व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगपालिका कर्मचारी महासंघाची दि. १८/०७/२०१९ च्या मा.औदयोगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार १९ वर्षामध्ये पहिल्यांदा गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. सदर निवडणूक केवळ एका पदाधिका-यास सन २०१८ साली खजिनदार पद न मिळाल्याने मा.कामगार आयुक्त पुणे यांचे परवानगीने पदाबाबतचा वाद मा.औदयोगिक न्यायालयात उपस्थित करणेत आला होता.
जे कर्मचारी महासंघाच्या कार्यपध्दतीवर आरोप करतात तेच महाशय मागील ११ वर्ष “खजिनदार” पदावर काम करित होते. पुन्हा त्यांना खजिनदार पद पाहिजे होते. ते न मिळाल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांच्या हेकेखोरपणामुळे महासंघाची निवडणूक लागली. या निवडणूकीसाठी होणारा सर्व खर्च कर्मचारी महासंघाच्या खात्यातुन म्हणजेच कर्मचा-यांच्या वर्गणीतून होणार आहे. हे एक प्रकारे कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान आहे. मा.औदयोगिक न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया राबविणेसाठी मा.उपनिबंधक कामगार आयुक्त कार्यालय पुणे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. व त्यांनी ३ महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पुर्ण करावी असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार निवडणूक आधिका-यांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करित कर्मचारी महासंघाचे बुक्स ऑफ अकांऊंट, सभासद नोंद यादी ताब्यात घेऊन प्रक्रिया सुरु केली.
कोणत्याही संस्थेच्या निवडणूका होतात त्याचा खर्च त्या संस्थेच्या खात्यातुन केला जातो. निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत ते पदाधिकारी काळजीवाहू म्हणून काम पाहतात. सर्व निवडणूकांमध्ये मतदार/सभासद नोंद यादी असते तीच ग्राहय धरली जाते. संस्थेचे आर्थिक व्यवहार प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत स्थगित केले जातात. या कायदेशीर बाबींना विरोधक प्रशासक नेमला, भ्रष्टाचार झाला असा चुकीचा आरोप करित आहेत. सन २०१८-१९ पर्यंतचे कर्मचारी महासंघाचे लेखा परिक्षण झाले असून टिका करणा-यांच्या कार्यकालापर्यंतचे लेखापरिक्षण पुर्ण झालेले आहेत. त्यात कोणतेही आक्षेप नाहीत. विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत ते आम्ही फेटाळत आहोत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणुक प्रचारार्थ स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलच्या वतीने शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.
महासंघाचे कामकाज
सदर निवडणूकीमध्ये गेल्या १९ वर्षापासुन अध्यक्ष श्री.शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे अनेक प्रश्न कामगारांच्या एकजुटीने सोडविण्यात यश मिळालेले आहे. सन १९९९ साली स्व.शंकर आण्णा गावडे, बाबा बागल, शशिकांत झिंजुर्डे व इतर बरेच कार्यकर्ते यांचे एका विचारांमुळे व १४ संघटनांचे एकत्रिकरण करुन मान्यता प्राप्त कर्मचारी महासंघाची स्थापना सन २००० साली करण्यात आली आहे. ५ वा वेतन आयोग १०% वेतनश्रेणी, ६ वा वेतन आयोग, ७ वा वेतन आयोग या आर्थिक फायदयांच्या मुद्यांसह आरोग्य कर्मचा-यांचे प्रश्न, पदोन्नतीबाबत सततचा पाठपुरावा कामगारांसाठी आरोग्यदायी वैद्यकीय योजना, कर्मचा-यांच्या सेवा प्रवेश व शर्ती तयार करुन घेण्यास प्रशासन व पदाधिका-यांबरोबर समन्वय साधणे व सदर अहवाल शासनाकडे पाठविणे व मंजुरीबाबत पाठपुरावा करणे, राज्यातील महानगरपालिकेंच्या जकातीचा प्रश्न सोडविणे, लाड/अनुकंपा समितीच्या शिफारशींच्या बाबत पाठपुरावा करणे इ. व इतरही अनेक प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त झाले आहे.
धन्वंतरी स्वास्थ्य योजना
कामगारांच्या जिव्हाळयाची असणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना ही सुरु करणेमध्ये कर्मचारी महासंघाने २००७ पासुन सातत्याने प्रयत्न केले होते. त्यास सप्टेंबर २०१५ ला ही योजना सुरु करणेस यश प्राप्त झाले आहे. धन्वंतरी स्वास्थ्य योजना अत्यंत प्रभावीपणे व चांगल्या पध्दतीने तयार केली गेली होती. तथापि सन २०१५ ते नोव्हेंबर २०१९ अखेर जवळपास १८,४५६ लाभार्थींवर रक्कम रु.७९,८३,३०,३५२/- इतका खर्च झालेला आहे. यापैकी अदयापही ११ कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. सदर खर्चाचा विचार करता तात्कालीन मुख्य लेखापरिक्षक व मुख्य लेखा अधिकारी यांनी समिती योजनेतील सभेमध्ये सुचविलेप्रमाणे सदरची योजना विमा कंपनीमार्फत राबविणेबाबतचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी “विमा कंपनीने धन्वंतरी योजनेच्या अटी शर्तींवरच ही योजना विमा कंपन्यांनी राबविणेत यावी यासाठी विनंती केली”. धन्वंतरीमध्ये दरवर्षी अंदाजे २० कोटीपर्यंतचा खर्च होत असल्याने निविदा पध्दतीने मध्यस्थाची नेमणूक करुन त्यांचेमार्फत विमा कंपन्यांना धन्वंतरी योजनेच्या धर्तीवर विमा सुविधा पुरविणेकामी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल प्रसिध्द करणेत आलेले होते. त्यामध्ये खालीलप्रमाणे जास्तीच्या वैद्यकीय सुविधा अंर्तभुत करणेत आलेल्या आहेत.
