व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड : पेट्रोलचे दर मागील काही दिवसांपासून गगनाला भिडले असल्याने सामान्यांना त्याची झळ बसत आहे. विरोधकांनी अनेक आंदोलने करुनही काहीही फरक पडला नसून दरवाढीवर नियंत्रण आलेले नाही. असे असतानाच एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. याचे कारण म्हणजे शहरातील डुडळगाव येथे चक्क बोअरवेल पाण्याऐवी पेट्रोल येत आहे. आता हे असे कसे काय याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर तांत्रिक बिघाडामुळे हे झाले आहे. या अनोख्या गोष्टीमुळे गावकऱ्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील डुडळगाव येथे एका शेतकऱ्याच्या बोअरवेलमधून चक्क पेट्रोल निघत आहे. या प्रकरणाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने याची पाहणी केली. ही बोअरवेल शिवाजी तळेकर यांची असून त्यांची भातशेती आहे. भाताला पाणी देत असताना तळेकर यांच्या पाण्याच्या पाईपमधून पेट्रोल येत असल्याची गोष्ट लक्षात आली. मग थोडा शोध घेतल्यानंतर शेजारी भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप असून पेट्रोलची साठवणूक करणाऱ्या टाकीला गळती लागल्याने हे झाल्याचे लक्षात आले. पंपात जमिनीमध्ये असणाऱ्या टाकीतून पेट्रोल जमिनीमध्ये झिरपले. आणि मातीतून ते अवघ्या ९० ते १०० मीटर अंतरावर असलेल्या तळेकर यांच्या शेतातील बोअरवेलमधून पाण्यासोबत येऊ लागले.
व्हीएस न्युज - मुस्लिम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे. तसेच गोरक्षा, लव जिहाद, मुस्लिम व्यक्तींची समूहाकडून (मॉब लिंचिंग) होणाऱ्या हत्या रोखाव्यात यासह अनेक मागण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वतीने मुस्लिम मूक महामोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
पुण्यातील गोळीबार मैदानावरून निघालेला मूकमोर्चा सेव्हन लव्ह चौकापासून रामोशी गेट, केईएम हॉस्पिटल, नरपतगिरी चौक, जिल्हा परिषदेची जुनी इमारत तेथून पुढे विधानभवनासमोर मोर्चाचा समारोप झाला.
धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, यासह विविध मागण्याचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या मागण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. तसेच या मोर्चात पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
व्हीएस न्युज - दिनांक ९/९/२०१८, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिला प्रथम स्थानावर होत्या. त्यांच्या प्रेरणेनेच महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने आतापर्यंत मराठा समाज आरक्षण व इतर न्याय हक्क मागण्यांसाठी राज्यभरातून अठ्ठावन्न मूकमोर्चे काढले. या मूकमोर्चानंतर ठोक मोर्चेदेखील काढले.
नऊ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी झालेल्या महामोर्चातून समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. मागील तेरा महिन्यात मराठा समाजाच्या पदरात मात्र काहीही पडलेले नाही. सरकार फक्त वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे. या सर्व आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परंतू समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे समन्वयक काम पाहत आहेत त्यामध्ये महिलांचा समावेश करून घेण्यात आला नाही. आता राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य या महिलांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून महिलांचे राज्यव्यापी संघटन उभारण्यात येणार आहे. याची पहिली राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली. आज रविवारी, पिंपरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच दिनांक अकरा सप्टेंबरला नांदेड येथे जिल्हा बैठक होणार आहे. याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व शहरांत या महिन्यात बैठका घेऊन समाजात जनजागृती करण्यात येणार आहे.
आगामी सर्व आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग, महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या पुणे प्रतिनिधी उषा पाटील यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी स्वाती पवार, अर्चना काकडे, ज्योती सपाटे, मीरा ढोके, संगिता कोरे, सलोनी भोसले, मीना पावडे, शकुंतला भोसले, स्वाती पवार आदी उपस्थित होते.
पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठराव पास करण्यात आले. यामध्ये मराठा& समाजाच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी& सरकारने निश्चित तारीख जाहिर करावी. या आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविणे. मराठा आरक्षणावर शैक्षणिक क्षेत्रात चालू& वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करण्याबाबत शासनाने आदेश काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे. राज्य शासनाने मराठा& समाजासाठी देऊ केलेल्या सात शासन निर्णयाबाबत जनजागृती करणे. तरूण तरूणी व शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी& मार्गदर्शन करणे. मराठा विद्यार्थ्यांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा& समाजाच्या मुला-मुलींच्या सर्वप्रकारचा शैक्षणिक खर्च, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व इतर& व्यावसायिक शिक्षणासाठी असणारी फि शंभर टक्के माफ करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित& स्मारकाची उंची कमी करू नये. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फक्त मराठा समाजासाठी सिमित करून& ताबडतोब विनातारण कर्ज पुरवठा व सबसिडी पुरवठा सुरु करावा. या महामंडळाचे फक्त अध्यक्षाचे नाव सरकारने जाहिर केले& आहे. मात्र अद्यापपर्यंत निधिची तरतूद केली नाही. मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधून डॉ. पंजाबराव देशमुख& वार्षिक वसतिगृह भत्ता शहरी दहा हजार रुपये, ग्रामीण आठ हजार रुपये हा अपुरा पडत असून यामध्ये शहरी पन्नास हजार& रुपये, ग्रामीण चाळीस हजार रुपये वार्षिक भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा.
२०१४ साली& ईएसबीसी& प्रवर्गातून भरती झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ कायम नोकरीत सामावून घेण्यात यावे. शेतक-यांच्या शेतमालास हमी भाव देण्याबाबत निर्णय घ्यावा. राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही स्वायत्त संस्था सक्षमपणे& कार्यान्वित करून मराठा समाजासाठीच सिमित असावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षण, प्रशिक्षण व& अभ्यासिकासाठी रोख स्वरुपात अनुदान द्यावे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना भरीव अनुदान व सवलती& द्याव्यात. गरज असेल तिथे विनातारण शैक्षणिक कर्ज द्यावे त्याचे व्याज सरकारने भरावे. उद्योग व्यवसायासाठी जाहिर& करण्यात आलेले 605 अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाचा समावेश करावा.& &
व्हीएस न्युज - भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा अर्ज दिला आहे.
घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. मुलींना पळवून आणण्यास मदत करेल या वक्तव्याचा सर्व स्तरातील महिलांनी समाचार घेतला आहे. याच संदर्भात चाकणकर यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यात कदम यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचे म्हटले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या विषयावर चाकणकर म्हणाल्या की, कदम यांचे वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. परिचारक, दानवे, छिंदम अशा भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत कदम अव्वल ठरले आहेत. त्यांच्या या वाक्यामुळे समस्त महाराष्ट्राच्या माता- भगिनींचा अपमान झाला असल्याने या संबंधीचा अर्ज दिला आहे. अविचारीपणे महिलांबद्दल जीभ सैल सोडून बोलणाऱ्या कदम यांनी फक्त माफीनामा नाही तर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
व्हीएस न्युज - घरकाम करणाऱ्या महिलेने ज्या घरांमध्ये ती काम करायची त्या घरांमध्ये थाेडेथाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केले. या दागिण्यांची किंमत 5 रुपये इतकी अाहे. चाेरी करणाऱ्या महिलेला सिंहगड राेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात येत अाहेत. मंगळवारी ही घटना समाेर अाली.
याप्रकरणी प्रिती गिरीधर करंदीकर (38 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अाराेपी महिला ही करंदीकर यांच्याकडे 2018 पासून स्वयंपाकी म्हणून काम करते. करंदीकर यांनी त्यांचे वडिलाेपार्जित दागिने ज्या कपाटात ठेवले हाेते, त्या कपाटाला त्या कुलूप लावायला विसरल्या हाेत्या. ही गाेष्ट माेलकरणीच्या लक्षात अाली हाेती. तिने मागील दाेन ते तीन महिन्यांपासून थाेडे थाेडे दागिने चाेरण्यास सुरुवात केली. मंगळवारी करंदीकर या घर अावरत असताना त्यांना कपाटातील दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात अाले. त्यांच्या घरातील माेलकरीण ही इतर ठिकाणी सुद्धा काम करत असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनीही त्यांच्या घरातील 7 ते 8 ताेळे दागिने चाेरीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे माेलकरणीवर संशय वाढल्याने करंदीकर यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी माेलकरणीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दागिने चाेरल्याची कबुली दिली.
