व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्रामध्ये सोमवार, दि १ ऑक्टोबर २०१८ रोजी २७ वर्षीय रुग्ण महिला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले व त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यकृत, दोन मूत्रपिन्ड, दोन नेत्रपटल हे अवयवदान केले.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र पुणे यांच्या प्रतीक्षा यादी प्रमाणे यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल हे अवयव डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे तर दुसरे मूत्रपिंड नाशिक येथील खाजगी रुग्णालयात येथे देण्यात आले. ५८ वर्षीय रुग्ण यकृत विकाराने ग्रस्त होता या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण तर २७ वर्षीय रुग्ण ८ महिन्यापासून मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता या रुग्णावर मूत्रपिंडप्रत्यारोपण तसेच दोन रुग्णांवर नेत्रपटल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते व अवयव प्रत्यारोपण टीमची यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ भाग्यश्रीताई पाटील यांनी ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत अवयवदानच्या या धाडसी निर्णयाबद्दल नातेवाइकांचे आभार मानले.
अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. अवयवदात्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आभार मानले तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी विश्वस्थ डॉ. सोमनाथ पाटील व डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांनी डॉकटर्स टीम, भूलतज्ज्ञ कर्मचारीवर्ग यांचे कौतुक केले.
दि ११ /१० /२०१८रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत डॉ अमरजित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ वत्सला स्वामी संचालिका शैक्षणिक विभाग, सौ भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्षा डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटी, डॉ जे. एस भवाळकर अधिष्ठाता, डॉ पी एस गरच्या कॉर्पोरेट हेड, डॉ वैशाली भारंबे प्राध्यापिका उपस्थित होत्या.
व्हीएस न्युज - तक्रार करायला आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली होती. पोलिसानेच तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित विवाहितेचे वय ३६ वर्ष असून आरोपी पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १० ऑक्टोबरला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, ‘मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला’. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडित महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असं त्याला सांगितलं.
मुलाने पीडित महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट ‘आय लव्ह यू’ म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
व्हिएस न्युज - पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना अशाप्रकारे भाजपा आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू होते. त्या महिन्याभराच्या कालावधीत आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांनी त्यांना सतत फोन करून काम करू न देण्याची धमकी दिली. त्याला योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तर ७ सप्टेंबर रोजी त्यांना फोनवरून ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. तर याप्रकरणी फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हीएस न्युज - पाण्याचा ड्रमला लाथ मारण्याच्या झालेल्या किरकोळ कारणावरून चुलत भावासह दोघांनी मिळून चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. विनोद उर्फ पप्पू मातफेर गिरी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आकाश विनोद गिरी (वय २२. महात्मा फुले नगर झोपडपट्टी भोसरी) याने भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ पप्पू गिरी (मूळ गाव उत्तर प्रदेश) हे महात्मा फुले नगर झोपडपट्टी भोसरी येथे रहावयास होते. ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गुरुवारी मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या जय प्रकाश गिरी (वय ३८) बाबुराम गिरी (वय ४०) दयाराम गिरी (वय ३५) या आरोपी पैकी एकाने शेजारी राहणाऱ्या विनोद गिरी यांच्या घरा समोर असलेल्या ड्रम ला लाथ मारली. या कारणावरून विनोद गिरी व आरोपी त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी गिरी यांना मारहाण करून चाकूने वार केले. या घटनेत विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारा करिता वाय सी एम रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश नांदुरकर सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली.
व्हीएस न्युज - पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. आज रोजी (सोमवारी) प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे रसायन गुजरात येथे पाठविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या साहित्याचे ट्रक पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील सतर्क कामगारांनी हा डाव उधळून लावला. कामगारांची उपासमार थांबवून कंपनी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, वेतन करार करून थकबाकी देण्यात यावी, निवृत्त कामगारांनाही त्याचे लाभ मिळावेत, नंतरच कंपनीतून प्रयोगशाळेचे साहित्य पाठविण्यास संमती देऊ, अशी भूमिका कैलास कदम यांनी घेतली. तर आवश्यक रसायनच कंपनीतून पाठवण्यात येत आहे, अशी कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे होते. मात्र, सदर वाहनांमध्ये प्रयोगशाळेतील रसायनाबरोबरच काही मशिनरीदेखील या वाहनांमध्ये असल्याचे कामगारांनी बंदोबस्तावरील पोलीस पथकाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे फक्त रसायनच पाठविणार असाल तरच आम्ही बंदोबस्त देऊ, अन्यथा आम्ही आपणास सहकार्य करू शकणार नाही अशी भूमिका भासेरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी घेतली. अखेर कंपनी व्यवसथापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलीस फौजफाटा तेथून निघून गेला.
पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि. 25 ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे. डाई-ईची करकरिया ही कंपनी पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे 54 वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने माननीय न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. असे असूनही कंपनी व्यवस्थापनाने सोमवारी प्रयोगशाळेसाठी लागणारे आवश्यक साहित्य गुजरात येथे पाठविण्याची तयारी केली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी उपस्थित कामगार, त्यांचे कुटुंबियांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून कंपनीतील वाहने बाहेर पाठविण्यास विरोध केला.
यावेळी कंपनीचे संचालक डॉ. संजय पुरव यांनी मशिनरी बाहेर पाठविली जात नसून केवळ रसायन पाठविण्यात येणार आहे, कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही, चर्चेने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, 11 वर्षांपासून आमचा शांततेच्या मार्गाने लढा सुरू आहे. व्यवस्थापनाने कामगारांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील कासारवाडीस्थीत कंपनीतून मशिनरी अन्यत्र स्थलांतरीत करण्यास मज्जाव केला आहे, याची आठवण कदम यांनी करून दिली. तसेच न्यायालयाची प्रत उपस्थित पोलीस अधिकारी, कंपनी व्यवस्थापनास दिली. यावर आम्ही संघटनेच्या व्यक्तिंशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यावर कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांची समिती तयार केली आहे, ते आपल्याकडे मागण्या मांडतील, त्यावर चर्चा करावी, नंतरच कंपनीतून संबंधित वाहने साडावीत अशी मागणी कदम यांनी केली. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून निर्णायक प्रतिसाद मिळाला नाही.
कंपनी व्यवस्थापनाने यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून कंपनी व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हिंद कामगार संघटनेची मागणी आहे की, पूर्वी 200 कोटींचा टर्नओव्हर होता, तो आता 1200 कोटींवर गेला आहे. आता केवळ 27 कायम कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे.
2008 सालापासून प्रलंबित असलेला कामगार वेतन करार कामगार संघटनेशी चर्चा करून केला पाहिजे. तसेच कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु करण्यात यावी व निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागेवर नव्याने कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात यावी. व त्यांना संघटनेचे सभासद होण्यासाठी हक्क मिळावेत. कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे. तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे. या विषयाबाबतच हिंद कामगार संघटना न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कैलास कदम यांनी दिला आहे.
यावेळी आनंदराव फडतरे, मारुती पाटील, शिवाजी मंडलिक, संजय काशिद, कमलाकर इंगळे, शिवाजी घाटे, वीरसेन ननवरे, विनायक पोतदार, गणपत जगदाळे, सुरेखा ससाणे, रामचंद्र पवार, प्रल्हाद भाकरे, बबन घाटे, बिलास बधे, सत्यवान गवस, शांताराम कदम, एल. एम. पिंटो, राजेंद्र नांगरे, सदानंद जोशी, कृष्णानंद साई, डेव्हीड खरात, राजेंद्र नांद्रे, वसंत नागोसे, पद्माकर मोडक, घनश्याम भारंबे, मेहमूद सुतार, नामदेव होले, ज्ञानेश्वर जाधव, केशव जाधव, रमेश रबडे, राजेंद्र पवार, छबू जवळकर, शिवाजी हांडे, अंकुश करके, बाळू थिटे, रिचर्ड, श्यामराव शिंदे, नाथूराम फाळके, प्रकाश पवार, रवी दीक्षित, भोजा मुलीया, जेरॉय लोबो, आनंद भोसले, भीमराव साळवी, दशरथ शेडगे, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
अतिक्रमण विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या - सुंदर कांबळे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाद्वारे दिनांक 4/10/2018 रोजी वाकड, ताथवडे, पुनावळे या परिसरांमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता महापालिकेचे अतिक्रमण विभागातील कर्मचारी आले असता वाकड मध्ये पिंपरी चिंचवड मनपा च्या जागेवर एका लोकप्रतिनिधीने मोठ्या प्रमाणामध्ये पत्रा शेड मारून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्या लोकप्रतिनिधीला अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली, लोकप्रतिनिधीने जागा रिकामी करण्यास नकार दिल्यामुळे अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या पत्रा शेड वर कारवाई केली. याविषयी महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले.