कर्ममाचारी व कुटूंबियांसाठी ओपीडी सुविधा.
1) प्रति कुटूंब र.रु.५०००/- दुर्धर आजारांसाठी औषधे मिळतील. तसेच याव्यतिरिक्त मोठया आजारांसाठी अधिक आवश्यकता असल्यास मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने र.रु.१ कोटी बफरमधून औषधे देण्यात येतील.
2) प्रति कुटूंब वार्षिक र.रु.३ लाखांचा विमा उतरविणेत आलेला आहे. तथापि र.रु.३ लाखावरील जीवघेण्या आजारासाठी र.रु.५ कोटी बफरमधून मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने उपचार मिळणार.
3) सेवेतील अधिकारी व कर्मचा-यांसाठी र.रु.५ लाखाचा अपघाती विमा.
4) रुग्णालयातुन डिसचार्ज झालेनंतर आवश्यकता असलेस ३० ते ६० दिवसांची औषधे योजनेतून उपलब्ध होणार.
5) बोन मॅरो ट्रान्स्प्लांन्टच्या सुविधेसह इतरही दुर्धर आजारांचा यात समावेश आहे.
6) शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त अंदाजे १८०० ते १९०० शिक्षकांचा विमा योजनेमध्ये समावेश करणेत आलेला आहे.
7) सदर वैद्यकीय उपचार हयात असेपर्यंत असून त्यात सेवानिवृत्तांना वयाची अट नाही.
कामगार भवन
कामगार भवनाच्या उभारणीसाठी मनपाकडून जागा प्राप्त झाली असून कामगारांच्या बोनसमधून सन २००४ - ०५ पासून कपात केलेली रक्कम बांधकामासाठी वापरणेत येणार आहेत. सदर भवनासाठी कै.शंकर आण्णा गावडे स्मृती भवन समिती स्थापन केलेली असून त्यामध्ये महापालिकेतील पदसिध्द अतिरीक्त आयुक्त, सहा. आयुक्त प्रशासन, सहा.आयुक्त भुमी जिंदगी, सहा.आयुक्त कामगार कल्याण विभाग, मुख्य लेखाधिकारी असे पाच व महासंघाचे अध्यक्ष, खजिनदार, महासचिव व एक कार्यकर्ता असे चार, मिळून एकूण नऊ लोकांची समिती रजिस्टर केलेली आहे. यामध्ये महापालिकेतील अभियंत्याच्या मदतीने सदर भवनाचे डीएसआर रेटप्रमाणे इस्टिमेट तयार करुन राज्यातील तीन प्रमुख वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिध्द करुन, त्यानुसार एल १ निविदा धारकास १० टक्के कमी दराने काम देण्यात आलेले आहे.
सातवा वेतन आयोग
सातवा वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाशी समकक्ष वेतनश्रेण्या तयार करणेत आल्या असून कर्मचा-यांच्या विविध भत्यांमध्ये वाढ करुन सदरचा प्रस्ताव शासनाकडे जुन २०१९ ला मान्यतेकामी पाठविणेत आलेला होता. त्याबाबत श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी सतत पाठपुरावा करुन वेतन श्रेण्या मंजुर करुन घेऊन वेतन आयोग लागू करुन घेतला आहे. सदर वेतन आयोगातील फरक कर्मचा-यांना रोख स्वरुपात १ जानेवारी व १ जुलै याप्रमाणे ५ हप्त्यांमध्ये देणेबाबत मान्यता घेतली आहे. याकामी अर्थसंकल्पात फरकासाठी तरतुदही करणेत आलेली आहे. याचा लाभ सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त शिक्षकांसह अंदाजे ९ हजारापेक्षा जास्त कर्मचा-यांना मिळणार आहे.
