व्हीएस न्युज - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमध्ये घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तिचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे. तर पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात होता. या दोघाच्या अटकेमुळे या घोटाळ्याला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय ३०) व प्रतिभा रमेश कदम (वय ४०, रा. बोरीवली,मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडेकर याने सीबीआयपुढे दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तर प्रतिभा कदम यांना त्यांच्या राहत्या घरातुन अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चार वर्षापूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद रमेश कदम सांभाळत होते. त्यावेळी त्यांनी संगनमत करून तब्बल ३८५ कोटी रूपयांहून अधिक रूपयांच्या आर्थिक घोटाळा केला होता. या प्रकरणचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने याप्रकरणी कदम याच्यासह १२ जणांना अटक केली होती. दरम्यान कदम हा सध्या ठाणे येथे न्यायालयीान कोठडीमध्ये आहे.
सीबीआयने अटक केलेल्या गाडेकर व कमलाकर ताकवले या दोघांनी सेठी ब्रदर्सचा साखर कारखाना विकत घेण्यासाठी ५ कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. हे पाच कोटी रुपये कदम याने केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील होते. तर कदम याचे बॅॆक अकाउंट प्रतिभा कदम यांच्या नावावर संयुक्तपणे होते. त्याचा वापर त्यांच्याकडुन केला जात होता. सीआयडीच्या पथकाकडुन अनेक दिवसांपासुन कदम व गाडेकर यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती.
व्हीएस न्युज - सोमवारी साजरा होणारा दहीहंडी उत्सव सर्व मंडळांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले ऑटो क्लस्टर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक शनिवारी घेण्यात आली यावेळी शहरातील 51 मंडळांचे अध्यक्ष, पिंपरी, चिंचवड, निगडी,भोसरी, भोसरी एमआयडीसी,दिघी, वाकड, चाकण, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजेवडी, सांगवी, आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते
रानडे यांनी सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे जनतेला नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच दहीहंडी उत्सवात वेळेचे बंधन, डी जे चा वापर न्यायालयाच्या आदेशानुसारच करावा असेही आवाहन रानडे यांनी केले
व्हीएस न्युज - पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे शनिवारी पहाटे अक्षयची पाच जणांनी तलवारीने वार करत हत्या केली. अक्षयच्या वडिलांनी सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता.
अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुणाचा पेट्रोल पंपाजवळ खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी अक्षयच्या घऱच्यांना ही माहिती.
दहीहंदीचा बॅनर लावण्याच्या वादातून पाच जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाचही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील नॅशनल पार्क सोसायटीमध्ये अक्षय गडशी राहण्यास होता.तर त्याचे निलेश चौधरी आणि अन्य चार मित्राशी दहीहंडी चा फ्लेक्स कोणत्या चौकात आणि त्यावर कोणाचे फोटो असावे.यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.तो राग मनात धरून निलेश चौधरी आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या चार मित्रांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास माणिकबाग परिसरात अक्षयवर तलवारी ने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
व्हीएस न्युज - गुंड बापू नायर याच्या टोळीला मदत केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या महिला वकील वर्षा फडके यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर 1 लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती साधना जाधव यांनी मंजुर केला आहे.
एका प्रकरणात नायर याची आई, पत्नी पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या अटकेची परवानगी लष्कर न्यायालयाने दिली होती. त्यावेळी अटकेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, असे खोटे शपथपत्र दाखल करुन त्या दोघींना स्वत:चे ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघींना न्यायालयात हजर न करता पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणात ऍड. वर्षा यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना मोक्का लावण्यात आला होता. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार, ऍड. मंगेश देशमुख आणि ऍड. अशोक मुंदरगी यांनी यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ऍड. फडके यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, त्यांना जामीन मंजुर करावा, अशी मागणी केली होती. ती न्यायालयाने मंजुर केली.
