व्हीएस न्युज - पित्ताच्या खड्याच्या औषधोपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेलेल्या एका गर्भवती महिलेचा डॉक्टरांनी दिलेल्या गर्भपाताच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. ही घटना डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान घडली.
अनुसया राठोड असे मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुर्यकांत लक्ष्मण राठोड (वय ५२, रा. १८२, केअर ऑफ अशोक किसन भेगडे, खळवाडी-घेरावाडी तळेगाव दाभाडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुर्यकांत राठोड यांची पत्नी अनुसया राठोड यांना पित्ताच्या खड्यांचा त्रास होता. यावर औषधोपचार करण्यासाठी त्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन सोनोग्राफी केली. यामध्ये त्या गरोदर असल्याचे समजले. पित्ताच्या खड्यांवर उपचार करण्यासाठी अनुसया यांना इंजेक्शन देऊन गर्भपात केला. मात्र त्या मागील परिणामाची माहिती डॉक्टरांनी सुर्यकांत आणि त्यांची पत्नी अनुसया यांना दिली नाही. तसेच गर्भपाता झाल्यानंतर अनुसया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी अनुसया यांच्या केसपेपरवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली तसेच सुर्यकांत यांच्या बऱ्याच ठिकाणी सहया घेतल्या. यामुळे सुर्यकांत यांनी अनुसया यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात डॉक्टरांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - सारसबागेकडून दांडेकरपुलाच्या दिशेने जाताना पर्वती पुलाजवळ जनता वसाहत जवळून जाणारा मुळा कालवा आज सकाळी अचानक फुटला. कालव्यातून लाखो लिटर पाणी जवळ असलेल्या आंबिल ओढा वसाहतीमध्ये शिरून येथील रहिवाशांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले तर अनेक दुचाक्या वाहून गेल्या.
येथील रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले.
याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आंबील ओढा वसाहतीमधील घरात पाणी शिरले असून घरातील गॅस सिलेंडर, अनेक वस्तू, भांडी पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून गेल्या आहेत. अनेक वस्तू, गॅस सिलिंडर डेक्कन जवळील नदीपात्रात वाहून आल्या. डोळ्यासमोर स्वतःच्या घरातील पैसे, साहित्य वाहून जाताना पाहून महिलांना अश्रू आवरणे अवघड झाले.
या घटनेमुळे अलका चौक, स्वारगेट टिळकरस्ता, बाजीराव रस्तावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पाण्याचा प्रवाह वाढत असून वरून पाणी बंद केले असले तरीही अंतर खूप असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्यास वेळ जाणार आहे.
घटनास्थळी महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली असून बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बाधित नागरिकांची जवळच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या.
व्हीएस न्युज - मंदिरा जवळ खेळत असलेल्या दोन मुलींवर रविवारी चॉकलेटचं आमिष दाखवून रविवारी बलात्कार करण्यात आला. या दोघींपैकी एकीचं पोट खूप दुखू लागलं आणि ती जागेवरच बेशुद्ध झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेल्यावर संपूर्ण घटना डॉक्टरांच्या तपासातून उजेडात आली. याच मुलीचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि आरोपी गणेश निकमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं.
काय आहे घटना?
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या दोन मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या दोन मुलांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. चॉकलेट मिळणार म्हणून दोघीही मंदिराच्या मागे गेल्या.
त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. दोघींनाही मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान काल बुधवारी मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घडलेला प्रसंग घरच्यांना समजला तेंव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना विश्वास दिला. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपले सण, उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करावेत. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव देखील पिंपरी - चिंचवड शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणा-या पवित्र इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजक पुढाकार घेऊन काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आसवाणी असोशिएटस् आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. याचा गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी - चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवाणी यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच खासगी जागेत गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 17) आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्त हर्डीकर यांनी स्वहस्ते गणेश मृर्तीचे हौदात विसर्जन केले. माजी आमदार अण्णा बनसोडे, भाजपा शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगसेवक शीतल शिंदे, डब्बू आसवाणी, नगरसेविका सीमा सावळे, उद्योजक राजू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, विजय आसवाणी, सुरेश जुम्माणी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका माधुरी मुलचंदाणी, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी, जयहिंद हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
विजय आसवाणी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, वैभवनगर येथे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. यामध्ये आठ फुट, नऊ फुट, बारा फुट आणि सोळा फुट खोलीचे हौद आहेत. याठिकाणी गणेश मृर्तिंचे विसर्जन करावे यासाठी जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिका-यांना भेटून आवाहन व प्रबोधन केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी पिंपरीगाव, काळेवाडी, तापकीरनगर भागातील छोट्या मोठ्या मंडळांनी, सोसायटीतील मंडळांनी आणि घरगुती एकूण 265 गणेश मृर्तिंचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दि. 23 सप्टेंबरपर्यत याठिकाणी हि सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतील. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
व्हीएस न्युज - गरीबांना उपचार नाकारणार्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
येरवडा येथील बारा वर्षाच्या मुलावर अनामत रक्कम भरली नाही म्हणून रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडताना दिसतात. अनामत रक्कम सक्तीने मागणार्या धर्मादाय रुग्णालयावर कारवाई करावी व तातडीने उपचार सुरू करावेत या प्रमुख मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या व तीव्र निदर्शने करण्यात आली.