निवेदनामध्ये ते म्हणाले की" कारवाई दरम्यान या लोकप्रतिनिधींनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये येऊन सर्व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिली" तुम्ही मला वाँर्ड मध्ये दिसला तर तुमचे हात पाय तोडतो" असे म्हणत अर्वाच्च भाषेचा वापर करून शिवीगाळ केली त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागातील निरीक्षक, अभियंता आणि इतर कर्मचारी अशा एकूण सात कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी महापालिकेमध्ये येऊन धमकी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही कर्मचारी दुसऱ्या दिवशी भीतीपोटी कामावर आले नाही, तर काही कर्मचारी कामाला येतात परंतु साइटवर जात नाही आणि काही कर्मचारी आपली बदलीची मागणी करताहेत.
सुंदर कांबळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिनांक 4/10/ 2018 रोजी घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी करावी व ज्या लोकप्रतिनिधींनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला अशा लोकप्रतिनिधींची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात बांधकाम परवाना अतिक्रमण विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची विनंती केली.
व्हीएस न्युज - संगमनेर येथून तब्बल १ टन गोमांस विक्रीसाठी मुंबई येथे घेऊन जात असलेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये पकडून दिला आहे. कै.आप्पासाहेब चिंचवडे चौकात, चिंचवड पोलीसांच्या मदतीने सापळा रचून रविवारी पहाटे हा टेम्पो पकडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि.७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत संगमन्र येथून गोमांसने भरलेला पूर्ण पत्र्याची बॉडी असलेला टेम्पो (क्र. MH.03.CP.3686) येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. गोरक्षकांनी कै.आप्पासाहेब चिंचवडे चौक येथे साफळा रचून हा टेम्पो थांबवला. आणि पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती देऊन पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेतला. पोलिसांनी ड्रायव्हर मोहम्मद तन्वीर यकीन अली शेख व क्लिनर मोहम्मद जमाल गफूर कुरेशी यांचीकडे चौकशी केली असता, त्यांनी संगमनेर गावात मोसीन (नाव पत्ता माहीत नाही) याने शेतामध्ये गोमांस टेम्पोत भरून मुंबई येथील शहनवाज कुरेशी यांच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी एकून १ टन वजनाचे गोमांस असल्याचे दिसून आले. कसायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गोमांस कापणारा मोसीन, गोमांस विकत घेणारा शहनवाज कुरेशी, ड्रायव्हर व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्याण अधिकारी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
यावेळी बजरंग दलाचे मंगेश नढे, उपेंद्र बलकवडे, अभिजित चव्हाण, आशुतोष कदम, यशंवत कर्डिले, कुणाल साठे, अभिजीत शिंदे, गौरव पाटील, ओंकार मानकर, महेश शर्मा, योगेश चिंचवडे, निखील भालके, धनंजय गावडे, गणेश गावडे, पराग ढोरे आदी गोरक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
व्हिएस न्युज - पिंपळे सौदागरमधील डॉक्टर तरूणीच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकल्याने दुर्दैंवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना पुणे-भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली.