कर्मचा-यांवर ज्यांनी ही निवडणूक लादली आहे ते कर्मचारी महासंघाचे माजी खजिनदार महासंघाविरोधात सोशल मिडीया, प्रिंट किंवा इलेक्ट्रानिक मिडियाद्वारे कामगारांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करत आहे. हिच बाब चुकीची व कर्मचारी महासंघाच्या प्रतिमेस काळीमा फासणारी आहे. त्यांच्या विरोधात आम्ही सर्वजण स्व.शंकर आण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलच्या माध्यमातुन ही निवडणूक लढवत आहोत. आमचे पुर्ण पॅनेल बहुमताने निवडून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणूक स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनल अधिकृत उमेदवार निवडणूक चिन्ह बॅट अध्यक्ष श्री. झिंजूर्डे शशिकांत उर्फ बबनराव खंडू, उपाध्यक्ष श्री. वाघेरे महाद्रंग नामदेव, सरचिटणीस श्रीमती जोशी चारूशिला किशोर, चिटणीस श्री. येळवंडे शिवाजी बाबूराव, सहसचिव श्री. लांडगे संजय ज्ञानोबा, खजिनदार श्री. संमगिर नितीन संपत, प्रमुख संघटक श्री. माछरे मनोज प्रितमसिंग, संघटक श्रीमती सुकाळे सीमा अनिल, कार्यकारिणी सभासद - श्री. भूजबळ विशाल बाळासाहेब, श्री. चिंचवडे दिगंबर हरीभाऊ, श्री. गावडे चंद्रशेखर शंकर (आण्णा), श्री. राक्षे संजीव प्रल्हाद, श्री. कापसे संजय किसन, श्री. वाखारे मुकुंद विश्वनाथ, श्री. गुंजाळ दिलीप शिवराम, श्री. गंगावणे उत्तम सहादू, श्री. बेळगावकर सुनील सिद्धाप्पा, श्री. बांदल उमेश बाळासाहेब, श्री. मातेरे नथा नारायण, श्री. बोत्रे महादेव तुकाराम, श्री. कलापुरे मंगेश पोपट. कर्मचारी हिताकरीता महासंघाच्या एकविचाराच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.
मतदान शनिवार, दि, 11 जानेवारी 2020 सकाळी 7 ते दुपारी 4 वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी येथे होणार आहे.
व्हिएस न्युज - नक्षञाचं देणं काव्यमंच,निगडी विभागा व साहित्य सारखी कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त"राज्यस्तरीय काव्यमैफल"चे आयोजन करण्यात आले होते.निगडी येथील साविञीबाई फुले सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयिञींनी उपस्थित राहुन कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे( राष्टीय अध्यक्ष नक्षञाचं देणं काव्यमंच),कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ञ व कविवर्य अॅड.बाळासाहेब तोरस्कर (ठाणे),प्रेम कवी सुरेश धोञे(अध्यक्ष साहित्य सारखी कलामंच),कविवर्या सौ योगिता कोठेकर,(निगडी विभागप्रमुख)समाजसेवक प्रभाकर ढोमसे(अध्यक्ष जुन्नर तालुका मिञ मंडळ,पुणे), कवी बी.एस.बनसोडे,कवी अरुण कटारे,पञकार दत्ताञय परळकर,कवी अशोक कोठारी,कवयिञी माधुरी चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अध्यक्ष अॅड बाळासाहेब तोरस्कर म्हणाले,"काव्यमंचचे कार्य कौतुकास पाञ आहे.कवींना समाजाने जपले पाहिजे.कवी हा समाजाचा आरसा आहे.कविता म्हणजे विषय,आशय,आणि अभिव्यक्ती यांचा ञिवेणी संगम असतो.कविता अंर्तमनातुन निर्माण झाली पाहीजे."
विजय कांबळे,आत्माराम घारे,संतोष फंड,अरुण कांबळे,योगेश नरवडे,संगमेश्वर बल्लापुरे,अमर तिकोणे,नंदकुमार गोपाळे,मनोज धूरंदर,समीर बने,गीतांजली सटाणेकर,रमेश जाधव,आनंद गायकवाड,विवेकानंद बनसोडे,प्रमोद सुर्यवंशी,कौतिक पाटील,शामराव सुतार,राजश्री बोहरा,समाधान गायकवाड,हरीश्चंद्र धिवार,अलका जोशी,संतोष गाढवे,वर्षा जगताप,आर्या घरवडेकर,महेश कुलकर्णी,सुरेश पाटोळे,अमर भिसे इ. रचना सादर केल्या.प्रत्येक सहभागींना सन्मानपञ देण्यात आले.सर्वांना विनामूल्य सहभाग देण्यात आला.
कार्यक्रमाचे सुञसंचालन जगदीप वनशिव, रुपाली अवचरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले.संयोजन कविवर्या योगिता कोठेकर ,प्रेमकवी सुरेश धोञे यांनी केले. विवेकानंद बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले .विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
व्हिएस न्युज - अण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकी हक्काची आहे. ही जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला मिळावी, यासाठी गेल्या 27 वर्षापासून कामगार कल्याण मंडळ प्रयत्न करीत आहे. दरम्यानच्या काळात या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा व बैठकांचा देखावा मनपा प्रशासन करीत आहे. मनपाच्या वतीने कामगार कल्याण मंडळाशी जागा ताब्यात देण्याबाबत व पर्यायी जागा व पैशांबाबत बैठका सुरु असताना कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचा हक्क डावलून मनपा प्रशासनाने बेकायदेशीररित्या अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
मनपा प्रशासनाची ही भूमिका पूर्णत: बेकायदेशीर आहे. ही निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा आगामी 15 दिवसात तीव्र आंदोलन करू व याबाबत न्यायालयात दावा दाखल करू असे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व केंद्रीय कामगार मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी सोमवारी पिंपरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या जागेवर उभारण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुर्णत: बेकायदेशीर आहे. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमचे पीपीपी तत्वावर पुर्नविकास करणे हे देखील बेकायदेशीर आहे याबाबत न्यायालयीन लढा सुरु करण्यात येत आहे. कष्टकरी कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेल्या या नगरीत कामगारांचेच हक्क प्रशासन डावलत आहे. मनपा प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात शहरातील सर्व कामगार, कामगार नेते आणि कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असेही आवाहन भारती चव्हाण यांनी केले.
