व्हिएस न्युज - राजकारण, समाजकारण, स्त्री-पुरुष संबंध, उद्योग-व्यवसाय अशा विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे. तरच, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले. चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सांगवीतील निळूभाऊ फुले रंगमंदिरात दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते व लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी विविध विषयावर त्यांना बोलते केले.
यावेळी भाजप नेते शंकर जगताप, लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे आदी उपस्थित होते.
जवळपास दीड तास चाललेल्या या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीच्या आजपर्यंतच्या प्रवासातील विविध टप्प्यांवर डॉ. पटेल आणि नखाते यांनी भाष्य केले. डॉ. पटेल म्हणाले की, सिंहासन, सामना अशा चित्रपटातील विषय आणि त्यातील सिद्धांत आजही काही प्रमाणात दिसतात. मात्र जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही. विश्वातील लोकशाहीचे धागे आणि त्याची मुळे आपल्या लोकशाहीत शोधून वैश्विक परिमाण देणारा सिनेमा आला पाहिजे. राजकारणाबरोबरच स्त्री पुरुष नातेसंबंध, समाजकारण, उद्योग व्यवसाय आदी विविध विषयांबाबतही वैश्विक परिमाण शोधणे आवश्यक आहे, तोपर्यंत भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळणार नाही. चित्रपट हा इतिहासाचा साक्षीदार असतो. तो त्या काळातला ऐतिहासिक दस्ताऐवजही ठरतो. त्यामुळे बदलते जग आणि वास्तवाचे भान हे चित्रपटात उतरले पाहिजे. चित्रपटाच्या या चौकटीत संपूर्ण जग असते.
डॉ. पटेल म्हणाले की, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे समर नखाते यांना गुरू मानतात. गुरू वाट दाखवतो, परंतू, पुढची वाटचाल शिष्यालाच पार पाडावी लागते. समर नखाते माझे पहिले गुरू आहेत. सामना चित्रपट करताना मी अगदीच नवखा होतो, सिनेमाचे तंत्र त्यांनी मला सांगितले. निळूभाऊ फुले हे माझे परममित्र होते. त्यांच्यासारखा नम्र माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहात येऊन आनंद वाटला. आमच्या निळूभाऊंचे नाव या रंगमंदिराला दिल्याबद्दल मी पिंपरी-चिंचवडकरांचे आभार मानतो.
समर नखाते म्हणाले, चित्रपटासाठीचे तंत्रज्ञान आता सर्वत्र आहे. पण केवळ तंत्रज्ञानाने भागत नाही, तर सिनेमाची एक वेगळी भाषा असते. सिनेमा केवळ चित्र दाखवत नाही, तर माणूसपणाची कक्षा विकसित करतो. भारतात प्रादेशिक चित्रपट समृद्ध आहेत, त्यातून भारतीय संवेदना, अविष्कार जगभरात पोहोचायला हवा. तंत्र आणि मांडणीपेक्षाही अभिव्यक्ती पडद्यावर काय येते हे महत्त्वाचे आहे.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, मनोरंजनाचे पूर्णपणे पॅकेज असलेला टीडीएम हा मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रेक्षकांची साथ हवी आहे. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास नवनवे मार्ग सापडत जातात व प्रश्न सुटत जातात. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते.
व्हिएस न्युज - प्रसिद्ध लेखक अजित कुमार झा यांनी लिहिलेल्या 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया: इयर २०१४ ते २०२२' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकतेच करण्यात आले. ईशान्य क्षेत्र विकास आणि संस्कृती, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, खासदार भुवनेश्वर कलिता, पद्मश्री आलोक मेहता, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार बिपलव कुमार देब, प्रसिद्ध पत्रकार राजू वाघमारे, सचिन ईटकर, विविध सरकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति उपस्थित होते.
ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा इतिहास नोंदवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्याचे सिंहावलोकन या पुस्तकात केले आहे. अजित कुमार झा हे एक अनुभवी सरकारी अधिकारी आहेत, आणि त्यांचे हिंदीतील पुस्तक, 'सशक्त पूर्वोत्तर, दक्षिण पूर्व एशिया का द्वार' खूप गाजले होते. पुस्तक प्रकाशनानंतर 'ईशान्य क्षेत्राचा आणखी विकास कसा करायचा आणि या क्षेत्राच्या यशाला भारताच्या वेगवान विकास गतीशी कसे जोडता येईल' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड विश्वविद्यालय तर्फे ईशान्य भारतातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्हिएस न्युज - आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटांतून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. मलाही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी त्याला सामोरा गेलो. शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही, हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.
आजपर्यंतच्या वाटचालीत रसिक प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. दिशा फाऊंडेशनकडून झालेला माझा सन्मान म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेले प्रोत्साहन आहे. कौतुक माणसाच्या अंगात दहा हत्तीच बळ देत असते, अशा भावना भाऊराव यांनी यावेळी व्यक्त केल्या.
प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.
व्हीएस न्युज - आगामी महापालिका निवडणुकीत ‘अब की बार १०० पार’चा निर्धार भाजपाने केला आहे .शहरातील बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी कडून भर देण्यात येत आहे. ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथनिहाय जबाबदारी आणि कर्तव्य निश्चित करण्यात आली आहेत.याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.
पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात असे अभियान पक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे, असं भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ सुरू करण्यात आले. त्याची प्रशिक्षण बैठक भोसरीत पार पडली.
भोसरी विधानसभा मतदार संघात ‘‘बूथ सशक्तिकरण अभियान’’ ची सुरूवात आणि प्रशिक्षण बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विलास मडिगेरी, संतोष लोंढे, निगडी- चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके, सुरेश म्हेत्रे, कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख हनुमंत लांडगे आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण बैठकीमध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाचे पीपीटी प्रेझेंटेशन करण्यात आले. तसेच, बूथमधील कार्य, सर्व समाज घटकांचा विचार करून ३० कार्यकर्त्याची यादी तयार करणे व सत्यापित करणे, बूथ समितीमधील ११ कार्यकर्त्यांचे कार्य विभाजन, मन की बात प्रमुखाची कामे, लाभार्थी संपर्क प्रमुख, कार्यक्रम प्रमुख यांच्यासह पेज प्रमुखांच्या कामाचे नियोजन करण्यात आले. तसेच, भाजपाच्या ‘सरल’ ॲपबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ‘मन की बात’ बूथ बैठक दर महिन्याला निश्चित करण्यात आली. येत्या २६ मार्च रोजी प्रत्येक बूथमध्ये आणि ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ चा १०० वा कार्यक्रम प्रत्येक गावात भव्य आणि नाविन्यपूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
प्रशिक्षण बैठकीत सूत्रसंचालन भोसरी चऱ्होली मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केले. तर दक्षिण भारत आघाडी अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - "दिलेल्या लिंकवर तुमचा पॅनकार्ड अपडेट करा, तुमचं SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे" असे भासवून लिंक वर क्लिक करण्यास भाग पाडून एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा घातला. सदरची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.या प्रकरणी अशोक विठ्ठलराव मडावी (वय- ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे. तुमचं पॅनकार्ड अपडेट करा अशा आशयाचा इंग्रजीत टेक्स्ट मॅसेज आला. त्यात एक लिंक दिलेली होती. शहानिशा न करता त्यावर क्लिक करून तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट केले तसेच माहिती आणि ओटीपी भरून दिला. काही सेकंदातच त्यांच्या SBI बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच अशोक विठ्ठल मडावी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर महिला सफाई कर्मचाऱ्यांनी 7 मार्चपासून ठिय्या आंदोलन केले होते. 12 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या पैकी 11 मागण्या मान्य झाल्या असून आयुक्त राजेश पाटील यांनी लेखी दिले आहे. त्यामुळे गेल्या दिवसांपासून सुरू असलेले महिला सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित झाले असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याचेही बाबा कांबळे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकांतर्गत सफाई करण्याचे काम ठेकेदारांना दिले आहे. हे ठेकेदार मनमानी पद्धतीने महिला सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ठेकेदारांच्या या मनमानिविरोधात महिला सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर ठिय्या मांडत आंदोलन छेडले. तीन दिवस आंदोलन केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे देखील या वेळी उपस्थित होते. या वेळी 11 मागण्या मान्य करण्यात आल्याचे लेखी आयुक्तांनी दिले.
