व्हिएस न्यूज - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या विविध पदांसाठी इच्छुकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे या गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी चिंचवड दौ-यावर येणार आहेत.
यावेळी सव्वालाखे या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. तरी शहर महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांनी गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) सावित्रीबाई फुले स्मारक (हॉल), महात्मा फुले पुतळ्या मागे, गांधीनगर जवळ, पिंपरी येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कायदा सेल विभागाचे अध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पांढारकर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी शनिवारी (दि. 11 डिसेंबर) ॲड. कांबळे व पांढारकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांचे सोमवारी (दि. 13 डिसेंबर) पिंपळे निलख येथील कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेते संदेश नवले, राजाभाऊ काळभोर, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडीया समन्वयक चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, प्रतिक्षा कांबळे, कुंदन कसबे, वसिम शेख, पांडूरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, आण्णा कसबे, हर्षवर्धन पांढारकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या बरोबरच या दोन नवनियुक्त शहर कार्याध्यक्षांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. कांबळे व पांढारकर हे शहर कॉग्रेसच्या सर्व कार्यक्रमात विविध आंदोलनात नेहमीच सक्रिय असतात. यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांची नियुक्ती केली आहे.
व्हिएस न्यूज - न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय न मिळाल्या प्रमाणेच असतो. परंतू, त्याला छेद देणारा निकाल पिंपरी-चिंचवड न्यायालयाने मंगळवारी (ता.१४) दिला. विशेष म्हणजे जलद न्यायाची अपेक्षा असलेल्या महिलाविषयक खटल्यात हा निवाडा करण्यात आला, फक्त ४८ तासांत म्हणजे दोन दिवसांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दस्तगीर पठाण यांनी विनयभंगाच्या खटल्यातील आरोपीला दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाच्या चपळाईबरोबर पोलिसांचाही जलद तपास या वेगवान न्यायाला कारणीभूत ठरला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर चिंचवड पोलिस सह.पोलीस निरीक्षक आणि या गुन्ह्याचे तपासाधिकारी विकास मडके यांनी फक्त २४ तासांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याला तशीच वेगवान साथ व सहकार्य त्यांना सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांचे मिळाले. त्यांनी हा खटला जलद चालवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्यच केली नाही, तर त्यावर जलदगतीने अंमलबजावणीही केली. त्याच्यामुळे १० तारखेला घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला लगेच दोन दिवसांत शिक्षा झाली.
सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर चिंचवड मूळचा जम्मू-काश्मीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेतील फिर्यादी २३ वर्षीय नवविवाहिता आहे. तिच्यावर अत्याचार करून आरोपीचा जम्मू-काश्मीरला पळून जाण्याचा बेत होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी व फिर्यादी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी पहिल्या, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर रहावयास आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा फिर्यादींच्या उघड्या दरवाजातून घरात घुसला. त्याने दरवाजा आतून बंद करीत फिर्यादींचा विनयभंग केला.त्यावर त्यांनी आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर आरोपीच्या तावडीतून त्यांनी सुटकाही करून दिली.
दरम्यान, त्यांच्या आरडाओरड्याने आरोपी घाबरला. दरवाजा उघडून त्याने पळ काढला. फिर्यादीही त्यांच्या मागे धावल्या. हे पाळून तळमजल्यावरील पार्किंगमधील रहिवाशांनी पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
त्यानंतर मडकेंसह पोलीस हवालदार केदारी, पोलीस नाईक सोनपेटे, पोलीस शिपाई बाविस्कर यांनी जलद तपास करून दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला चार्जशीट दाखल केले. १२ तारखेला रविवारी कोर्टाला सुट्टी असते. अन्यथा २४ तास अगोदरच म्हणजे कालच सोमवारी हा निकाल लागला असता.
दरम्यान, या जलदगती निकालाने समाजात एक चांगला संदेश जाणार आहे. आरोपीला लवकर शिक्षा झाल्याने असे गुन्हे करण्यास आरोपी सहसा धजावणार नाहीत. परिणामी त्यांना व या गुन्ह्यांनाही आळा बसेल, अशी प्रतिक्रिया या खटल्यात सरकार तथा पोलिसांची बाजू मांडलेल्या सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांनी दिली. अशा निकालाने धास्ती निर्माण होऊन महिलांविषयक गुन्हे कमी होतील, असेही त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून बनावट बिस्किटे देऊन फसवणूक करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील 'सोन्याचे बिस्किट गँग'च्या प्रमुखासह सात जणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतरची ही पहिली मोक्का कारवाई , या लोकांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास आयुक्त कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये सोन्याच्या बिस्किट गँगवर विविध सात गुन्हे दाखल आहेत. गँगप्रमुख प्रकाश साळवे व त्याच्या गँगमधील इतर सहा जण तळेगाव दाभाडे व परिसरात सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या उद्देशाने बनावट बिस्किटे देण्याचा प्रकार करीत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे झाले होते.
आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर गंभीर स्वरूपाचे आणि एकाच प्रकारे वारंवार गुन्हे दाखल करण्याऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले होते. या आदेशानंतर माहिती संकलित होताच या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त गणपत माडगूळकर यांनी आयुक्तांकडे दिला होता. त्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाई करण्यास परवानगी दिली होती.
परंतु सत्रन्यायालयाने ( दि.३) यातील आठ महिन्यांपासून कारागृहात बंद असलेला आरोपी तेजस प्रकाश साळवे याचा जमीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणी न्यायालयात अॅड.राजेश रणपिसे यांनी आरोपी तेजस साळवे ची बाजू मांडली. ॲड.राजेश रणपिसे यांनी आरोपी साळवे च्या बाजूने केलेला युक्तिवाद न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी ग्राह्य धरून जमीन मंजूर केला.
शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक मोशी प्राधिकरण येथे संपन्न
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जात असताना कॉंग्रेसचे सर्व आजी - माजी नगरसेवक, आजी - माजी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शहर कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची निवड नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्याचे ध्येय ठेवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
रविवारी (दि. 12 डिसेंबर) शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोशी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॅा. पी. बी. कुंभार, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अख्तर चौधरी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह वालिया, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुनिल राऊत, अबूबक्र लांडगे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, के. हरी नारायणन, विश्वनाथ जगताप, आनंदराव फडतरे, आदम पटेल, शब्बीर इनामदार, इरफान शेख, याकूब इनामदार, बाबा बनसोडे, हिराचंद जाधव, निखिल भोईर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, प्रकाश पठारे, किरण खाजेकर, प्रा. संजय पवार, वामन ऐनिले, अमर नाणेकर, अक्षय शहरकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील पाच वर्षांतील महानगरपालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभारावर सर्व सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील. यासाठी आपण सर्वांनी कॉंग्रेसची ध्येय धोरणे मतदारांपुढे घेऊन जाऊ.
शेतक-यांनी एकजुटीने ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीला पायबंद घालण्यासाठी वर्षभर आंदोलन करुन पंतप्रधानांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याच प्रमाणे आपण सर्वजण एकजूटीने महानगरपालिकेतील भाजपाची सत्ता उलथून टाकू. या निवडणूकीत कोणाबरोबर आघाडी करायचे ते वरिष्ठ ठरवतील. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच उपेक्षित, वंचित समाज आणि सर्व जाती धर्मातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत. आता कॉंग्रेसला पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.
आगामी निवडणूकीसाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांनी आपली नावे द्यावीत, कार्य अहवाल द्यावा तसेच निवडणूक विभागाने तयार केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर योग्य वेळी आक्षेप, हरकती घ्याव्यात असेही या बैठकीत ठरले. प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे म्हणाले की, डॉ.
कैलास कदम यांच्या माध्यमातून शहराला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नियुक्तीपासून पक्ष संघटनेत नवचैतन्य आले आहे. शहर कार्यकारिणी करताना सर्व जाती धर्मातील, ज्येष्ठ, महिला, युवक, युवतींना, कामगारांना संधी देण्यात येईल. नरेंद्र बनसोडे, विश्वास गजरमल, मनोज कांबळे, वसिम इनामदार, शामला सोनवणे, निगार बारसकर, कविचंद भाट आदींसह या बैठकीत सर्व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभिमन्यू दहितुले आणि आभार उमेश बनसोडे यांनी मानले.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिचंवड (प्रतिनिधी) पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर, टक्केवारीमध्ये स्वारस्य दाखविणा-या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरवासीयांचे पाणी रोखून त्यांना वेठीस धरू नये. अन्यथा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
पिंपरी चिंचवडमधील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात पाणी समस्या वाढविण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे सांगताना संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक, विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी होते. तरीही सत्ताधारी आणि प्रशासनाला दररोज पाणीपुरवठा करता आलेला नाही.