धर्मादाय रुग्णालयांनी आढेवेढे न घेता तातडीने उपचार सुरू करावेत. बिलाचे पैसे भरण्याची पात्रता नसल्यास मृतदेह अडवून ठेवू नये, मृतदेह अडवणार्या हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. रुबी हॉल हॉस्पिटलवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करावा इ. मागण्या सहआयुक्त धर्मादाय मा. नवनाथ जगताप यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये शहराध्यक्ष दत्ता सुरते, कार्याध्यक्ष डॉ. आनंद कांबळे, कार्याध्यक्ष तेजश्री पवार, शहरसचिव समीर वाव्हळे, शहर उपाध्यक्ष सुधीर गडवीर, सरचिटणीस संध्या चौरे, संगीता सोनवणे, सोनाली बढे, नितीन शिंदे, साधना मिसाळ, मुकुंद गायकवाड, सुजाता गुरव, रमेश म्हस्के आदींसह सुमारे दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या पूर्ण झाल्या असल्याचे राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्ये गेल्या आनेक दिवसांनपासुन काही ठराविक परीसरात स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्या वरून पाणीपुरवठा विस्कळीत केला जात आसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांच्या या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत आणि या घानेरड्या वृत्तीला आळा घालण्यासाठी युवराज दाखले यांनी शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने निषेध व्यक्त करत 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना आज निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की "संबंधित पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे त्वरित आदेश देण्यात यावे. पाच दिवसांच्या कालावधीत जर पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक न केल्यास शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने सदरील ठिकाणच्या महिला भगिनिंनच्या सोबत आयुक्त कार्यालयातून "हंडाभर पाणी भरो" आंदोलन केले जाईल.
व्हीएस न्युज - झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथ सहा महिन्यापासुन पुर्णपणे उखडलेल्या अवस्थेत आहे. सदर ठिकाणी सतत कचऱ्याचा ढीग साचलेला असतो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, या संर्दभात 'क' प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख श्री.गणेश जाधव,श्री.विद्यासागर गायकवाड,श्री.गोरकनाथ कवडे, श्री.कैलास कुदळे यांनी आज रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की " पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला आहे परंतू फुटपाथ, रस्ते, स्वच्छता या बाबत नागरिकांन मध्ये नाराजी आहे. झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथचे काम त्वरित करण्यात यावे आणि या परिसरात पालिके तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. निवेदनावर पालिके द्वारा केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरुपात सात दिवसात सादर करण्याची मागणी हि केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. वाहतूक कोंडीतून थोडी उसंत मिळाल्यानंतर शहरातील छोटे-मोठे गुन्हेगार आता त्यांच्या रडारवर आले आहेत. गणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. ऑटोक्लस्टर येथे सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारताच काही दिवसात हिंजवडी येथील ५४ कंपन्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी सोडून जाणार असल्याची ‘फेक न्यूज व्हायरल’ झाली. याची गंभीर दखल घेत आयुक्त पद्मनाभन यांनी स्वतः हिंजवडीच्या रस्त्यावर उतरून वाहतूकीचा आढावा घेतला. आयुक्तांनी निरीक्षण करून हिंजवडीमध्ये चक्राकार वाहतूकीचा बदल सूचवला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूकीतील या बदलांना स्थानिकांनी विरोध केला. मात्र, या बदलांमुळे स्थानिकांना कसा फायदा होणार हे आयुक्तांनी त्यांना विश्वासात घेत समजावून सांगितले. काहीच दिवसात स्थानिकांना देखील या बदलाचे फायदे दिसू लागल्याने स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच आयटीयन्सने देखील आयुक्तांच्या निर्णयाचे भरभरून कौतुक केले.