व्हीएस न्युज - कामगारांच्या हितासाठी नागरिकांना त्रास न होता वेळप्रसंगी आंदोलने, संप करून व्यवस्थापनाला व सरकारला भूमिका बदलविण्यास भाग पाडणारे कामगार नेते अशी शरद राव यांची ओळख होती. कामगारांच्या भल्यासाठी संघर्ष कधी करायचा आणि कधी थांबवायचा हे राव यांनी देशभरातील कामगार संघटनांना शिकविले. त्यांच्या विधायक दृष्टीकोनामुळेच तळेगावमध्ये कामगार व त्यांच्या मुलामुलींसाठी डॉ. राम मनोहर लोहिया विद्यापीठासारखी प्रशिक्षण संस्था उभी राहिली, हे अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळेगाव येथे काढले.
शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, माजी खासदार विदुरा (नाना) नवले, आमदार संजय भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, फेडरेशनचे कार्याध्यक्ष शशिकांत (बबन) झिंजुर्डे, नूर अहमद (कलकत्ता), देवेंद्र गौतम (राजस्थान), शंकर साळवी, सुरेश ठाकूर, साईनाथ राजाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मूर्तीकार संदीप मुंढे, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, नितीन समगिर, अंबर चिंचवडे आदींसह राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांचे कामगार प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
शरद राव यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार पवार यांनी सांगितले की, 1967 साली मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळी कामगार क्षेत्रात जॉर्ज फर्नांडीस यांचे मुंबईमध्ये वर्चस्व होते. खासदारकीच्या निवडणुकीत स. का. पाटील यांचा पराभव शरद राव आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या जोडीने केला. हिंदुस्थान लिव्हरमधील कामगार लढ्यापासून जॉर्ज फर्नांडीस यांना खासदार करण्यापर्यंतच्या कार्यकालात शरद राव यांचे नाव पुढे आले. मुंबई देशाची औद्योगिक व आर्थिक राजधानी आहे. तेथे घडणा-या घटनांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबई ठप्प झाली होती. पंतप्रधानांनी मला मुंबईत पाठविले, त्यावेळी सरकारी अधिकारी व मुंबई मनपाचे कामगार नेते म्हणून शरद राव यांच्या बरोबर बैठक मी घेतली. मुंबईतील लोकल, बेस्ट आणि आरेची दूध गाडी सुरु झाली तर मुंबई पूर्ववत सुरु होईल, असे मी मत मांडल्यानंतर शरद राव यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील लोकल व बेस्ट बससेवा पुन्हा सुरु करण्यास पुढाकार घेतला. मुंबईसह 18 राज्यातील, 18 लाखांहून जास्त कामगारांचे, विविध कामगार संघटनांचे नेतृत्व शरद राव यांनी केले. यापूर्वी मी तळेगावात त्यांच्या बरोबर आलो होतो, आता त्यांच्याशिवाय आलो आहे. शरद राव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. मनपा कामगारांना 15 टक्के बोनस देण्याबाबत त्यांची आग्रही भूमिका होती. म्हणूनच मी मनपा कर्मचा-यांना बोनस देऊ शकलो. यापूर्वी महानगरपालिकांचे निर्णय आयुक्त व कामगार प्रतिनिधी यांच्या चर्चेव्दारे सुटत होते. आता महापालिका, नगरपालिकांचे छोटे-मोठे निर्णय मंत्रालयातून घेतले जातात, हे चांगल्या सरकारचे लक्षण नाही. मुंबई म्यूनिसिपल मजदूर युनियनचा गेल्या दोन वर्षांपासून वेतन करार प्रलंबित आहे, याबाबत आपण लवकरच कामगार प्रतिनिधींना बरोबर घेऊन सरकारशी चर्चा करू, असे आश्वासन खा. पवार यांनी दिले. तसेच जॉर्ज फर्नांडीस, बाळासाहेब दंडवते यांच्यानंतर कामगारांचे हित पाहणारा नेता म्हणून शरद राव यांचे नाव भारतीय कामगार इतिहासात नोंदविले जाईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सहा वर्षे आजारपणाशी लढत होते, तसेच अंथरूणाला खिळून असणारे कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, जसवंत सिंग यांच्या आजारपणाविषयी मला अस्वस्थता वाटते, असेही खा. पवार म्हणाले.
