मतभेद असणाऱ्यांना जगूच द्यायचे नाही, अशी आजची परिस्थिती
तळेगाव दाभाडे
2018-01-31
व्हीएस न्यूज -आज समाजात प्रेम कमी आणि हिंसा मोठ्या प्रमाणात आहे. मतभेद असणाऱ्यांना जगूच द्यायचे नाही, अशा परिस्थितीमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. फुले-शाहू-आंबेडकर, महात्मा गांधी यांचे प्रेम, बंधुता, अहिंसा, शांतता, आर्थिक-सामाजिक समतेवर आधारित विचार आचरणात आणले, तरच समाजात सलोखा निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केले.
इंद्रायणी महाविद्यालयातर्फे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सामाजिक सलोखा आणि आजचे समाज वास्तव याविषयावर निखील वागळे बोलत होते. महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, रामदास काकडे, केशव वाडेकर, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राजश्री म्हस्के, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, व्याख्यानमालेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे आदी उपस्थित होते. निखील वागळे म्हणाले, सामाजिक सलोख्याची आस मनात असावी लागते. ती अचानक निर्माण होत नाही. आज जातीव्यवस्था बळकट होत चालल्यामुळे समाजात अस्थिरता येऊ लागली आहे. धार्मिक कारणावरून दंगली घडण्याचा शाप 1872 पासून महाराष्ट्राला आहे, तो अद्याप आहे. दंगलीची कारणे माहीत असूनही, अद्याप दंगली होतच आहेत. स्वातंत्र्यानंतर नथुराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधी यांचा खून केला. स्वातंत्र्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवणारी ही पहिली घटना होती. गांधीजींमुळे फाळणी झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण गांधीजींचा फाळणीला विरोधच होता. नथुराम ब्राह्मण होता, म्हणून गांधीजींच्या खूनानंतर ब्राह्मणांना लक्ष्य करणेही चुकीचे होते. नथुराम ब्राह्मण नाही, तर माणूसच नव्हता. तो धर्मांध अतिरेकी होता. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीचे समर्थन करणे चुकीचे आहे. महात्मा गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू मानायचे. सनातन हिंदू धर्म ऋग्वेदावर आधारित असून, त्याचा पाया सर्वधर्म समानतेचा आहे. आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक विकास ही सनातनची धर्मकल्पना आहे. वागळे यांनी पुढे सांगितले, आजच्या तरुणाईने फुले-शाहू-आंबेडकर-महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्याविषयी वाचले पाहिजे. शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजेत. शिवाजी महाराजांसारखा धर्मनिरपेक्ष राजा नाही. आज शेतकरी मंत्रालयाच्या दारात मरताहेत. तरी सरकारला काही देणे-घेणे नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी, गरीब, व्यापारी सर्व मिळून मिसळून राहायचे. ते सर्व जाती-धर्माचे राज्य होते. आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाती-धर्माचे अवडंबर माजवले जात आहे. धर्मजाती व्यवस्था, आर्थिक विषमता, लिंगभेद विसरून समता निर्माण झाल्याशिवाय सामाजिक सलोखा शक्य नाही, असेही वागळे यांनी सांगितले. डॉ. एस. के. मलघे यांनी परिचय वाचन केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी, तर आभार प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी मानले.