व्हीएस न्युज - मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकल, मोबाईल फोन, आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
स्वप्निल सिद्धाराम माडेकर (वय 25, रा. आनंदनगर चिंचवड), काशीमाप्पा शरणप्पा म्हेत्रे (वय 22, रा. चाकण. मूळ रा. गुलबर्गा), राजेंद्र गंगाधर फाकटकर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलिस हवालदार पढेर, पोलीस नाईक मावसकर, ढोले, केकाण आणि पोलीस कॉन्स्टेबल बोडके शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर व पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, दोन मुले रावेत कॉर्नरजवळ थांबले असून त्यांच्याकडे चोरीचा मोबाईल फोन आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी (एम एच 14 / जी झेड 3518), मोबाईल फोन, रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य मिळाले. याबाबत चौकशी केली असता चोरट्यांनी चिंचवड मधील युनिक हॉस्पिटल येथून दोन लाख 47 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन अशी एकूण दोन लाख 57 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून अधिक चौकशी करून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील अटक केली.
तिन्ही आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल फोन, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त केला.
व्हीएस न्युज - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा. बावधन, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनीतील इयत्ता चौथीत शिकणारा गौरव ऊर्फ यश चव्हाण हा शुक्रवारी (ता. २८) रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आईने वाई पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्तीजवळ धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी भुईंज पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आईला विश्वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना सांगितली. अश्विनी व सचिन हे दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अश्विनी ही मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही दुचाकीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थंडपेयाची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही दुचाकीवरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी मुलाला बाटलीतून काय दिले, असा जाब अश्विनीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नवऱ्यालाही मारून टाकीन, अशी धमकी देत यशला कालव्यात ढकलून दिले. त्याने आईला हाकही मारली परंतु; अश्विनी काहीच करू शकली नाही. दोघांनाही आज अटक करण्यात आली. वाईच्या न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर तपास करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके व पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी तपासात मदत केली.
गौरव हा संशयित सचिनवर होता चिडून
सचिन कुंभार हा रात्री-अपरात्री फोन करून आश्विनीशी बोलत असे. या वेळी गौरव हा आईच्या कुशीत झोपलेला असे. त्यामुळे त्या दोघांमधील संवाद तो ऐकायचा. सचिन हा अनेक वेळा तिच्या घरी जात असे. त्यावेळी अनेकदा गौरवही तेथे असायचा. त्याचे घरी येणे व आईला फोन करणे हे गौरवला आवडत नसे. एकदा आई घरी नसताना सचिन हा अश्विनीच्या घरी आला होता. त्यावेळी गौरवने त्याला रागामध्ये मला आईविषयी काही विचारायचे नाही, असे सुनावले होते. त्यामुळे आरोपी सचिन गौरववर चिडून होता. गौरवमुळे अनैतिक संबंधाचे बिंग फुटेल, याची त्याला भीती होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पो. नि. खोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
व्हीएस न्युज - पुणे - देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते.
देवाची ऊरळी येथील राजु भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
व्हीएस न्युज - भारतातील माओवादी क्रांतीचे मूळउद्दीष्ट हे भारतीय लोकशाहीला मानणा-या नागरिकांचा बुद्धीभेद करणारे आहे. आदिवासींमधून सकारात्मक विचारांचे नेतृत्व उभे राहत असेल तर नक्षलवादी, माओवादी बंदुकीच्या धाकाने अशा व्यक्तींना संपवत आहेत. दलित माओवादी बनत नसून माओवादीच दलितांचा टार्गेट म्हणून वापर करीत आहे. माओवादी हे दलित समाजात आम्ही आंबेडकरवादी आहोत असे सांगतात आणि दुसरीकडे संविधान नाकारतात, हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच संसदीय मार्गाचा स्विकार केला आहे. कुठलीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.
चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष आहे. तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी उपस्थितांशी स्लाईड-शो व्दारे संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा देव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, सुहास पोफळे, गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, शिल्पा वाघुले, हेमा सायकर, कविता शिंदे, प्रा. महादेव रोकडे, विजय भिसे, कैलास बहिरट, राजेंद्र घावटे, दिलीप बोंबले आदी उपस्थित होते.
कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या की, नक्षलवाद किंवा माओवाद हा गेल्या पन्नास वर्षांपासून देशाला पोखरत आहे. यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. नक्षलवाद आता गडचिरोलीपुरता मर्यादित नसून शहरापर्यंत तो फोफावला आहे. 31 डिसेंबर 2017ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर तथाकथित बुद्धीवाद्यांना अटक करण्यात आले. त्यांनतर पुन्हा माओवाद व नक्षलवादावर चर्चा सुरु झाली. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही. शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढतो असे दाखविणारे हे ‘माओच्या’ विचाराने काम करीत असतात. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीत 1967ला उठाव झाला. तो प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. हे त्यांच्याच दस्तऐवजामधून दिसते. आदिवासींना जमिनी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून मतदानाऐवजी बंदुकीच्या जोरावर सत्ता हस्तगत करायची अशी शिकवण माओची आहे. आदिवासींसाठी माओवाद नसून उलट आदिवासी कायम माओवादासाठी वापरले जातात. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर शहरी भागातील अनेकांनी सोशल मिडियातून ‘#मी टू अर्बन नक्सल’ अशी भूमिका घेऊन नक्शलवाद्यांना पाठिंबा दिला. आदिवासी भागामध्ये नोक-या व विकास नाही; म्हणून माओवादी विरोध करतात. तर दुसरीकडे शिक्षित व्यक्ती पोलिस भरती झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ठार करतात. आमदार भिमा मंडावी यांना स्फोटकांचा वापर करून माओवाद्यांनी ठार केले. हे माओवादी समोरासमोर लढत नसून स्फोटकांचा वापर करून निव्वळ संशयावरून नक्सली कारवाया करतात. युगेंद्र मेश्राम या शिक्षकाला केवळ संशयावरून माओवाद्यांनी ठार केले. गाववाल्यांच्या जनमताच्या विरोधामुळे नंतर चूक झाली अशी पत्रके वाटून माफी मागितली. दंतेवाड्यात सीरपीएफच्या प्रशिक्षणार्थींचा बळी घेतला जातो. यातील अनेक जवान हे स्थानिकच आहेत. स्थानिकांच्या हक्कासाठी लढतो म्हणायचे आणि त्यांनाच ठार करायचे हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. माओवाद्यांना स्थानिकांचा विरोध आहे. त्यांचा फोलपणा उथळपणा मागच्या दोन पिढ्यांनी पाहिला आहे. म्हणून स्थानिक आदिवासी त्यांना आता विरोध करीत आहेत. त्यामुळे आदिवासी त्यांच्या मुलांना दूरच्या शाळेत, आश्रमात शिकवत आहेत. आता माओवाद्यांना भरती करण्यासाठी तरूण मिळत नाहीत. ते तेथील शिक्षित तरूणांवर दबाव आणतात. विरोध केला तर ठार करतात. 2012ला पुण्यात बसेसमध्ये माओवाद्यांनी त्यांच्या नेत्यांना साडावे अशी मागणी करीत भगत सिंग यांचा फोटो वापरून पत्रके लावली होती. त्यातून शहरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा माओवाद्यांचा हेतू होता. शहरी माओवाद म्हणजे वेगवेगळ्या संस्था, संघटनांमधून, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांमधून तरुणांना हेरून नक्षली कारवायांसाठी उद्दिपित केले जाते.