डॉ. कृपाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कृपाली आज सायंकाळी पुण्याहून भोसरीकडे अॅक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. त्या नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून चार नागरिकांचा हकनाक बळी गेल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीत अठराशे अधिकृत फलक आहेत, तर सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. जाहिरात फलकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना महापालिका अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी गंभीर नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेकडून अनधिकृत फलकांची संख्या सव्वातीनशे असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त संख्येने अनधिकृत फलक शहरात आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत, धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या मोठी आहे. राजकीय लागेबांधे आणि प्रशासकीय हतबलता यामुळे अशा जाहिरात फलकांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी उभे करण्यात येणारे जाहिरात फलक किंवा फ्लेक्स आणि विनापरवाना जाहिरात फलक उभे करुन त्यापासून उत्पन्न मिळवणारे फलक असे फलकांचे दोन प्रकार शहरात आहेत. महापालिकेकडे फलकांवरील कारवाईची माहिती ही सरसकट स्वरुपाची आहे. महापालिकेकडून फ्लेक्स आणि जाहिरात फलक यांच्यावरील कारवाईची संयुक्त माहिती आहे. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात केवळ सव्वाशे अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसात जाहिरात फलक कोसळून दोन नागरिकांचा बळी शहरामध्ये गेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. त्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरु आहे. गेल्या सहा महिन्यात सव्वाशे फलकांवर कारवाई केली आहे, तसेच बावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करुन ते काढून घेण्यात येणार आहेत. – विजय खोराटे, सहायक आयुक्त, महापालिका
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाहिरात फलकांची पाहणी करावी. कमकुवत असलेल्या जाहिरात फलकांचे सांगाडे सुरक्षित करण्याचे आदेश संबंधित जाहिरात संस्थेला द्यावेत. तसेच अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी. – दत्ता साने, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महापालिका
व्हिएस न्युज - चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या ‘एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेना गटनेते राहुल कलाटे व मारुती भापकर यांनी शनिवारी (दि.६) सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयीन कामकाजानंतर सुरु झालेले हे आंदोलन माहिती मिळाल्याशिवाय मागे न घेण्यावर कलाटे व भापकर ठाम होते. सहशहर अभियंता कार्यालय रात्री नऊ वाजेपर्यंत हा ठिय्या होता.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे कारण पुढे करत, तीन महिन्यांपूर्वी याठिकाणच्या लहान बांधकामांना वगळून इतर सर्व बांधकामांना पाणी पुरवठ्यासाठी ‘एनओसी’ देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. यावर मोठी टीका झाली होती. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगेलच ‘शाब्दिक युद्ध’ रंगले होते. यामध्ये आरोपाच्या फैरी झडल्या होत्या. आमदार जगताप यांना पत्रकार परिषद घेत, याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतरही ही बंदी कायम होती.
दरम्यान, गुरुवारपासून (दि.४) पाणी पुरवठा विभागाच्या वतीने बांधकामांना पुन्हा ‘एनओसी’ देण्यास सुरुवात झाली. याची माहिती समजताच राहुल कलाटे यांनी प्रभारी सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या कार्यालयात जाऊन, याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी केली. तत्पूर्वी देखील हा निर्णय कोणत्या आधारे घेतला होता, याबाबत कलाटे यांनी तीन-चार वेळा मागणी करुनही पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली नाही.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, रामदास तांबे यांनी ही माहिती गोपनीय असून, ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली असल्याचे सांगितले. ती माहिती आयुक्तांकडून घ्या, असे कलाटे यांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कलाटे यांनी तांबे यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. आयुक्त हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांचा मोबाईल ‘स्वीच ऑफ’ लागत होता. त्यामुळे आयुक्त मुख्यालयात येईपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे तांबे यांची मोठी गोची झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरुच होते
व्हीएस न्युज - निगडी मिलींदनगर येथे राहते घरात एका तरुणाच्या डोक्यात सीमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. तुकाराम गुरपा शिंदे (२२, रा. मिलिंदनगर, निगडी) या तरुणाचा खून झाला आहे. तर भाऊ सुरेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार निगडी पोलिसांना सकाळी आठच्या सुमारास समजला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम आणि त्याचा भाऊ सुरेश हे दोघे मिलिंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर नेहमी प्रमाणे दोघे झोपले होते. दरम्यान पहाटेच्या वेळी अज्ञात व्यक्तीने दोघा भावांवर हल्ला केला. डोक्यात सीमेंटचे गट्टू टाकले आहेत. हा प्रकार सकाळी समजताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना रुग्णालयात दाखल केले असता तुकाराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. तर भाऊ जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला, खून कोणी आणि का केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा पथक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - शेती माल हमी भाव, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, आदी विषयात सरकार अपयशी ठरले अाहे. ‘असत्य, हिंसा, अशांती’च्या मार्गाने सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू आहे. त्याच्या निषेधार्ध आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘मौन’धारण करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले.
पिंपरीतील खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आले असून दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, नगरसेविका संगीता ताम्हाणे,सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेवक अतुल शितोळे, महंमद पानसरे, निलेश पांढरकर, पंडीत गवळी, राजेंद्र साळुंखे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विश्रांती पाडाळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002