एकीकडे शहरात दररोज पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे दिवसाआड पाणी देखील नागरिकांना सुरळित दिले जात नाही. शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. वेळी अवेळी नागरिकांना पाणी सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २४ पाणीपुरवठा देण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, भाजप सत्तेत आल्यानंतर या नियोजनात पाणी फेरले गेले. सत्ताधारी भाजपच्या कारभा-यांना पाच वर्षात विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. भरमसाठ कामे काढून सल्लागार, ठेकेदारांवर खर्च करण्याला त्यांच्यामार्फत प्राधान्य दिले गेले. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. शहरातील नव्याने झालेल्या शेकडो बांधकामांना पाणी देण्यास महापालिका असमर्थ आहे.
आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आरक्षित करून ते शहरात आणण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरु झाले. भाजपला त्या प्रकल्पाचे देखील नियोजन करता आलेले नाही. भाजपच्या पदाधिकारी आणि कारभारी आमदारांकडून केवळ कामांची पाहणी करून महिना दोन महिन्यात शहराला पाणी मिळेल, अशा वल्गना सतत केल्या जात आहेत.
परंतु, या कामाला गती देण्यासाठी काही करताना ते दिसत नाहीत. केवळ भुलथापा मारून, जनतेची दिशाभूल करून पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधा-यांनी जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ते थांबवावे आणि शहराला दररोज सुरळित पाणीपुरवठा करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बोंबाबोंब आंदोलन करणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. –
दिवसाआड पाणी, हेच भाजपचं शहर परिवर्तन
पिंपरी चिंचवड शहरात सुरळित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात प्रश्न अपयशी ठरले आहे. भाजपने स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा दावा केला होता. स्मार्ट सिटीच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. तर, शहर परिवर्तन कार्यालयाच्या नावाखाली सुमारे १३ कोटींचा खर्च केवळ सल्लागारावर केल्याची माहिती आहे. पाच वर्षापूर्वी दररोज असणारा पाणीपुरवठा भाजपने दिवसाआड केला, हेच परिवर्तन भाजपनं करून दाखवलं, अशी बोचरी टीका वाघेरे पाटील यांनी केली.
व्हीएस न्यूज - सावित्रीबाल फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामुळे पुण्यातील या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पार्कमध्ये महिला उद्योजकांनी त्यांचे कार्य दाखवणे अत्यंत समर्पक आहे ,असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीयूष गोयल यांनी आज पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कला भेट दिली.
महाराष्ट्रात स्टार्ट-अप संस्कृतीचे नेतृत्व महिलांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत "आपण उद्योजकीय चौकट जिवंत ठेवली पाहिजे," असे ते म्हणाले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये स्टार्ट-अपमध्ये कार्यक्षेत्राचा भाग म्हणून नोंदणीकृत 46 टक्के एककांमध्ये महिला भागीदार आहेत त्याचप्रमाणे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांचा स्टार्टअप्समध्ये 45 टक्के वाटा आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे .” असे त्यांनी सांगितले.
इनक्यूबेटरची तुलना पालकांशी करताना मंत्री म्हणाले की, हे दोघेही मार्गदर्शक आणि समर्थक असून त्यांची स्टार्ट-अप्सना गरज आहे.“आज आपल्याकडे संपूर्ण भारतभर स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. भारतात 50000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स नोंदणीकृत असून हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप कार्यक्षेत्र आहे'', असे ते म्हणाले.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये केलेल्या नोंदणीनुसार पुण्यात 3200 तर मुंबईत 3274 स्टार्ट-अप्स आहेत, अशी माहिती देत मंत्र्यांनी पुणे-मुंबईमधील ही निकोप स्पर्धा सुरू ठेवावी, अशी सूचना केली. पुण्यात असलेले उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमुळे स्टार्ट-अपला पाठबळ देण्यात पुण्याच्या अनोख्या योगदानाचे वर्णन करत गोयल म्हणाले की, स्टार्ट-अप कार्यक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे. स्टार्ट-अप्सच्या भरभराटीसाठी, अकादमी, उद्योग आणि संशोधन यांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारतातील 79 युनिकॉर्नपैकी 4 पुण्यातील आहेत ही आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले. पुणे विद्यापीठातील विज्ञान तंत्रज्ञान पार्कमध्ये 153 स्टार्ट अप्स आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमध्ये दिव्यांग लोकांसाठी दाखवण्यात आलेले काही नवनवीन शोध उत्कंठावर्धक होते हे लक्षात घेऊन,शेतकरी, दिव्यांग आणि गरीबांसाठी आणखी नवनवीन संशोधन केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या हस्तक्षेपामुळे उद्योगांची प्रगती नेहमीच खुंटते यावर भर देत मंत्र्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकात सरकारी हस्तक्षेपामुळे औद्योगिक प्रगती खुंटल्याचे उदाहरण दिले. आज कोणताही युनिकॉर्न केवळ सरकारी पाठिंब्याच्या आधारे या स्थितीपर्यंत पोहोचला नसता, असे ते म्हणाले.