शहरी भागातील माओवाद रोखण्यासाठी नागरिकांना शस्त्र हातात घेण्याची गरज नाही तर पोलिसांचे, सीआरपीएफ जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा गडचिरोली, छत्तीसगड मधील हिंसकता शहरात फोफावेल. माओवाद रोखण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था संवेदनशील आणि लोककेंद्रीत असणे आवश्यक आहे. माओवादी भांडवल करत असलेल्या समस्यांवर उपाययोजना केली पाहिजे. विचारधारेचे हे युद्ध शस्त्रांव्दारे जिंकता येत नाही. शहरी आणि जंगल भागातील माओवादी कारवायांना भिन्न प्रतिसाद आहे. वेगाने अस्तित्वात येणा-या फ्रंट संघटना व कायद्याच्या मर्यादा ही माओवाद रोखण्यापुढील आव्हाने आहेत, असेही कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवारी (10 मे 2019) सायं. 7 वाजता गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे सती मंदोदरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी प्रज्ञा पिसोळकर यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत कुंभोजकर यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुकरी कल्लपा जमखंडी यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रज्ञा पिसोळकर यांना वृक्ष लागवडीचा छंद असून त्या कनेक्टींग या संस्थेत समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. कनेक्टींग ही संस्था आत्महत्या करणा-या व्यक्तीस व आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशनाचे काम करते.
स्वागत कविता शिंदे, तर सुत्रसंचालन सुजाता पोफळे व आभार हेमा सायकर यांनी मानले.
व्हिएस न्युज - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडे नऊच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये घडली. याप्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 या लक्षवेधी मतदारसंघातून महाराष्ट्र मजूर पक्षाचे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रामचंद्र अडागळे अडागळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कष्टकरी कामगार, शेतकरी कामगार यांनी गजबजलेल्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथील महात्मा फुले नगर येथे मातंग समाज व इतर समाज बांधवांनी जोरदार स्वागत केले व औक्षण करून स्वागत करण्यात आले. महात्मा फुले नगर येथील युवा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महिला अबालवृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण पाहता चाकण शहरात निवडणुकीची कुजबुज सुरू झाली.
खेड तालुक्यातील आळंदी येथील अण्णाभाऊ साठे नगर याठिकाणीही अडागळे यांचे स्वागत करण्यात आले. खेड तालुका मातंग समाजाचे युवा नेते विठ्ठल भाऊ चांदणे, सुनील गालफाडे, रामदास लोंढे, ज्येष्ठ नेते दीपक लांडगे, अनिल जाधव, खेड तालुक्यातील युवा नेते संतोष डुकरे यांनी प्रचारात सहभागी होऊन प्रचाराचा जोर वाढविला आहे. प्रचारात आघाडी असल्याने मातंग समाज व कष्टकरी मजूर आता आनंदाचे वातावरण आहे हे पाहता महाराष्ट्र मजूर पक्ष्याचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी आभार मानले.
व्हीएस न्युज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ वी जयंती निमित्ताने महाराष्ट्र मजूर पक्षातर्फे पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष फारूक कुरेशी, संतोष कसबे, मयूर गायकवाड, सविता आव्हाड, सुरेश मिसळ, मोहन शिंदे, दत्ता सोनावणे, मीना रणदिवे, अनिता रिडलान, जुलिया शीतलानि, रामचंद्र आरडे, आकाश अडागळे, शिवाजी चव्हाण, जालिंदर शेंडगे, त्रिंबक माने, कादीर कुरेशी, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्युज - खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने भिंत बांधण्याचे काम हाती घेतल्याने गायी गुरांचा कोंडमारा होऊन हाल होणार आहेत. एकीकडे सरकार गो पालनाचा नारा देत आहे, तर दुसरीकडे मात्र याच गायी मोकळ्या हवेवाचून बंदिस्त होत आहेत. केन्टोन्मेंट प्रशासनाने मुक्या जनावरांचा विचार करून भिंतीचे काम थांबवावे; अन्यथा महामार्गावर गायी आणून रास्ता रोको करू, असा इशारा गवळी समाज व छावा मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीनजीक इंग्रज सरकारने धोबी आणि गवळी समाजासाठी जागा देऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून गवळी आणि धोबी समाज आपापले व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. आज या ठिकाणी 70 ते 80 गवळी गोपालन करीत आहेत. सकाळी लवकर उठून गायींच्या गोठ्याची स्वच्छता, गायी धुणे, त्यांना चारा पाणी देणे, दूध काढण्याची कामे करतात. सायंकाळी पुन्हा हेच काम असते. आजपर्यंत गुण्यागोविंदाने जगणारा हा समाज अलिकडे राजकीय लोकांचे लक्ष्य बनत चालला आहे. स्थानिक राजकीय लोकांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. एवढेच नाही तर या गवळी समाजाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचा आरोप छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी केला.