शहराच्या इतर भागाची देखील पाहणी करून आयुक्तांनी बदल सुचवले. वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणार्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्याने वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटणार्यांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता आयुक्तांनी गुन्ह्यांच्या फायलींची चाचपणी सुरु केली आहे.
वाहतूक कोंडी पाठोपाठ शहरातील गुन्हेगारीमुळे देखील नागरिक हैराण असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारांची माहीती घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गणेशोत्सवसानंतर शहरातील गुन्हेगारांवर कारवायांचा धडाका सुरु करणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. आयुक्तालयापूर्वी परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. तलवारीचा नंगा नाच शहरवासीयांनी पहिला आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी तसेच त्या गुन्ह्याची माहिती त्यांनी मागवली आहे. यापूर्वी घटनेनंतर केवळ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हीएस न्युज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज (सोमवारी)भारत बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून राज्यभरात मनसेने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
पिंपरीत देखील मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकत्यांनी ठिय्या मांडला आहे
. पुण्यावरुन निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली आहेत.
व्हीएस न्युज – बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांच्या समर्थकांनी एका शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास निगडी येथील निवेदिता बँकेसमोर घडली. संजय कुऱ्हाडे असे मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गणेश कराडसह पाच ते सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी ‘प्रीतम मुंडे’ देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच कारणावरुन आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. तसेच फेसबुक लाईव्ह सुरू करुन आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएस न्युज - गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका वडापाव विक्रेत्यालाही जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रामनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन गायकवाड, किरण विटकर, मयूर संजय विटेकर (वय १९, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) अशी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. वैभव माने (वय २२), रमजान शेख (वय १९, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर याची रामनगर येथे राम मंदिरासमोर वडापावची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी वैभव, रमजान आणि त्यांचा आणखी एक साथीदार वडापावच्या गाडीजवळ गणेश उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी मयूर याचा मित्र किसन गायकवाड आणि किरण विटकर हे दोघे गाडीजवळ थांबले होते. आरोपींनी किसन याच्याकडे गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी आणि किसन यांच्यामध्ये वाद सुरु झाले. वैभव याने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान आणि अन्य एका आरोपीने किरण याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभव याने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू मयूरच्या डोक्यात मारला. या मध्ये मयूर गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप फरार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - सर्वसामान्यपणे एका गटातील प्राण्याला एकाच प्रकारचे अवयव असतात. पण नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात नुकतीच एक कोंबडी सापडली आहे. आता कोंबडी म्हटल्यावर तिला दोन पाय, एक चोच, डोक्यावर तुरा, दोन डोळे असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण निगडी परिसरात असणाऱ्या एका चिकन सेंटरमध्ये चक्क चार पायाची कोंबडी आढळली आहे. या कोंबडीला चार पाय असल्याने तन्वीर नाव असलेल्या या चिकन सेंटरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चार पायांची ही कोंबडी कशी दिसते हे पाहायला बघ्यांची एकच गर्दी झाली होत आहे.
कुतबुद्दीन होबळे याचे मागील ३० वर्षांपासून चिकनचे दुकान आहे. त्यांचा मुलगा तन्वीरही आता त्यांच्यासोबत हाच व्यवसाय करतो. एकदिवस सकाळी नेहमीप्रमाणे तन्वीरने कोंबड्या कापायला घेतल्या. त्यात एका कोंबडीला कापत असताना तिला चार पाय असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही गोष्ट त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावेळी कुतबुद्दीन यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. मात्र त्यांनी प्रत्यक्ष या कोंबडीला पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मग अतिशय कमी कालावधीत ही गोष्ट संपूर्ण शहरात पसरली.
मग कापायला आणलेली ही कोंबडी काहीशी वेगळी असल्याने तिला न कापण्याचे होबळे पिता-पुत्रांनी ठरवले. आता ते तिची काळजी घेत असून या कोंबडीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ४ पाय असल्याने या कोंबडीबाबत विशेष उत्सुकता असल्याने काहींनी या कोंबडीला काहीशा जास्त किंमतीत विकत घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र आपण या कोंबडीला विकणार नसून जोपर्यंत ती जगेल तोपर्यंत तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणार असल्याचे चिकन सेंटर मालक कुतबुद्दीन यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002