील हजारो शिक्षक उत्तम शैक्षणिक कामगिरी करीत आहेत. मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई उपनगरातील एक मनपा शाळा आणि उर्वरित ३४ जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे एकूण ३५ लेख या पुस्तकात संकलित केले आहेत.
शाळेतूनच आपले मूल गुणवंत होऊन बाहेर पडेल, या विश्वासाने पालक आपले मूल शिक्षकांच्या हाती सोपवतात. पालकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकही सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची ही धडपड म्हणजेच गुणवत्तेकडे वाटचाल करणारा त्यांचा खडतर प्रवास आहे. हा प्रवास शिक्षकांनी आपल्याच शब्दात या लेखांमध्ये मांडला आहे.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचाही सहभाग- कैलास पगारे
प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या या उपक्रमांप्रमाणेच असे असंख्य नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाळांमध्ये सुरू आहेत. यामुळे शासकीय शाळांना चांगला लोकसहभागही मिळत आहे. गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण यातून अपेक्षित आहे. ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमातूनही असंख्य माता गट स्थापन करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग आम्ही वाढवित आहोत, असे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. शाळेत गुणवत्तेचा मळा फुलविण्यासाठी हे लेख सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त व प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न.
व्हीएस न्यूज - अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. रवीवारी (दि. ६ मार्च) जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय सी. जैन, नगरसेवक नाना काटे, जयश्री गावडे, विजय जगताप, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. अशोक पगारिया, रमणलाल लुंकड, दिलीप सोनिगरा, राहुल मुनोत, राजेंद्र धोका, सतीश खाबिया, डॉ सुहास लुंकड, राजेंद्र चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीरंग बारणे उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, संत, महात्म्यांनी सांगितलेल्या विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होण्यासाठी सांगितलेल्या मार्गावर चालणारा जैन धर्म. मनुष्य, प्राणी व वनस्पती या सर्व सजीवांमध्ये आत्मा आहे. या प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे हि संत महात्म्यांची शिकवण जैन धर्मिय आचरणात आणतात. सेवाभावी वृत्ती, दान आणि परोपकार हे जैन बंधू भगिनींचे सद्गुण इतरांना प्रेरणादायी आहेत असेही खा. श्रीरंग बारणे म्हणाले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संजय सी. जैन यांनी मागील वर्षभरात संस्थेच्या वतीने केलेल्या सामाजिक ,सांस्कृतिक ,धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा घेतला. स्वागत संजय सी जैन आणि सपना जैन यांनी केले. आभार संस्थेचे सचिव सचिन मुथा यांनी मानले.
व्हीएस न्यूज - कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली त्या हे मोठे काम आहे. महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक हे अभिनंदनास पात्र आहेत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि देशाचे तसेच भोसरीचे नाव जगात मोठे करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केला.
भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फडणवीस यांनी भोसरी पंचक्रोशीतील दिवंगत पैलवान व वस्ताद यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपस्थित पैलवान वस्ताद यांचा सन्मानाने आदराने उल्लेख केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे होत्या. प्रमुख पाहुणे भाजपा शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, पक्षनेते नामदेव ढाके, ‘ई’ प्रभाग विभाग विकास डोळस, स्थानिक नगरसेवक संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भिमाताई फुगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शहरातील कुस्ती शौकीन व वस्ताद उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, भोसरी गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे भव्यदिव्य देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापुर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पैलवानांना सराव करता येईल यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला आहे.स्वागत आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आणि आभार विजय फुगे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन कोठेही होत नसून या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. स्ट्रॉबेरीला प्राप्त भौगोलिक मानांकनाचा उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी उत्पादकांनी एकत्र येऊन पणन मंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येऊन विक्री तंत्र अवलंबवावे, असे आवाहन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत “स्ट्रॉबेरी पीक उत्पादन, सुगी पश्चात हाताळणी, विपणन, प्रक्रिया संबंधी कार्यशाळा” भिलार ता. महाबळेश्वर येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या कार्यशाळेस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, पणनचे सह सचिव डॉ. धपाटे, कृषीचे उपसंचालक विजय राऊत, कृषी व पणन विभागाचे अधिकारी तसेच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची नवीन ओळख आहे. यासाठी स्व. बाळासाहेब भिलारे व येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांना आधिकाचा फायदा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या मँग्नेट प्रकल्पात स्ट्रॉबेरीचा समावेश केला आहे. मँग्नेटसाठी स्ट्रॉबेरी पिकासंबंधी महाबळेश्वर भागातील दोन संस्थांचे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या काढणी पश्चात हाताळणीसाठी प्रशितकरण, शीतगृह, पॅक हाउस, शीतवाहन, प्रक्रिया युनीट इत्यादी सुविधा निर्माण होणार आहेत.
मॅग्नेट अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकाची शास्त्रोक्त लागवड, काढणी पश्चात हाताळणी, विक्री व प्रक्रिया यासाठी उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था व इतर घटकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिका येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रधान सचिव अनूप कुमार म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये देशपातळीवर अग्रेसर असून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक स्थान निर्देशन मानांकन प्राप्त झाले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय मध्ये नोंदणी करुन घ्यावी तसेच क्यूआर कोडचा जास्तीत जास्त वापर करावा. भिलार ता. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमुळे येथे ॲग्रो टुरिझम हब तयार होईल. टिश्यू कल्चर लॅब तयार करण्यासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापिठे व इतर विभागाच्या सहकार्यातून प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी वाचन करावे म्हणजे स्ट्रॉबेरीच्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळण्यास मदत होईल.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक पध्दतीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. पाऊस व लहरी हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर येथे टिश्यू कल्चर लॅब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाबळेश्वर येथील स्थानिक बाजारपेठेसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधीची तरतूद करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी घेणेही आवश्यक आहे.