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक राजकीय लोकच या ठिकाणी भिंत बांधून घेत आहेत. वस्तुतः या ठिकाणी मोकळे मैदान असून भिंत बांधण्याची आवश्यकता नाही. सध्या इथे भिंत नसल्याने गवळी लोक गायींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. त्यामुळे गायींचे शेण ड्रेनेजलाईनमध्ये जाणे थांबते. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. ही भिंत बांधल्यावर गायींच्या गोठ्यात कसलीच हवा जाणार नाही. तसेच गोवऱ्या थापण्यास जागा नसल्याने आणि शेणाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील शेण ड्रेनेजमध्ये जाणार आहे. त्यामुळे आधीच प्रदूषित असलेले नदीपात्र जास्तच प्रदूषित होणार आहे.
गायी जाण्या-येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. इथूनच गायींसाठी चारा, कडबा घेऊन येणारे वाहन येत असते. याची बोर्ड प्रशासनाला जाणीव असूनही जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कहर म्हणजे या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रस्ता म्हणून अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वार बनविण्यात येणार आहे. त्यामुळे गायींना जाता येताना खूपच त्रास होणार आहे. जवळपास 170 ते 180 गायी एक एक असे या प्रवेशद्वारातून जाण्यास वेळही खूप जाणार आहे. गायींसाठी आणण्यात येणारा चारा, कडबा आतमध्ये कसा आणायचा ? एखादी गाय मृत झाल्यास या प्रवेशद्वारातून बाहेर कशी न्यायची ? भिंतीमुळे हवा अडली जाणार असून, मोकळ्या हवेशिवाय गायींचा कोंडमारा होणार नाही का ? इतक्या गायींचे शेण दररोज ड्रेनेजमध्ये जाऊन नदी प्रदूषण होईल, त्याचे काय ? स्थानिक एक दोन राजकीय लोकांच्या हट्टापायी कॅन्टोन्मेंट बोर्ड गायींच्या जीवाशी का खेळत आहे, असे सवाल छावा मराठा संघटनेतर्फे विचारण्यात येत आहेत.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने या भिंतीचे काम थांबवावे, अन्यथा जुना पुणे- मुंबई महामार्गावर गायी आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या संदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
छावा मराठा संघटना गवळी समाजाच्या पाठीशी
गवळी समाजावर स्थानिक राजकीय व्यक्तींचा घट्ट पुरविण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अन्याय करत आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, छावा मराठा संघटना गवळी समाजाच्या पाठीशी उभी आहे. सरकार गोपालन करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन मात्र या गोपालनकर्त्यांच्या मुळावर उठले आहे. गायींच्या आरोग्याचा विचार करून इथे होत असलेल्या भिंतीचे काम थांबवावे, अन्यथा गवळी समाजाला सोबत घेऊन छावा मराठा संघटना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे शहर व जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.
व्हीएस न्युज - काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं. चिं. शहर, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था पिंपळे गुरव आणि लेवा भ्रातृ मंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्तपणे मलकापूर (जि. बुलढाणा) येथील जनता कला-वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार, लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष क्रुष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड नितीन राठोड हे ज्या शाळा व महाविद्यालयात शिकले, त्या अनुक्रमे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना 'सैनिकी शिक्षण आणि त्याद्वारे उपलब्ध करिअरच्या संधी' याबाबत कृष्णाजी खडसे यांनी, तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या संधीबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शहीद संजयसिंह राजपूत यांचे सुपुत्र जय राजपूत यांनी 'माझ्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी मी देखील सैन्यातच भरती होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.