स्वागताध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी सांगितले की, एका गरीब कामगाराच्या घरात शरद राव यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
ॲड. महाबळ शेट्टी यांनी सांगितले की, शरद राव यांचे दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय-हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटलेले, प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका - परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभियंत्यांची दैदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष लढ्याचे भिष्म पितामह विख्यात कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ॲड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. राव यांचे हे स्मारक कामगारांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असेही शेट्टी म्हणाले.
जलतरणपटू शाम शिंदे, मूर्तीकार संदीप मुंढे, महानगरपालिका फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे, नाना ओरपे, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा खा. पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, चित्रा जगनाडे, नूर अहमद, शंकर शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांची विशेष मेाहीम; चार दिवसांत १२ हजार जणांचा ‘ऑनलाइन’ निषेध
व्हिएस न्युज - हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात आणि ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना येत असलेले अपयश लक्षात घेऊन हिंजवडी परिसरात काम करणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचारी (आयटिअन्स) वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकवटले आहेत. ‘फ्री अप हिंजवडी’ या मोहिमेद्वारे लढा देण्यास सुरुवात झाली असून अवघ्या चार दिवसांत तब्बल १२ हजार जणांनी ऑनलाइन माध्यमातून स्वाक्षरी करत वाहतूक कोंडीचा निषेध केला.
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हिंजवडी परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे दररोज हजारो कर्मचारी नियमित जा-ये करीत असतात. तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील कंपन्यांमध्ये जाण्यासाठी आयटिअन्सना वाहतूक कोंडीमुळे किमान दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागत आहे. वर्षांनुवर्षे ही परिस्थिती कायम असून वाहतूक कोंडी दूर करण्याची केवळ चर्चाच होत आहे. हायपरलूप, मेट्रो, बीआरटी, नव्याने काही पर्यायी मार्ग असे आश्वासन आयटिअन्सना देण्यात येत आहे. पण वाहतूक कोंडी होणाऱ्या लहान-मोठय़ा बाबींकडे शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळेच आता ही कोंडी फोडण्यासाठी ‘फ्री अप हिंजवडी’ ही मोहीम आयटिअन्सनी हाती घेतली आहे. त्याबाबतची माहिती या मोहिमेचे समन्वयक सुधीर देशमुख यांनी दिली.
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यापूर्वीही आयटिअन्सनी वाहतूक सुधारणेचा आराखडा केला होता. आयटिअन्सना भेडसाविणारे प्रश्न मांडतानाच कोंडी होणारे रस्ते, डार्क स्पॉटची निश्चिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आराखडाही त्यांनी शासकीय यंत्रणांना सादर केला होता. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, ग्रामपंचायत अशा संबंधित घटकांकडून हतबलता व्यक्त होत असल्यामुळे स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. www.change.org यावरून आयटिअन्सने स्वाक्षरी मोहीम राबवली असून या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे.
भविष्यात भीषण वाहतूक कोंडी
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन ठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. भूमकर चौक आणि वाकड चौक ही दोन ठिकाणे त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. सहा वेगवेगळे मार्ग याच ठिकाणी एकत्र येतात. या भागातच प्रामुख्यानेवाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्क सहा टप्प्यात उभारला जाणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांची उभारणी सुरु झाली आहे. उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण झाले तर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होणार आहे.
शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पीएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. या शासकीय यंत्रणांकडे त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असून वाहतूक नियंत्रण दिव्यांची उभारणी, अतिक्रमणमुक्त रस्ते, तसेच रस्त्यांवरील खड्डय़ांची दुरुस्ती होत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
प्रश्न नव्हे, उपायांचाही पर्याय
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा आराखडाही यापूर्वी करण्यात आला होता. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या नऊ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा. पीएमआरडीएकडून या भागाचा विकास आराखडा प्राधान्याने करावा. पीएमआरडीए आणि एमआयडीसीने अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करावी. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशा काही मागण्या आयटिअन्सकडून करण्यात आल्या आहेत.