व्हीएस न्युज - पुणे शहरात उच्छाद मांडलेल्या मोकाट डुकरांना चाप लावण्याची खूणगाठ महापालिका प्रशासनाने बांधली असून शहरात मोकाट अगर भटकी डुकरे आढळल्यास त्यांना 'शूट ऍट साईट'चे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या डुकरांच्या संख्येमुळे नागरिक वैतागले आहेत. कचराकुंड्या, नाल्यांजवळ आढळणाऱ्या डुकरांमुळे अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. महापालिकेने वेळोवेळी नसबंदी करूनही डुकरांची संख्या आटोक्यात येत नव्हती. ही डुकरे रस्त्यात आडवी जात असल्याने नागरिकांना दुखापतही झाली आहे. या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही अनेकदा चर्चा झाल्या आहेत.
अखेर महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर कठोर पावले उचलली असून त्यादृष्टीने जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या प्रकटनात महापालिका अधिनियमातील तरतूदीचा आधार महापालिका प्रशासनाने घेतला असून, महापालिकेकडून येत्या 10 सप्टेंबर पासून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रकटनामध्ये पुणे शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांच्या उपद्रवामुळे मालमत्तेचे नुकसान, रहदारीस अडथळा झाल्याचे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. डुकरांपासून संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाल्याचे त्यात म्हटले आहे.तसेच महानगरपालिका अधिनियम चॅप्टर १४ (२२)(३) मध्ये कोणतेही डुक्कर भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्त निर्देश देतील अशा रीतीने त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येईल आणि अशा रीतीने कोणत्याही डुकराबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणताही दावा सांगता येणार नाही अशी तरतूद आहे असे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
आयुक्त सौरभ राव यांनी कार्यभार घेतल्यापासून हा पहिलाच धडाकेबाज निर्णय असून त्याचे कोणते पडसाद शहरात उमटतात हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
व्हीएस न्युज - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात एक विचित्र अपघातझाला आहे. या अपघातात सुमारे 10 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (6 सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला तो धडकला. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकली. यामध्ये 5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात सकाळी 6 वाजता एक ट्रक आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक लेन बंद होती.
या दरम्यान अपघातापासून काही किलोमीटरवर एक आयशर ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूने वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या रोपला जाऊन धडकला. या रोपला धडकल्यानंतर तो मधल्या लेनमध्ये आल्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेल्या काही गाड्या या एकमेकांवर आदळू लागल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील या विचित्र अपघातात काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
व्हीएस न्युज - क्रोधावर नियंत्रण मिळवायचे असेल तर, नामस्मरण, तप आणि साधना आवश्यक आहे. शांततेचा, समाधानाचा मार्ग काम, क्रोधावर मात केल्याने सापडतो. आई वडीलांचा त्याग आणि कष्टामुळेच आपल्याला समाजात ‘ओळख’ मिळालेली असते. शिक्षण, संपत्तीने तुम्ही कितीही मोठे झाला तरी आई वडीलांपेक्षा कोणीही मोठे होत नाही. आपल्याला भावी काळात मुला-सुनांकडून मानसन्मान मिळावा अशी अपेक्षा असेल तर प्रथम आपल्या आई वडील, सासू सास-यांचा मानसन्मान ठेवा आणि तसेच संस्कार आपल्या मुलांवर करा, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.
निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.
प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, घर, व्यवसाय, व्यवहार बदलून जीवन बदलत नाही, तर स्वभावात बदल केला की जीवनात बदल घडेल. पाश्चात्य संस्कृतिच्या आकर्षणापायी फॅशनच्या नावाखाली कपड्यांची मॅचिंग करण्याऐवजी अंत:करणपूर्वक कुटुंबातील इतरांच्याबरोबर स्वत:ला मॅच केले तर जीवनभर सुखाची प्राप्ती होईल, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या.
व्हीएस न्युज - भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या निंदाजनक वक्तव्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर आणि पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निदर्शने करीत राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध केला.