स्टार्ट-अपची रचना उद्योजकांनी तयार केली असेल आणि सरकार केवळ सहाय्यासाठी सुविधा देण्याच्या स्वरूपात असेल तरच पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी सांगितले.
कोवॅक्सिनसारखे काही उपक्रम हे सरकार आणि उद्योग सहकार्याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात परंतु या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीनें शेतकरी, दिव्यांग आणि गरीब यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर उपायांसह अब्जावधी उद्योजकही आहेत.
पार्श्वभूमी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क, पुणे,स्थापन केले आहे. इतर विविध मंत्रालयांव्यतिरिक्त या पार्कला अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे.
स्टार्टअप इंडियाचा बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रम हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चर, पुणे चे प्रशांत प्रशांत गिरबाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
व्हीएस न्यूज - विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.
श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संशोधनासोबत सृजनशीलतेलाही महत्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व असलेल्या युगात मूल्याची जाण ठेवणेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आणि मूल्यांच्या विकासावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देताना सोबत इंग्रजीचे शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होईल. स्नातकांनी त्यासाठी प्रादेशिक भाषेत पुस्तके लिहिण्याचे काम केल्यास ती समाजाची मोठी सेवा ठरेल.
सिम्बॉयसिस विद्यापीठ विश्वबंधुत्वाचे प्रतीक आहे. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपण जागतिक पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर प्रगतीची झेप घेताना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गावाच्या प्रगतिकडेही लक्ष द्यावे. जगाच्या कल्याणाचा विचार करताना देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनात अधीक चांगले यश संपादन करता येईल, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करावा. विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी या आव्हानांवर मात करीत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डॉ.मुजुमदार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला भारतीय चेहरा मिळाला आहे. भारतीय ज्ञानप्रवाहाचा शिक्षणात समावेश करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावनाही त्यात समाविष्ट आहे.
सिम्बॉयसिस विद्यापीठाने या धोरणानुसार वाटचाल सुरू ठेवली आहे. साहचर्य आणि स्वावलंबन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. सर्व भेद बाजूला सारून वैश्विक भावनेचा संदेश देताना पर्यावरण संवर्धनासारख्या महत्वाच्या विषयावरही विद्यापीठाने लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती येरवडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.
राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
व्हीएस न्यूज – एनेमिया मुक्त भारत यासाठी शासना अंतर्गत व मातृसेवा सेवाभावी संस्थे अंतर्गत व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर राबवण्यात आले.या शिबीराचे दीप प्रज्वलन करून विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले व तालेरा रुग्णालया अंतर्गत व मातृसेवा सेवाभावी संस्थे अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे रक्त तपासणी करण्यात आली.
माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विट्ठल उर्फ नाना काटे यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक व संस्थापक व संस्थापिका सुहास गोडसे व संस्कृती गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.तालेरा हॉस्पिटल च्या डॉ. विदया मुंडे व संस्थापक_ सुहास गोडसे व संस्कृती गोडसे यांचा सन्मान विट्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक मानसी सुहास गोडसे , संस्थापिका संस्कृती गोडसे , तालेरा रुग्णालयाचे डॉ. विदया मुंडे व सर्व टीम उपस्थित होते. मातृसेवा सेवाभावी संस्था गेली अकरा वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध व असाह्य , निराधार लोकांसाठी कार्य करीत आहेत संपूर्ण गोडसे कुटुंबीयांनी हा सेवेचा वसा घेतला आहे.
आज संस्थेत आजी आजोबांनी संस्थेचे अतिशय कौतुक केले व समाधानी व आनंदी चेहरे पाहून समाधान मिळाले असे मत मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या संस्थापिका संस्कृती गोडसे या पुण्यातील नामवंत रुग्णालय सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्य करीत आहेत. परंतु त्यांनी स्वतः आपली संस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या संस्थेमध्ये सध्या 18 अनाथ वयोवृद्ध नागरिक असून औंध येथेही 16अनाथ वयोवृद्ध अंध नागरिकांचा सांभाळ सध्या या संस्थे मार्फत केला जात आहे. त्यांना फिजिओथेरपी , मसाज देणे , चालवणे , मोटिवेट करणे , कौन्सिलिंग करणे , हरिपाठ , भगवदगीता , गाणी म्हणणे व सर्व वर्षभरातील सणवार त्यांच्यासोबत करीत आहेत.