यावेळी कामगार प्रतिनिधी स्वानंद राजपाठक, तानाजी एकोंडे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, अण्णा जोगदंड, राजेश हजारे आदी उपस्थित होते. मनपा प्रशासनाने कामगार कल्याण मंडळाबरोबर केलेल्या कराराची पूर्तता होईपर्यंत स्टेडियमबाबत कोणताही निर्णय मनपा प्रशासनाने घेऊ नये. त्यास कामगार कल्याण मंडळाचा व सर्व कामगारांचा विरोध आहे. तसेच पीपीपी तत्वावर स्टेडियमचा पुनर्विकास करण्यासही विरोध आहे याची मनपाने दखल घ्यावी.
वास्तविक 1992 पासून स्टेडियमचा ताबा घेवून मनपाने यावर एक रुपयाही खर्च न करता देखभाल केली नाही, त्यामुळे स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. आज स्टेडियमचा वापर राडारोडा व भंगार टाकण्यासाठी केला जात आहे. गेली 27 वर्षे या वास्तुमधून फक्त भाड्याचे उत्पन्न घेण्याचे काम मनपाने केले आहे. पर्यायाने कामगारांच्या घामाच्या पैशातून कामगार कल्याण निधी मधूनउभ्या राहिलेल्या वास्तुचा दुरुपयोग आणि दुरावस्था मनपाने केली आहे. पिंपरी चिंचवडमधून सर्वात जास्त कामगार निधी मंडळाकडे जमा होतो. या निधीमधूनच मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे भव्य कामगार प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी प्रशिक्षण केंद्र, सभागृह, वसतिगृह, अभ्यासिका, जलतरण तलाव, ग्रंथालय, मनोरंजन केंद्र, नाटयगृह अशा प्रकारच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
पिंपरी चिंचवड मनपाच्या आडमुठया धोरणामुळे पिंपरी चिंचवड सारख्या कामगारनगरीतच कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांना मुलभूत हक्क आणि अधिकारांपासूनपासून वंचित रहावे लागत आहे. कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाबाबत पिंपरी चिंचवड मनपा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचे दरम्यान 1992 मध्ये हस्तांतरण करार करण्यात आला. का
कल्याण मंडळाने पिंपरी नेहरूनगनर येथे 28 एकर जागेमध्ये उभारण्यात आलेली कामगार स्टेडियमची भव्य वास्तु मनपाला हस्तांतरित केली. पिंपरी चिंचवडशहरात कामगारनगरीमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी या भव्य वास्तुची निर्मिती करण्यात आली आहे. काही कारणास्तव हे स्टेडियम पिंपरी चिंचवड मनपास हस्तांतरीत करावे आणि त्या बदल्यात एक कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी सुमारे 6 एकर जागा देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळासमोर ठेवला. त्या प्रस्तावानुसारच 1992मध्ये स्टेडियम मनपाकडे हस्तांतरीत करण्यात आले.
या करारामध्ये नमुद केल्यानुसार एक कोटी रुपये आणि दळवीनगर चिंचवड येथील 20000 चौ. फुट जागा मंडळाला देण्यात आली. उर्वरित मोशी सेक्टर नं. 5 मध्ये 2 एकर, प्राधिकरण सेक्टर 25 मध्ये 25000 चौ. फुट, सेक्टर 26 मध्ये एक एकर आणि थेरगांव सर्व्हे न. 9 मध्ये दिड एकर जागा देण्याचे ठरले होते. परंतु या जागा मनपाच्या मालकीच्या नाहीत. त्यामुळे हस्तांतर होवू शकत नाही. कामगार कल्याण मंडळाच्या मागणीनुसार मंडळाला प्रकल्प उभारणीसाठी मनपाच्या ताब्यातील आणि विकसनाकरिता बांधकाम चटई क्षेत्र उपलब्ध असणाऱ्या जागा मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत वेळोवेळी मनपाला कळविण्यात आले आहे.
1993 पासून मा. कामगार मंत्री एकनाथराव गायकवाड, मा. कल्याण आयुक्त, मा. मंडळ अध्यक्ष, मंडळ सदस्या भारती चव्हाण यांनी सातत्याने मनपाबरोबर पत्रव्यवहार, बैठका आणि चर्चा करुनही संबंधीत जागा किंवा त्या जागांच्या ऐवजी दुसऱ्या जागा मनपाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत.