व्हिएस न्युज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी आणि सचिन सौदाई यांच्या गटात सोमवारी मध्यरात्री पिंपरीतील रात्रभर चालु असणार्या सलोनी हॉटेल मध्ये हाणामारी झाली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, डब्बू आसवानी यांचा दुसरा मुलगा, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, जातीयवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, पण जाणीवपूर्वक एकाचे नाव गुन्ह्यातुन वगळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे सुत्रांमार्फत कळते.
नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी फिर्याद दिल्यानुसार हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सनी सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सनी सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तिने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. सचिन राकेश सौदाई , सनी राकेश सौदाई , सुनील मुकेश शर्मा (रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, दरोडा टाकणे, खुनी हल्ला करणे, धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएस न्युज - गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना 'आदर्श माता' आणि 'समाजभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात 'आदर्श माता पुरस्कार' देवून विमलबाई धुरगुडे (तुळजापूर, मंगरूळ), शकुंतला पवार (धारूर, मोर्डा तुळजापूर), धन्वंतरी गोजमगुंडे (लातूर), शालिनी चौधरी (अंबाजोगई), द्रोपदी काळे (चारे, बार्शी) यांना गौरविण्यात आले.
यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, परिमंडळ १ पुणेचे उपायुक्त सुहास बावाचे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजाताई महेश लांडगे, शुभांगीताई लांडे पाटील, विद्याताई जाधव, आयोजक प्रकाश इंगोले व डी. एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारार्थी : डॉ. अंबिका पतंगे (स्त्री रोग तज्ज्ञ), स्मार्तना पाटील (पो.उप- आयुक्त परिमंडळ-१ पिं.चिं), प्रतिभाताई कव्हेकर पाटील (लातूर), डॉ. दीपाताई मोरे (उमरगा), अंजली तापडिया (सुवर्ण पदक विजेत्या), प्रीतीताई काळे (समाजसेविका), पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी), आशाताई सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे (समाजसेविका), स्नेहल शहाणे (लोकसेवा फाउंडेशन), ऍड. प्रीती वैद्य (संचालिका किनारा वृद्धाश्रम ), अर्चनाताई अंबुरे –उस्मानाबाद, पोपटबाई जाधव (लघुउद्योजिका), रिंका जाधव- काळे, अदिती साखरे, अनिता खांदवे – कराळे, निताताई मोघे, प्रतीक्षा इंगोले. रवींद्र गायकवाड म्हणाले, पुरस्कारामुळे महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. मराठवाडा ही संताची भूमी आहे व आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिला या आपल्या मराठवाड्याच्या मातीतील आहेत. पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी असली, तरी आपल्या जन्मभूमीवर तेवढीच माया व प्रेम करतात.
पुरस्कारार्थींचेच्या मनोगतातून सद्यस्थितीत समाजामधील एकमेकांसाठीचा ओलावा आणि संवेदना हरवत चालल्याच्या भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, “स्वराज्य शांतीदूत परिवार” या संस्थेचे उद्घाटन व स्वराज्य महिला विशेषाकांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक राजेंद्र कोरे यांनी, तर आभार डी.एस.राठोड यांनी मानले.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील आज ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला यावेळी सचिन चिखले, नगरसेवक पिं.चिं,सचिन पवार, हेमंत डांगे, शहर अध्यक्ष वि.सेना.पिंपरी .चिंचवड उपस्थित होते.
विक्रम आडे,तेजस देशपाडे ,बिपीन पाल,शुभम महाडिक,ओमकार पाचारणे,श्रीकृष्ण गंगातीर,यश काटे,आकाश आवसरे,अनिकेत वाघमारे, यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002