हे उपाय..
कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम
वाहतूक कोंडीमुळे तीन लाख कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तीन ते सहा किलोमीटर अंतरासाठी दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागतो. प्रती दिन किमान एक लाख वाहने हिंजवडी आयटी पार्ककडे जातात. वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात असल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत आहे.
व्हीएस न्युज - चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून डांबून ठेवल्याने रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि बिर्ला रुग्णालयातील बाऊंसर तसेच रुग्णालयावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या रुग्णाचा मुलगा संजय दशरथ आरडे (वय ३८, रा. कैलासनगर, पाण्याच्या टाकीजवळ, पिंपरी, मूळ रा. चिलवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांचे वडील दशरथ शिवाजी आरडे (वय ७२) यांना पिंपरी येथील राहत्या घरी ६ ऑगस्ट रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे त्यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल करताना उपचारासाठी सुरूवातीला दहा हजार रुपये भरण्यात आले. उपचारानंतर दशरथ आरडे यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने दशरथ आरडे यांच्यावरील उपचारापोटी ८६ हजार ५८३ रुपयांचे बिल त्यांच्या हातात ठेवले. आरडे कुटुंबिय गरीब असल्यामुळे त्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपण दारिद्य्र रेषेखालील असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितले. कायद्याने आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे आदित्य बिर्ला रुग्णालयाला बंधनकारक आहे.
रुग्णालय व्यवस्थापनानेही त्याबाबतचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावलेला आहे. त्यामुळे आरडे कुटुंबियांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे कागदोपत्री पुरावे देऊनही दुबे यांनी त्यांना उपचाराचे संपूर्ण बिल भरावे लागेल, असे सांगितले. वारंवार विनंती करूनही दुबे यांनी त्यांचे ऐकले नाही.
त्यामुळे संजय आरडे यांनी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांना घेऊन ते रुग्णालयात गेले असता रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना रुग्णाला भेटू दिले नाही. तसेच रुग्णाला जेवणही दिले जात नव्हते. रुग्णाला भेटण्याचा प्रयत्न केल्यास तेथे सुरक्षेसाठी ठेवलेले बाऊंसर यांनी आरडे यांना धक्काबुक्की केली. गेल्या दहा दिवसांपासून हा सर्व प्रकार सुरू होता.
अखेर आरडे यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत धर्मादाय आयुक्ताकडे धाव घेतली. धर्मादाय आयुक्ताने सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांच्याशी संपर्क साधला. रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे पुरावे असून, रुग्णाला डिस्चार्ज देण्यास सांगितले. तसेच याबाबत वाकड पोलिसांनाही कळविण्यात आल्याने त्यांनी दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुबे यांनी बुधवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजेपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल, असे धर्मादाय आयुक्त व वाकड पोलिसांना आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला नाही.
संजय आरडे यांनी दुपारपर्यंत वाट पाहून वडिलांना डिस्चार्ज न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख, लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे, ग्राहक हक्क संघर्ष समिती अध्यक्ष अमोल उबाळे, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या महिला अध्यक्षा संगीता शहा, रिपब्लिकन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारत मिरपगारे, सामाजिक कार्यकर्ते रवि भोसले, अंजना गायकवाड, मल्लाप्पा याड्रमी, जितू गिल यांच्यासह वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर वाकड पोलिसांनी आदित्य बिर्ला रुग्णालय, रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ संजय दुबे आणि बाऊंसर विरोधात दशरथ आरडे यांना इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वाकड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश दत्तात्र्य माने तपास करत आहेत
व्हीएस न्युज - चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून रुग्णाला गेल्या ९ दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर व रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अजिज शेख, त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यासंदर्भात अजिज शेख यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “दशरथ शिवाजी आरडे (वय ७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दहा हजार रुपये भरले. तसेच रुग्णालयाने त्यांना औषधे बाहेरून आणण्यास लावले. त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत. वास्तिवक दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले. तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत.
उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, उपचाराचा खर्च देण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे रुग्णालयाने गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. दशरथ आरडे यांना रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी अक्षरशः डांबून ठेवले आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
व्हीएस न्युज - सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतीबा मंगल कार्यालय येथे १५ आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्गवासीय उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका उषा (माई) काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद राणे, परशुराम प्रभू, अरविंद पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. परीक्षक म्हणून शोभा गायकवाड, मेघा साईल यांनी काम पाहिले. नाट्यसिंधूच्या वतीने प्लॅस्टिकबंदीबाबत समाज प्रबोधनपर एकांकीका सादर करण्यात आली. ‘शिक्षणाचा सोपा मार्ग’ या विषयावर वक्ते सदाशिव पांचाळ यांचे व्याख्यान झाले.
स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, कोकण महासंघाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, शिवसेना जिल्हा संघटीका सुशिला पवार, माजी नगरसेविका विजया सुतार, प्रमोद ताम्हणकर, उद्योजक संतोष सुतार, अविनाश चाळके यांच्या हस्ते जिल्हा अंतर्गत दिला जाणारा ‘सिंधुदुर्ग जिल्हा भुषण पुरस्कार’ कोकण कन्या रिना व वर्षा विश्वास केसरकर या दोन उच्चशिक्षित तरुणींना देण्यात आला. या दोघी बहिणींनी वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषांनाही लाजवेल अशी शेती करुन तरुणांपुढे एक आदर्श घडविला आहे.
सदरच्या मंडळांतर्गत दिला जाणारा पुरस्कार चंद्रकांत नाईक यांना देण्यात आला. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार, मानपत्र, शॉल, श्रीफळ असे होते. त्याचप्रमाणे पाच ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत चव्हाण, गणपत सावंत, शरद कवठणकर, भास्कर प्रभू, मधुसुदन परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या प्रसुती रुग्णालयांतील ताण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएमएच) पडत असल्याने अनेक बाळांतनींची गैरसोय होते. ही गैरसोय रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला सात दिवसांच्या आत आदीत्य बिर्ला स्मृती रुग्णालयाबरोबर (एबीएमएच) करारनामा करण्याचे आदेश दिले आहेत. या करारनाम्यानुसार महापालिकेच्या आकुर्डी, सांगवी, थेरगाव, तालेरा, जिजामाता, यमुनानगर व भोसरी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत उद्भवणाऱ्या तातडीच्या उपचारांसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात येते. वायसीएमएचमध्ये पुर्वीपासूनच उपचारासाठी आलेल्यांची गर्दी व त्यातून या सातही रुग्णालयांतून शिफारशीने दाखल झालेल्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर रुग्णालयीन कामावर ताण येतो. यामुळे अनेक वेळा लेबर रुममध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे एबीएमएचने वायसीएमएचला पुढील तीन महिन्यांसाठी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आज अखेर महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी मान्यता दिली.
याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या स्त्री रुग्णांना रात्रीच्या वेळी प्रसुतीमध्ये अडचण उद्भवल्यास असे रुग्ण एबीएमएचकडे रेफर करण्यासाठी मान्यता दिली आहे.
महापालिकेद्वारे प्रसुतीसाठी एबीएमएचमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडून अथवा नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरुपाचा खर्च आकारण्यात येणार नाही. उपचार अथवा तपासणीचा खर्च आकारल्याची तक्रारी प्राप्त झाल्यास करार रद्द करण्यात येईल. तसेच सध्या वायसीएमएचमध्ये उपलब्ध नसलेला कॅन्सर सेवा देखील एबीएमएच पुरवणार आहे.
एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी
व्हीएस न्युज - गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सव्र्हरवर हॅकरने हल्ला चढवून रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लांबविल्या प्रकरणात देशभरातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अडीच हजार व्यवहारांद्वारे विविध एटीएम केंद्रांतून अडीच कोटी रुपये काढण्यात आले आहेत. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्याचे काम विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे.