यावेळी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांच्या हस्ते स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी स्ट्रॉबेरी विक्री व प्रक्रियेसंबंधी, बाजारपेठ व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पणनचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले.
व्हीएस न्यूज - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले.
यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.
व्हीएस न्यूज - युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थिती बघता तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान आज सकाळी 9 वाजता आले. यामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी 18 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत.
सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेश गंगा’ ही विशेष मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1940’ या विशेष विमानाने 250 विद्यार्थी आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत. सायंकाळी सहा वाजता पुन्हा येणाऱ्या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्य स्थळी पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
व्हिएस न्यूज - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज (रविवार) आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर, या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत. तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं सांगितलं आहे.शिवाय परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच!पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
व्हिएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच येत्या 13- 14 डिसेंबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभरल्या जाव्यात, अशी पंतप्रधान मोदी यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. इथे येणाऱ्या भाविकांना कायम, अव्यवस्था, गर्दीचे छोटे रस्ते, आणि गंगेत स्नान करण्याच्या जागांवर अस्वछता याचा त्रास सहन करावा लागतो. गंगाजल घेणे आणि मंदिरात ते अर्पण करण्याच्या प्रथेच्या पालनातही त्यांना त्रास होतो. त्यामुळे, त्यांना विविध सुविधा देण्यासाठी, श्री काशी विश्वनाथ धाम, या भव्य प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे.या पवित्र प्रयत्नाची सुरुवात करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या जागेवर भूमीपूजन करण्यात आले होते.
या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये श्री काशी विश्वनाथ मंदिराभोवतालच्या 300 हून अधिक मालमत्तांची खरेदी आणि अधिग्रहण समाविष्ट आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या तत्वांच्या आधारे या अधिग्रहणांसाठी परस्पर वाटाघाटी करण्यात आल्या. या प्रयत्नात सुमारे 1400 दुकानदार, भाडेकरू आणि घरमालकांचे पुनर्वसन सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रकल्पाच्या विकासाशी संबंधित अधिग्रहण किंवा पुनर्वसन या संदर्भात देशातील कोणत्याही न्यायालयात खटला प्रलंबित नाही हीच या यशाची साक्ष आहे.
हा प्रकल्प विकसित करताना सर्व वारसा वास्तूंचे जतन केले जावे, हे देखील पंतप्रधानांचे ध्येय होते. जुन्या मालमत्ता नष्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, 40 हून अधिक प्राचीन मंदिरे पुन्हा सापडली तेव्हा ही दूरदृष्टी उपयुक्त ठरली. या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, मूळ रचनेत कोणताही बदल होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या प्रकल्पाची व्याप्ती अशी की, हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती.
कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. वाराणसी दौऱ्या दरम्यान, पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील.
14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
ही परिषद टीम इंडियाच्या भावनेला पुढे नेण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रशासनाशी संबंधित सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी प्रदान करेल.
व्हीएस न्यूज - अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) च्या सदस्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी, इतर गोष्टींबरोबरच, या दृष्टिकोनातून अधिनियमित करण्यात आलेला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध){PoA} कायदा, १९८९ ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय १३ डिसेंबर २०२१ रोजी अत्याचाराविरोधात राष्ट्रीय हेल्पलाइन (NHAA) सुरू करणार आहे.
NHAA संपूर्ण देशभरात टोल फ्री क्रमांक १४५६६ वर चोवीस तास उपलब्ध असेल. देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाईल किंवा लँड लाईन क्रमांकावरून व्हॉईस कॉल/VOIP करून त्यावर प्रवेश केला जाऊ शकतो. ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असेल. त्याचे मोबाईल अॅप्लिकेशनही उपलब्ध असेल.
भेदभाव नष्ट करून सर्वांना संरक्षण प्रदान करणे हा उद्देश असलेल्या कायद्यातील तरतुदींबद्दल माहितीपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा या हेल्पलाइनचा हेतू आहे. प्रत्येक तक्रार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) म्हणून नोंदवली गेली आहे, दिलासा दिला गेला आहे, सर्व नोंदणीकृत तक्रारींची चौकशी केली गेली आहे आणि दाखल केलेल्या सर्व आरोपपत्रांवर निर्णयासाठी न्यायालयात खटला चालवला जाईल - हे सर्व कायद्यातील दिलेल्या कालमर्यादेच्या आत ही प्रणाली सुनिश्चित करेल.
वेब आधारित स्वयं-सेवा पोर्टल म्हणून देखील उपलब्ध, NHAA नागरी हक्क संरक्षण (PCR) कायदा, १९५५ आणि त्याच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करेल. पीओए कायदा, १९८९ आणि पीसीआर कायदा, १९५५ चे पालन न केल्याबद्दल पीडित/तक्रारदार/एनजीओकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीसाठी एक डॉकेट क्रमांक दिला जाईल.
तक्रारदार/एनजीओना दाखल तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन जाणून घेता येईल. कोणत्याही चौकशीला IVR किंवा ऑपरेटरद्वारे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उत्तर दिले जाईल. ही हेल्पलाइन सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ही संकल्पना स्वीकारेल आणि तिला योग्य फीडबॅक व्यवस्था असेल.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002