2002 च्या कालावधीमध्ये मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष कामगार मंत्री मा. डॉ. हेमंतराव देशमुख, मा. कल्याण आयुक्त आणि मा. कल्याण सदस्या भारती चव्हाण यांच्यासोबत बैठका होवून काही जागा दाखविण्यात आल्या होत्या. मंडळाने संमती देऊनही संबंधीत जागांपैकी कोणत्याही जागेचे हस्तांतरण करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. मनपाकडून जागा देण्यासंदर्भात नेहमीच टाळाटाळ आणि फसवणूकच करण्यात आली असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
2005 मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांनी याबाबत लक्ष घालावे. यासाठी भारती चव्हाण, अरुण बोऱ्हाडे, शंकरराव गावडे, पी.बी. प्रभु, के.एस. काळभोर, व्ही. बी. पावसकर, बी. बी. इंगवले, आर. के. सोंडकर, किशोर ढोकळे, शिवाजी शेडगे, यशवंत भोसले, शेखर सावंत, सुभाष सरिन, विनायक घोरपडे, अरुण गराडे, बाळासाहेब तेलंगी, नामदेवराव गोलांडे, अरविंद प्रभुणे, दिनेश परपुळकर, बहिरट, एन. एन. जगदाळे, पी. एन. बारहाते, ए. आर. पाटील, हरिभाऊ चिंचवडे, आनंद ठकार आदी प्रमुख कामगार नेत्यांनी पवार साहेबांना विनंती केली होती.
2008 मध्ये ठराव क्र. 5693/ 2005 नुसार मंडळास 6 एकर जमिन देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
2006 मध्ये काही जागा देण्याबाबतची चर्चा व बैठक मंडळ सदस्या भारती चव्हाण आणि भूमी जिंदगी विभाग यांचेबरोबर होवून काही जागा प्रस्तावित केल्या गेल्या. या जागा ताब्यात देण्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी याबाबतचे पत्र मा. कल्याण आयुक्त यांनी मनपा आयुक्त यांना पाठविले होते.
2018 मध्ये मनपाकडून जागा देण्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील सर्व गुणवंत कामगारांनी एकत्र येवून भारती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेवून कामगार स्टेडियम मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करुनही उर्वरित चार जागा देण्यास मनपा जाणून बुजून टाळाटाळ करत आहे. स्टेडीयमच्या जागेसंदर्भातील शेवटची बेठक सप्टेंबर 2019 मध्ये सहाय्यक आयुक्त पवार, अतिरिक्त आयुक्त चितळे आणि भारती चव्हाण व कल्याण उपआयुक्त समाधान भोसले यांचे दरम्यान झाली. त्यानंतर ही जागा मिळणे संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
एकीकडे चर्चा व बैठकांचे गु-हाळ चालू ठेवायचे आणि कामगार कल्याण मंडळ व कामगारांना विश्वासात न घेता स्टेडियमच्या पुनर्विकासाबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामगारांना अंधारात ठेवायचे. ही मनपा प्रशासनाची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर व संशयास्पद आहे. मनपाने पीपीपी तत्वावर स्टेडियमचा पुनर्विकास करण्याचे जाहीर केले. वास्तुविशारदाची नेमणुक करुन आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आणि स्टेडियम भूईसपाट करण्याची निविदा मागविण्यात आली. मनपा आणि कामगार कल्याण मंडळ यांच्यामधील करारातील अटींची पूर्तता न झाल्यामुळे कराराचा भंग झाला आहे.
जो पर्यंत कराराची पूर्तता होत नाही, मंडळास जागांचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत मनपा स्टेडियमच्या जागेवर मालकी हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणजेच स्टेडियमबाबत कोणताही पुनर्विकासाचा निर्णय मनपा प्रशासन घेऊ शकत नाही किवा निविदादेखील मंजूर करु शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे स्टेडियमच्या जागेची मनपाची मालकी वादातीत असताना विठ्ठलनगर झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प स्टेडियमच्या जागेत उभारण्यात आला आहे ही बाब बेकायदेशीर आहे. त्याबाबत तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तशी नोटीस लवकरच मनपा प्रशासनावर बजावण्यात येईल. आजपर्यंत पिंपरी चिंचवड मनपाने जागांचे हस्तांतरण केले नाही. त्यामुळे कामगार उपयोगी प्रकल्प मंडळाला विकसित करता आले नाहीत.
मंडळाच्या वतीने उभारण्यात येणारे प्रकल्प कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सेवा, सुविधा उपलब्ध करून देणारे आहेत. त्याचा कोणताही आर्थिक भार मनपाच्या तिजोरीवर पडणार नाही. असे असतानाही मनपा प्रशासन आकसबुद्धीने जागा ताब्यात देण्याबाबत आडमुठे धोरण राबवित आहे. याबाबत आता ताबडतोब कार्यवाही व्हावी यासाठी हा शेवटचा इशारा देण्यात येत आहे, असे भारती चव्हाण यांनी नमूद केले. प्रामुख्याने आण्णासाहेब मगर स्टेडियमची झालेली दुरावस्था पाहता स्टेडियमची मालकी कामगार कल्याण मंडळास देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे.
तसेच झालेल्या बेकायदेशीर झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पावर आणि स्टेडीयमच्या पीपीपी तत्वावर पुर्नविकास करण्याच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयीन लढा सुरु करण्यात येत आहे.