तांत्रिक माहिती क्लिष्ट असल्याने या माहितीचे विश्लेषण क रण्यास वेळ लागणार आहे. महाराष्ट्रातील ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. त्या एटीएम केंद्रात असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, मुंब्रा तसेच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यात येणार आहे.
बँकेच्या खातेदाराने पैसे काढले का अन्य दुसऱ्या व्यक्तीने हे पैसे काढले, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त सिंह यांनी सांगितले.
काही एटीएम केंद्रातील कक्षात सीसीटीव्ही चित्रीकरण अंधुक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्रीकरण सुस्पष्ट करण्यात येणार आहे. कॉसमॉस प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी कॉसमॉस बँकेकडून तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे.
रेल्वेच्या २९ वाघिणींद्वारे १४.५ लाख लिटर पाणी रवाना
व्हीएस न्युज - केरळमध्ये पावसाच्या थैमानाचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूरस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न तेथे निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पुणे आणि रतलाम येथून पिण्याच्या पाण्याने भरलेल्या एकूण २९ वाघिणींद्वारे केरळच्या कायनकुलम स्थानकावर तब्बल साडेचौदा लाख लिटर पाणी शनिवारी संध्याकाळी रवाना करण्यात आले आहे. साधारणत: चोवीस तासांच्या कालावधीत हे पाणी केरळला पोहोचणार आहे.
केरळमध्ये आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागात विजेसह पिण्याचे पाणीही बंद करण्यात आले आहे. अनेक ठिकणी धर्मशाळांमध्ये किंवा निवारा उभारून पूरग्रस्तांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. विविध ठिकाणांहून अनेक प्रकारची मदत पूरग्रस्तांना केली जात असतानाच रेल्वेने मात्र मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे विभागाने तातडीने पाण्याच्या वाघिणींची व्यवस्था केली. शुक्रवारी संध्याकाळपासूनच घोरपडी येथील यार्डात पुणे रेल्वेच्या पथकाने वाघिणींमध्ये पाणी भरणे सुरू केले.
रेल्वेकडे असलेल्या पाण्यासह अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेरून पाणी आणून १४ वाघिण्यांमध्ये प्रत्येकी ५० हजार लिटर पाणी भरण्यात आले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाणी भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
रतलाम येथूनही पाण्याच्या १५ वाघिणी पुण्यात येणार होत्या. त्यानुसार पुण्यात इंजिनची व्यवस्था तयार ठेवण्यात आली. दुपारनंतर रतलाम येथील गाडी पुण्यात पोहोचल्यानंतर या गाडीच्या वाघिणी पुण्याच्या गाडीला जोडण्यात आल्या. त्यानंतर पाण्याने भरलेल्या २९ वाघिणी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केरळकडे रवाना करण्यात आल्या.
पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याची विशेष रेल्वे दौंड, वाडी, रेनुगुंटा या मार्गाने केरळच्या कायनकुलम स्थानकावर जाणार आहे. त्या ठिकाणी केरळ सरकारकडून आवश्यकता असलेल्या भागात पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.
पुणे विभागातून दुसऱ्यांदा गरजवंतांसाठी पाणी
लातूरमध्ये २०१६ मध्ये पाऊस दीर्घकाळ लांबल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर रेल्वेच्या पुणे विभागाने पुढाकार घेऊन पाण्याच्या विशेष गाडय़ा लातूरला पाठविल्या होत्या. रेल्वेच्या पाण्याच्या वाघिणी त्या वेळी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. राजस्थानमध्ये सातत्याने विविध भागात पाणी रेल्वेने पोहोचवावे लागते. त्यामुळे तेथे या वाघिणी उपलब्ध असतात. लातूरला पाणी देण्यासाठी राजस्थानमधून पाण्याच्या वाघिणी मागविण्यात आल्या होत्या. रेल्वेने पाणी पाठविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर आता केरळला पाणी पाठवून पुणे विभाग दुसऱ्यांदा गरजवंतांची तहान भागविणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002