या मागण्यांमध्ये सर्व सफाई कामगार महिला, पुरुष पैकी कोणालाही कंत्राटी कामगारांना नवीन ठेकेदार कामावरून कमी करू नये. अर्ध वेळ कामास घेतल्यास पुढील दिवसाचा किमान वेतन प्रमाणे पगार द्यावा. कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी जास्त कामे व अतिरिक्त कामे, मातीचा ढीग उचलणे हाताने, मैला उचलने व इतर अतिरिक्त कामे सांगण्यात येऊ नयेत. सफाई कंत्राटी कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, पिळवणूक थांबून कामाच्या ठिकाणी मोकळेपणा मिळाला पाहिजे. मागील वर्षाचे बोनस देण्यात यावे सफाई कामगाराचे बोनस थकित 18 ते 21 थकित बोनस देण्यात यावे. सफाई कामगारांना मनपाने कायमस्वरूपी कामावर घ्यावे. कंत्राटी पद्धत बंद करा. नवी मुंबईच्या धरतीवर सफाई कामगारांना घरकुल योजना राबविण्यात यावी. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आदींचा समावेश होता.
दिलेल्या लेखी आश्वासनांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्याकडून दर वर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा "सलाम 2022 पुरस्कार" हा महिला सक्षमीकरण, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या रोटरीच्या जिल्हा राज्यपाल मा. मंजू फडके, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, संचालिका व विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर, सल्लागार डॉ. पी. जयराज तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सारंग माताडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गणेश वंदना आणि गान सम्राज्ञी लता दीदीना आदरांजली वाहत त्यांनी गायलेल्या निवडक गाण्याचे सादरीकरण पब्लिक स्कूलच्या महिलांनी केले. आणि कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रणजित पाटील प्राचार्य डॉ डी वाय पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांनी केले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने विविध सामाजिक कार्याचा आढावा अध्यक्ष संतोष जाधव यांनी मांडला. मनोगत –
सारंग माताडे, सचिव- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन - “समाज कार्यातून ठसा उमठवणाऱ्या अष्टपैलू व्यक्तीचा सन्मान करताना आज स्त्रीत्वचा सन्मान होत असल्याची भावना” सचिव सारंग माताडे यांनी व्यक्त केली. मंजू फडके, रोटरीच्या जिल्हा राज्यपाल - “नुसती नाती नाहीत तर समाज घडवणारी, दुसऱ्याला पुढे घेऊन जाणारी, मुलांना संस्कार देणारी, चांगला देश निर्माण करणारी आणि नात्याबरोबर समाजामध्ये एकमेकांसाठी उभी राहणारी कोण असेल तर ती स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो, आज या दिनानिमित्त कर्तृत्त्ववान महिलाचा एक गुण आपण आत्मसात करूयात आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेला पुढे जाण्यासाठी साथ देऊया तरच या दिनाचे सार्थक होईल”. असे मत मंजू फडके रोटरीच्या जिल्हा राज्यपाल यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या, माझ्या हस्ते डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांचा सन्मान होतो आहे याचा मला फार आनंद होत आहे. डॉ. भाग्यश्रीताई पाटील, प्र-कुलपती - डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे - “आज मला मिळालेला सलाम पुरस्कार माझ्या सोबत कार्यरत असणाऱ्या महिलांना मी समर्पित करते, स्त्री असणे ही भाग्याची देणगी असल्याचे मी समजते असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या की, शेती क्षेत्रापासून सुरू झालेला माझा प्रवास शिक्षण, आरोग्य, कला आदी क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत मला सर्वाचेच पाठबळ मिळाले. हा प्रवास सहज सोपा नव्हता त्यासाठी कष्ट करण्याची ताकद व जाणीव माझ्या आई वडीलांकडून मिळाली. आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी महिलांनी कायमच सकारात्मक विचार घेऊन चालाल तरच यशस्वी व्हाल” असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबची आम्हाला कायम साथ असते. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विविध महाविद्यालयांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. उज्ज्वला शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्राचार्य मृदुला महाजन, प्राचार्य डॉ. रेखा पाठक यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा चव्हाण, प्रा. अलकनंदा माताडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार डॉ. मृदुला महाजन यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पुणे येथील कोथरुड परिसरातून राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएनं) एका व्यक्तीला केली आहे . इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्यासोबत ही व्यक्ती संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
कोथरुडमधून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तल्हा खान असं आहे. कोंढवा येथील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या तल्हा खानच्या घरावर एनआयएने सोमवारी सायंकाळी छापेमारी केली. यामध्ये त्यांना काही महत्वाची कागदपत्र आणि डिजीटल स्वरुपातील साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य एनआयएने ताब्यात घेतलं आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासना या संघटनेचा हस्तक असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
या प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आलीय. तल्हा खान हा अटक केलेल्या चार जणांपैकी नबील सिद्दीक खत्रीच्या संपर्कात होता. मार्च २०२० मध्ये दिल्लीतील लोधी कॉलीनी पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. काश्मीरमधील एक पती-पत्नीचं जोडपं आयसिससाठी तरुणांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा खुलासा मागील वर्षी झाला होता.
या दोघांना अटक करुन चौकशी केली असता पुण्यातील एक मुलगी या दोघांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. याच मुलीच्या संपर्कात नबील सिद्दीक खत्री होता. तर तल्हा खानही खत्रीच्या संपर्कात होता असं आता समोर आलं आहे. त्याच आधारे त्याला एनआयएने ताब्यात घेतलंय. या चौकशीमधून आणखी काही लोकांपर्यंत एनआयए पोहचू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
व्हिएस न्यूज - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नागपूर येथील विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्यानं या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर आता न्यायालयानं या निर्मात्याला तब्बत १० लाखांचा दंड ठोठावला आहे.
अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करणारे हैदराबादस्थित चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने कुमार यांना ही रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत जमा न केल्यास, जिल्हाधिकार्यांनी ३० दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
व्हीएस न्यूज -जागतिक महिला दिनाच औचित्य भोसरी परिसरातील गिरीजा लांडगे यांनी खुशी विनोद कांबोज आणि अरमान मुजावर यांच्या साथीने मोरोशीचा ४५० फूट उंचीचा भैरवगड ज्याची अवघ्या १२ तासात सर केला आहे. अत्यंत कठीण आणि मातीचा काही भाग असलेल्या भैरवगडावर चढाई करण्याचा पराक्रम या तिघींनी केला आहे.
भैरवगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. चढाईसाठी अत्यंत कठीण आणि तांत्रिक माहिती असणाऱ्या गिर्यारोहकाला यावर चढाई करणे सोपे जाते. भोसरीमधील गिरीजा धनाजी लांडगे, कोल्हापूरच्या खुशी विनोद कांबोज आणि तासगावच्या अरमान मुजावर यांनी हा भैरवगड सर करायचा असा निश्चय केला होता. चार ही बाजूंनी सोसाट्याचा वारा वाहत असताना रुट क्लायंब करणं अवघड असते आणि वेळ ही खूप लागतो. त्यामुळे अनेक गिर्यारोहक ही मोहीम अर्ध्यावर सोडतात आहे. मात्र या तिघींनी एकत्र येत ही मोहिम सर केली आहे.
कशी केली चढाई?
महिलादिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्रीतील भैरवाचे म्हणजे भैरवगडाचे पूजन करुन गिर्यारोहणास सुरुवात केली. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४:३० पर्यंत तिघींनी तिसऱ्या स्टेशन पर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे पहिल्या व दुसऱ्या स्टेशन पर्यंत शिडीचा वापर न करता प्रस्तरारोहण केले जे विशेष कौतुक करण्यासारखे आहे. तिसऱ्या स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी मध्ये असणारा ओव्हरहॅंग खूपच अवघड दमछाक करवणारा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महिला सकाळी ११च्या सुमारास तिसऱ्या स्टेशनपासून पुढील चढाईला सुरुवात झाली. तिसऱ्या स्टेशन पासून ट्रॅव्हर्स मारत ओपन बुक सेल्फ आणि त्यानंतरची क्रॅक पार करत या तिनही मुली ध्येयापर्यंत पोहचल्या. पण, अधिकचा टप्पा पार करायचा होता. भिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कोणताही बोल्ट न वापरता ७० अंश कोनात १०० ते १२५ फुट स्क्री (मातीची निसरडी घसरण) अशी चढाई होती. ती चढून या तिघी भैरवगडाच्या माथ्यावर पोहचत मोहीम यशस्वी फत्ते केली.
व्हीएस न्यूज - समाजावर सुसंस्कृतपणे संस्कार करणारी माता असते, तिच्या ह्रदयी प्रेमाचा पाझर असतो. प्रेमाने ती सर्व संकटांवर विजय मिळवू शकते. अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य प्रत्येक स्त्री मध्ये असते. तिला तिची सक्षमता सिध्द करण्यासाठी संधीची आणि कुटूंबांतून पाठबळ मिळण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने समाजाला आजही या स्त्री शक्तीची म्हणावी अशी ओळख झालेली नाही. यासाठी तिच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अनादी काळापासून आजपर्यंत तिची लढाई चालू आहे.
‘ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी आणि तिच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक सक्षमतेसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून मानिनी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. भारती चव्हाण उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, स्त्रीचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे पुरुषी मानसिकता. मग तो जाहिरातीतले प्रदर्शन असो किंवा ओंगळवण्या गलिच्छ चित्रफिती असो. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या मानसिकतेतून आजही बाहेर न पडणारी पुरुषी मानसिकता,समाजातील, घरातील, बाहेरील शत्रूंना झेलत झेलत ‘ती’ तिची लढाई लढत असते. खरेतर ती समाजाच्या नितीमत्तेचा कणा आहे. ८ मार्च महिला दिन जवळ आला की महिला संघटना, संस्था उत्सवाच्या हेतूने तयारीला लागतात. या दिवसाचा मुख्य हेतू महिलांचे आर्थिक, सामाजिक मानसिक आणि कौटूंबिक सबलीकरण सक्षमपणे व्हावे हा आहे. मात्र सध्याच्या काळात त्याला प्रसिध्दीची जोड दिली जाते. परंतू त्यातून मुख्य हेतू साध्य होताना दिसत नाही. आपल्या जवळची कोणती स्त्री सबळ आहे का ?
आपण स्वतः तरी सबळ आहोत का ? घटस्फोटीत व विधवा स्त्रीयांना समाजात सन्मान आहे का ? हळदी कुंकू कार्यक्रमाला विधवा स्त्रीला बोलवण्याचे धाडस इतर स्त्रीया करतात का ? विनयभंग किंवा बलात्कार पिडीतेला समाज सन्मान देतो का ? असे प्रश्न आज प्रत्येक सक्षम स्त्रीने स्वत:लाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कौटुंबिक स्त्रीयांवर अन्याय अत्याचार करण्यामध्ये स्त्रीयांचाच पुढाकार जास्त असतो. यासाठी शालेय वयापासूनच स्त्री, पुरुष भेदभाव न मानता प्रबोधनाची गरज आहे.
जागतिक महिला दिनाचा इतिहास देखील महिलांनी समजून घ्यावा. अमेरिका युरोपसह जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्रियांना २० व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या अन्यायाविरुद्ध महिलांच्या मतदानाच्या हक्कांसंदर्भात ‘द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ ची स्थापना १८९० मध्ये झाली. सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आणि कामगार क्षेत्रातील महिला कामगारांच्या हक्कासाठी १९०७ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरवण्यात आली. त्यावेळी अनेक आंदोलने झाली, मतदानाच्या हक्कासाठी अनेक मोहिमा उघडल्या गेल्या, ऐतिहासिक निदर्शने झाली, परिणामी १९१८ - १९ मध्ये या मागण्यांना यश मिळाले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या ठरावानुसार ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला.