व्हिएस न्युज - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कारानंतर महिला पशुवैद्यकीय डॉक्टरची हत्या आणि त्यानंतर मृतदेह जाळल्याच्या घटनेनंतर लोक संतप्त झाले होते. लोक पोलिसांच्या सुरुवातीच्या कारवाईवर प्रचंड नाराज होते. याशिवाय पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशीर केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता. अशात लोकांचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांनी चकमक घडवून आणली आणि आरोपींना ठार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
एन्काऊंटरचा प्लान!
इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकल यांनी एका अहवालात दावा केला आहे की, घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरवात केली. 30 नोव्हेंबरला वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला. या प्रकरणात पोलिसांव्यतिरिक्त मुख्यमंत्री केसीआर यांच्यावरही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वर्तमानपत्रानुसार, आरोपींना अटक होण्यापूर्वी पोलिस आयुक्त सी.पी. सज्जनार यांनी आरोपीला धडा शिकवण्यासाठी चर्चा केली होती.
व्हिएस न्युज - दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर आणि जवानाच्या कुटुंबियांना तत्काळ दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच या कामात बेपर्वाई करणा-या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात मलनिस्सारणवाहिनी टाकण्याची कामे सुरु केली आहेत. त्यानुसार दापोडी येथे पाईपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात मजूर नादप्पा जमादार पडले. त्यांना वाचविण्यासाठी खड्डयात उतरलेले महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव यांनी प्रयत्न केला. या घटनेत मजूर जमादार व कर्तव्य बजावत असताना विशाल जाधव यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्घटना संबंधित ठेकेदाराने व मनपा अधिका-याने सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
या ठेकेदारास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे व मजूर जमादार आणि जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेने तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपये द्यावेत. तसेच त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत नोकरीस घ्यावे. घडलेल्या दुर्घटनेत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कुचकामी ठरला आहे. अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शहरात सुरु असणा-या विकास प्रकल्पांच्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे. यासाठी आयुक्तांनी गरज भासल्यास स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक करावी.
सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणा-या ठेकेदार व अधिका-यांवर कारवाई करावी तसेच महिन्यातून किमान एक वेळ तरी आयुक्तांनी काम सुरु असणा-या प्रकल्पांचा सुरक्षाविषयक आढावा घ्यावा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अनेक अधिकारी बेजबाबदारपणे वागतात.
या दुर्घटनेबाबत आपण आगामी हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात प्रश्न उपस्थित करू असेही आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.
व्हिएस न्युज - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून मोबाईल व्हाट्सअप वर बदनामीकारक स्टेटस ठेवून दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची गणेश राजू गायकवाड (34)( रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पिंपरी पोलिसांनी दिनांक ०३/१२ रोजी आरोपीला तत्काळ अटक करून भा.द.वी कलम 500, 505(२) प्रमाणे गुन्हा(गुन्हा रजि क्र ११६८/१९)दाखल केला आहे.
महापरिनिर्वाण दिना चे गांभीर्य लक्षात घेता व स्टेटस् मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वापरलेले अपमानास्पद शब्दांचे पडसाद अन्य ठिकाणी उमटून दोन समाजात द्वेष निर्माण होऊ नये म्हणून अतिशय गोपनीय पद्धतीने व तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे काम पिंपरी पोलिसांनी केले.
प्रकाश केनाराम चौधरी (26) (रा. गीता कॉम्प्लेक्स नेहरूनगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश चौधरी पिंपरी येथील गोकुळ हॉटेल शेजारील एका मेडीकल मध्ये नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निमगिरे करत आहेत.
टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे : सचिन साठे
व्हिएस न्युज - राज्यामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
सोमवारी (दि. 2 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर हैद्राबाद येथे सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीस व रविवारी रात्री दापोडी येथे ड्रेनेजचे काम करीत असताना मृत्यू झालेल्या अग्नीशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि मजूर नादप्पा जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून अहिल्याबाई होळकर चौकात महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी साठे यांनी केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आले होते. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, बिंदू तिवारी, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंके, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, ॲड. क्षितीज गायकवाड, प्रियदर्शनी सेलच्या अध्यक्षा विनिता तिवारी, आशा शहाणे, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, भाऊसाहेब मुगूटमल, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, कळसकर, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळ, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत करदात्या भरतात. मिळकत कर व पाणीपट्टी कर थकवणा-या नागरिकांवर जप्तीच्या नोटीसा बजावला जातात. सेवा न देता दडपशाही करणा-या अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांना पाणी देण्याऐवजी टँकर लॉबी पोसण्याचा उद्योग प्रशासन करीत आहे. ज्या सोसायट्यांना खासगी टँकरव्दारे पाणी घ्यावे लागते. त्यांना महापालिकेने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा. या टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे.
नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी. धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. त्याचा विसर आता पदाधिका-यांना पडला आहे, अशीही टीका साठे यांनी यावेळी केली.
व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामावेळी खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झालाय. तर दोन जवानांसह चौघे जखमी झालेत. तर एक कामगार अद्यापही अडकलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू आहे. ही घटना रविवारी ( 1 डिसेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. याठिकाणी एनडीआरएफ दाखल झाले असून मतदकार्य सुरु आहे.
दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत नागेश जमादार हे कामगार त्या 15 फूट खड्ड्यात काम करत होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते कंबरेपर्यंत गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे स्थानिक नागरिक खाली उतरले. नागेश यांना वाचवतानाच पुन्हा मातीचा ढिगारा खाली कोसळला. हे तिघे त्या ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव हे तीन जवान बचावकार्यासाठी खड्ड्यात उतरले. शिडीच्या साह्याने ईश्वर आणि सीताराम यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. पुन्हा नागेशला सुखरूप बाहेर काढण्यात तिन्ही जवान व्यस्त झाले. पण तितक्यात आणखी एक ढिगारा चौघांच्या अंगावर पडला. तेव्हा विशाल यांचे तोंड खाली आणि पाय वर अशा परिस्थितीत ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यानंतर आणखी अग्निशमन आणि एनडीआरएफच्या जवानांची कुमक मागवण्यात आली. या बचावकार्यात सरोज आणि निखिल या कार्यक्षम जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, विशाल यांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सुरुवातीला फसलेले कामगार नागेश यांना बाहेर काढण्यासाठी अद्याप ही बचावकार्य सुरू आहे.
नागेश हे रंग कामगार आहेत. मात्र त्यांना काही पैश्यांची गरज असल्याने ते आज सुट्टी असताना ही या कामासाठी आले आणि त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. पालिकेने एम बी पाटील या ठेकेदाराला अमृत योजनेचे काम दिलेलं आहे. भोसरी पोलिसांकडून या सर्व घटनेचा तपास केला जातोय.
दोषींवर कारवाई होणार...
घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. या घटनेचा तपास सुरु आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदाराच्या सुपरव्हायजरला भोसली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमित मेश्राम यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
व्हिएस न्युज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधींची 10 नोव्हेंबर 2019 रोजी भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 26 राज्यातील 200 हून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनुमते दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिव पदी डॉ. मोहनलाल पाटील निवड करण्यात आली. अशी माहिती पार्टीचे महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे दिली. शुक्रवारी (दि. 29 नोव्हेंबर) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख बप्पा शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सिना अमित छाजेड आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी सांगितले की, आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेशात कार्यरत आहे. पुढील दोन वर्षात देशातील चार ते पाच राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांनंतर 25 हून जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणूका आहेत. सर्व राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येत आहे. यामध्ये युवक व महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणा-या सर्व निवडणूकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व युवकांनी करावे अशी मागणी होती. अमित मेश्राम यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय संघटक पदावर सुनिल खांबे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात आघाडी किंवा युती बरोबर जावे की नाही, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ असे निकाळजे यांनी सांगितले. पा
महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 27/07/1990 रोजी भारत निवडणूक आयोगाकडे (क्र.56/6/90/1732/5303/35) करण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती www.republicanpartyofindia.co.in या वेबसाईटवर आहे. पक्षाचे नोंदणीकृत केंद्रीय कार्यालय 1/16, संजय कॉम्प्लेक्स, टी टी नगर, मध्यप्रदेश भोपाळ 03 येथे आहे. 1990 पासून 2009 पर्यंत श्री एस.एस. भारती, श्री राजकुमार भारती, डॉ. मोहनलाल पाटील यांनी अध्यक्षपदावर आणि महासचिव पदावर श्री रामसिंग, श्री जंगेराम तँवर, श्री बी.के.गुप्ता यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 2009 ते 2018 या कालावधीत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर डॉ. मोहनलाल पाटील महासचिव होते.
रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नावाचा नविन पक्ष स्थापन केला आहे. याबाबतचे नोंदणी पत्र भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 19 मार्च 2019 (F. No.56/350/LET/ECI/FUN/PP/PPS-I/2018/11) प्रसिध्द केले आहे.
व्हिएस न्युज - थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले हे मानवी हक्कांसाठी अहोरात्र झगडले, जोतीरावांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता (भाऊपणा व बहीणपणा), शिक्षण, जातीनिर्मुलन, स्त्री-पुरुषसमता, शेती व शेतकरी यांचा सर्वांगीण विकास, महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक संघटन, मानवी हक्कांसाठी जागृती आणि संघर्ष यासाठी अभूतपुर्व योगदान दिले, असे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कविचंद भाट यांनी सांगितले.
थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 28 नोव्हेंबर) पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळे, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.
भाट म्हणाले की, महात्मा फुलेंना शिक्षणविषयक कामाला प्रतिगामी विचारांच्या मंडळीनी खूप विरोध केला. तरीही जोतीराव व त्यांचे सहकारी डगमगले नाहीत. वडिलांनी सामाजिक विरोधामुळे जोतीरावांना घराबाहेर काढले. त्यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाईंनी आपले शिक्षणाचे ‘मिशन’ चालू ठेवले. त्यांचा ध्येयवाद आणि त्यांची तळमळ अजोड होती. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धूराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. या शैक्षणिक चळवळीत लहूजी वस्ताद साळवे आणि राणबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आणि सहकारी सहभागी होते.