व्हीएस न्युज - थेरगाव ,काळेवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी जागा आरक्षित करून उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी कब्रस्तान संघर्ष समिती च्या माध्यमातून परिसरातील सर्व मस्जिद व घराघरांमध्ये बैठकांचे सत्र सुरु असून मागील आठवड्याभरात २५-३० मॅरेथॉन बैठका ,कोपरा सभा घेऊन परिसर पिंजून काढण्यात आला.
यामध्ये वाकड , शेख वस्ती , काळा खडक , गुजर नगर ,डांगेचौक ,थेरगाव ,काळेवाडी ,कोकणेनगर ,पवनानगर ,पिंपळे निलख अशा अनेक ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. शुक्रवारी काळेवाडी मधील जामा मस्जिद , अबू हुरेरा मस्जिद , मक्का मस्जिद काळेवाडी फाटा , पवनानगर मस्जिद या ठिकाणी बैठक संपन्न झाली .
सदर बैठकीत मुस्लिम बांधवांकडून यापूर्वी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे दफनभूमीच्या जागेसाठी केलेल्या पत्रव्यवहारावर चर्चा झाली. दि. ६/१२/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दफनभूमीच्या मागणीसाठी पुन्हा नव्याने दिलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला .
या बैठकांमध्ये मुस्लिम बांधवानी आक्रमक पवित्रा घेत परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची मयत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीच्या परिसरामध्ये दफन करण्याचा इशारा दिला आहे.
सदर बैठकांसाठी मौलाना अलीम अन्सारी , हाजी गुलजार शेख , हाजी दस्तगीर मणियार ,कारी इकबाल ,मौलाना इस्लामऊद्दीन ,शाकीर शेख , युनूस पठाण , सिद्दीकभाई शेख हे सर्वजण मेहनत घेत असून परिसरातील युवकांचे मोठे सहकार्य लाभत आहे. प्रत्येक मस्जिदच्या परिसरात १० तरुणांचा एक गट नेमून देण्यात आला आहे. त्यांच्यामुळे परिसरातील मुस्लिम समाजामध्ये जनजागृती होत असून कब्रस्तान ची मागणी जोर धरू लागली असून घराघरात आंदोलनाचे वारे पोहचले आहे.
पालिका व पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणी मुस्लिम बांधवांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच याची दखल घेऊन तात्काळ दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून मुस्लिम बांधवाना न्याय मिळवून द्यावा .
व्हीएस न्युज - नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी (दि. १०) निवेदन एक निवेदन दिले आहे. ज्यामध्ये भोसरी परिसरात वारंवार होणाऱ्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी हे निवदेन थेट अजित पवारांना दिलं.
त्यानंतर अजित पवार यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याला तातडीने फोन करून भोसरीकरांची विजेची समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी पिंपळेगुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन भोसरीतील चक्रपाणी वसाहत, मोहननगर, धावडेवस्ती, भगतवस्ती व परिसराला भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले.
भोसरीतील विजेची समस्या सुटावी म्हणून भोसरीकरांनी महावितरणवर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मोर्चासाठी जमलेले हजारो नागरीक माघारी परतल्याचे रवि लांडगे यांनी अजित पवार यांना सांगितले.
त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज समस्या सोडवण्यासाठी जुने मिनी बॉक्स व ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले होते. या आश्वासनावर महावितरणकडून संथपणे कार्यवाही सुरू असल्याकडे रवि लांडगे यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले.
व्हीएस न्युज - मुस्लीम मतांचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले. मात्र, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा येताच त्याच्यावर भाष्य करायला तयार नाहीत. ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते, पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आज औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तिरंगा मोर्चा घेऊन मुंबईत दाखल होत आहेत. त्या अगोदर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात त्यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
खासदार जलील म्हणाले की, हा मोर्चा २७ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, करोनाचे कारण देऊन प्रशासनाने परवानगी नाकारली. अन्यथा या पेक्षा मोठा वाहनांचा ताफा असता. २०१४ पासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हा मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी भाजपाकडे करत होते. तेव्हा, भाजपा सत्तेत होती. मग, आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आहेत. त्यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण द्यायला हवं. पण ते यावर बोलायला तयार नाहीत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे अशी टीका त्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाच्या मतांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस निवडून येतात. मुस्लीम समाज हा केवळ निवडणुकीपूरता ठेवायचा आहे का? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही मुंबईला तिरंगा मोर्चा घेऊन जात असून मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावं हा आमचा मुद्दा आहे अस त्यांनी यावेळी नमूद केलं.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002