भारतात प्रथमच मुंबई मध्ये ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, तर पुणे येथे ८ मार्च १९७१ रोजी महिला दिन महिलांच्या हक्कासाठी एक मोठा मोर्चा काढून साजरा करण्यात आला. पुढे युनोने १९७५ हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्या नंतर स्त्रियांच्या समस्यांना व्यासपीठ मिळत गेले. स्त्रियांच्या समस्या ठळकपणे पुढे आल्या. महिला संघटनांना सक्षम करण्याबाबत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही संघटनांचे स्वरूप बदलले तशा संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. त्यानंतर तर ८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने साजरा होऊ लागला.
आधुनिक काळात महिलांकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या व फसवणुकीच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होत आहे ही चिंताजनक आणि धक्कादायक बाब आहे. स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही. महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतू अद्यापही साध्य झालेला दिसत नाही. शासनाने "महिला शक्ती विधेयक" मंजूर करून महिलांवरील अत्याचाराबाबत २१ दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाचे यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त दिलेली अवर्णनीय भेटच म्हणावी लागेल. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे मानिनी फाऊंडेशन आभार व्यक्त करीत आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - पिंपरीमध्ये रविवार पासून अंशता मेट्रोची सेवा सुरु होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या मेट्रो प्रकल्पाचे काम अर्धवट असताना निव्वळ निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन भाजपाने श्रेय लाटण्यासाठी उद्घाटनाची घाई केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अवघ्या महाराष्ट्राचा अवमान करणारे वक्तव्य पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे मंत्री, पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत असे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
रविवारी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यामध्ये मेट्रोचे उद्घाटन केले. त्याचवेळी पिंपरी मध्ये पिंपरी मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन पर्यंतच्या मेट्रोचे त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी मेट्रो स्टेशनवर काळे झेंडे दाखवून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विजय ओव्हाळ, सतिश भोसले, सौरभ शिंदे, किरण खाजेकर, अर्जुन लांडगे, सुधाकर कुंभार, सुभाष भंडारे, रवी यादव, तेजस पाटील, शरद कांबळे, सचिन सोनटक्के, अविनाश कांबळे, अमर पांडे, संतोष नांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, पुणे आणि पिंपरी मध्ये मेट्रो सेवा सुरु करण्याचे स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचे नियोजन होते. पुढे त्याला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला चालना दिली आणि सुरुवातीला २५ कोटी रुपयांचा निधी दिला. यानंतर पीएमआरडीएच्या स्थापने नंतरच्या पहिल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुरेश कलमाडी यांनी या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा आणि नियोजन केले. पुणे - पिंपरी मेट्रो हे कॉंग्रेसचे नियोजन आहे. असे असताना निव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजपा त्याचे उद्घाटन करीत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेमध्ये अवमान केला आहे. शेतकरी आणि कामगारांचा अवमान केला आहे. अशा पंतप्रधानांचा तीव्र निषेध शहर कॉंग्रेसच्या वतीने करीत आहोत असे डॉ. कैलास कदम म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले की, दिल्लीत कृषी कायद्यांचा विरोध करीत असताना आंदोलनात ७०० शेतक-यांचा मृत्यू झाला. ह्याला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ह्या शेतक-यांचे खून पाडले आहेत असं आमचं मत आहे. कोरोनाच्या मुद्यावर पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेले मोदी आणि भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीत आश्वासन दिले होते. परंतू अगदी त्याच्या विरुध्द भाजपा आणि त्यांचे पदाधिकारी वागत आहेत. अन्याय, अत्याचार सुरु आहे. याचा सामाजिक पक्षांच्या वतीने निषेध करीत आहोत असेही भापकर म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002