1855 साली त्यांनी पुण्यात गंज पेठेत (महात्मा फुले पेठ) राहत्या घरी देशातील पहिले प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. ही साक्षरता अभियानाची सुरुवात होती. मुलामुलींच्या शैक्षणिक गळतीच्या मुळाशी दारिद्रय, पालकांची निरक्षरता, अंधश्रध्दा, शिक्षणापासून काय लाभ व सुखे असतात याचा परिचय नसणे आदी कारणे असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी त्यानी उपाय योजले. ते गरीब मुलामुलींना विद्यावेतन देत असत. शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता. ‘दि पूना ऑब्झर्व्हर ॲण्ड डेक्कन वीकली’ या वृत्तपत्राने त्यांचे काम म्हणजे ‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’ असे वर्णन केले होते. त्यावेळी मुलींच्या शाळांच्या परीक्षा बघायला पूना कॉलेजच्या प्रांगणात 3,000 हून अधिक लोक जमले होते आणि त्याहून अधिक गर्दी बाहेर होती असे वर्णन शिक्षणखात्याच्या अहवालात मिळते.
जोतीरावांनी शिक्षणाच्या झिरपत्या सिध्दान्ताला विरोध केला आणि समाजातल्या तळागाळापासून शिक्षणाची सुरुवात केली पाहिजे याचा आग्रह धरला. विधवांना त्या काळात पुनर्विवाहाची बंदी होती. केशवपन करावे लागत होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विधवाविवाह घडवून आणले आणि केशवपन करु नये यासाठी नाभिक बांधवांचे प्रबोधन करुन त्यांचा केशवपनविरोधी संप घडवून आणला. विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी 1863 साली त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.
स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर त्यांनी पूर्वास्पृश्य बांधवांसाठी खुली केली. सत्यशोधक विवाह पध्दतीची सुरुवात करुन हुंडा, लग्नातील डामडौल व अमाप खर्च यांना प्रतिबंध केला. कमी खर्चातील सत्यशोधक विवाह घडवून आणले. या लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्त्रियांच्या ‘मानवी अधिकारासाठी’ झटण्याची शपथ नवरा मुलगा घेत असल्याचे मनूद केले. 140 वर्षापूर्वी आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळीला अर्पण केला होता.
जोतीरावांनी ‘शेतक-याच्या आसुड’ या ग्रंथात 1883 साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पीकपध्दती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पध्दतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला, अशा नोंदी महात्मा फुले समग्र वाड्.मयात आहेत.
महात्मा फुले यांच्या शिक्षण, शेती, सामाजिक समता, सत्यशोधक समाज या कार्याविषयी आजच्या युवा पिढीने माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य अभ्यासावे अशी अपेक्षा कविचंद भाट यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हिएस न्युज -मराठी पत्रकार परिषद संलग्न व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्ष कार्यान्वित राहणार आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बाणेवार, सहचिटणीस संजय बोरा, खजिनदार विनय लोंढे, समन्वयक विनायक गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुनील कांबळे, माधुरी कोराड, दिनेश दुधाळे तसेच पत्रकार हल्ला कृती समिती पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिल भालेराव आणि पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी दादाराव आढाव यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै. भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात गुरुवारी (दि. 21) आयोजित केलेल्या बैठकीस पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, गणेश हुंबे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
व्हिएस न्युज - पतीपासून ती तब्बल चार वर्ष दूर होती. या कालावधीत तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. मात्र, काही दिवसांपुर्वीच पतीने तिला सासरी बोलावले. आता पतीला पोटची मुलगी दाखवायची कशी ? यावर उपाय म्हणून तिने एका महिलेच्या साथीने रविवारी चक्क एका सोसायटीतील पाच वर्षांची मुलगी पळवून नेली. या धक्कादायक प्रकाराबाबत खबर मिळताच विमानतळ पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवून अवघ्या आठ तासातच दोन्ही महिलांना बेड्या ठोकून मुलीची सुखरूप सुटका केली.
रविवारी दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास लोहगावच्या निंबाळकर नगरमधील प्राईड आशियाना सोसायटीतील शिवाजी चांदमाने यांची पाच वर्षांची मुलगी घराच्या मागील बाजुस खेळत होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या
प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे यांच्या मागर्दशनाखालील पथकाने तपासाला सुरूवात केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाजुंनी आरोपींची माहिती काढली. त्यामध्ये जयश्री शिवाजी कोळी (वय 26), हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय 55, रा. माईचा वाडा, कात्रज) यांची नावे उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन सोलापुर गाठले. तेथील हैद्राबाद रोडवरील भवानी पेठेमध्ये खड्डा रघुजी ट्रान्सपोर्ट येथून दोघींना अटक केली.
पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अविनाश शेवाळे, विशाल गाडे, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, राहूल मोरे, विनोद महाजन, प्रशांत कापुरे, नाना कर्चे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..म्हणून केले मुलीचे अपहरण !
जयश्री काळे हिला दोन मुले व एक मुलगी होती. चार वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहात होती. जुलै 2019 मध्ये काळे ही नातेवाईकांसमवेत कात्रज येथे राहू लागली.दरम्यान, तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने तिला सोलापुरला पुन्हा माघारी बोलाविले. आता पतीला मुलगी कशी दाखविणार ? म्हणून तिने हिराबाई खंडाळे हिच्या मदतीने लोहगाव येथून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचे चौकशीत सांगितले
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002