वैशाली काळभोर व गिरीजा कुदळे निषेध व्यक्त करताना म्हणाल्या की, भाजप नेत्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. त्यामुळे ते आता हुकूमशाही, दडपशाही बरोबरच महिलांना देखील अपमानास्पद वागणूक देत आहेत. महिलांचा सन्मान राखणाऱ्या भारत देशाच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहे. महिलांचा अनादर करणारे निंदनीय वक्तव्य भाजप आमदार, प्रवक्ते राम कदम यांनी मुंबईत दहीहंडीच्या कार्यक्रमात केले. 'मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणुन लग्न लावून देण्यास मदत करणार' असे ते म्हणाले. यातून त्यांची संस्कृती दिसून येते. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा भाजपचा नारा सोडून कदम "बेटी भगाव" हा नवीन नारा त्यांच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये मुलीं व महिलांविषयी हिंसक भावना वाढीस लागेल. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. राम कदम यांनी महिलांची जाहीर माफी मागावी. अन्यथा राज्यभर कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन आंदोलन तीव्र करु असा इशारा काळभोर व कुदळे यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अरुण बो-हाडे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, उषा वाघेरे, माई काटे, शितल काटे, सुलक्षणा धर, विनया तापकीर, निकिता कदम, स्वाती साने, गिता मंचरकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख तसेच पुष्पा शेळके, शामलाताई सोनवणे, बिंदू तिवारी, मनिषा गटकळ, कविता खराडे, अरुणा कुंभार, विश्रांती पाडाळे, विनीता तिवारी, वैशाली कुदळे, वंदना कुदळे, प्रकाश सुर्यवंशी, विनोद कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, सिंधुताई पांढरकर, सायराबानू शेख, शितल कोतवाल, आनंदा यादव, इम्रान शेख, अशोक कुंभार, सहजादी सैय्यद आदींसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
व्हीएस न्युज - प्रभाग क्रमांक 27, रहाटणी-काळेवाडी भागातील जय भवानी चौकात पाण्याचा वॉल्व नादुरूस्त असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. वॉल्व दुरूस्त करून पाण्याची नासाडी थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी केले आहे.
यासंदर्भात दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रहाटणी-काळेवाडी भागातील जय भवानी चौकात पाण्याचा वॉल्व नादुरूस्त अवस्थेत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून याकडे लक्ष देऊन वॉल्वमधील दुरूस्ती करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्युज - दहीहंडी उत्सवाच्यादरम्यान अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मराठी अभिनेता संतोष जुवेकरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर विनापरवाना स्टेज उभारून ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप आहे.
सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरातील अरण्येश्वर चौकात अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळातर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या मधोमध स्टेज उभारुन कार्यक्रम घेण्यात आला होता. तसेच मोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण करून कार्यक्रम सुरू होता.
या कार्यक्रमासाठी सुमारे २०० ते ३०० लोक याठिकाणी जमल्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगूनही कार्यक्रम बंद केला गेला नाही. यामुळे संतोष जुवेकरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान संतोषशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता त्याने सांगितले, की “दहीहंडीच्या दिवशी मी माझ्या घरीच होतो, पुण्यात नव्हतोच. तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मला कुणी बोलावलेही नव्हते, त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे, याविषयी मला काहीच कल्पना नाही.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचा अध्यक्ष सिद्धांत मदन प्रधान (रा. नूतन महाराष्ट्र सोसायटी, पद्मावती) स्टेज मालक राजवानसिंग बलीसिंग राठोड (रा. गणेशपार्क, वाघजाईनगर कात्रज), साउंड सिस्टीमचे मालक विजय बापूसाहेब वरूटे (रा उचगाव जि. कोल्हापूर) अशी इतरांची नावे आहेत.
व्हीएस न्युज - ‘मुंबई-पुणे’ द्रुतगती महामार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग येत्या गुरुवारी (ता. ६) दुपारी बारा ते दोनपर्यंत बंद राहणार आहे. खालापूर टोलनाक्यापूर्वी ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद राहणार आहे, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
यासाठी दोन तासाचा अवधी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या कालावधीत अवजड मालवाहतूक वाहनांना सोडण्यात येणार नाही. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002