व्हीएस न्यूज - पती-पत्नीत होणाऱ्या सततच्या भांडणामुळे दोघांनी पोटच्या दहा वर्षांच्या मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार आकुर्डी येथे शुक्रवारी उघडकीस आला आहे. निर्देयी आई-वडीलांनी मुलीला निगडी पोलीस ठाण्यात आणून सोडले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, दोघांनाही शुक्रवारी मोरवाडी न्यायालयात हजर केले असता पतीचा जामीन मंजूर झाला तर पत्नीच्या जामीनदाराला येण्यास उशिरा आल्याने तिचा जामीन होऊ शकला नाही. पत्नीने न्यायालयातही मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याने शेवटी पतीनेच दोन्ही मुलांना सांभाळण्याची तयारी दर्शविली. राजेश जयसिंग भोसले (वय-39, रा. स्वप्नपुर्ती बिल्डींग, पंचतारानगर, आकुर्डी), प्रतिभा राजेश भोसले (वय-34, रा. सेक्टर नंबर. 21, बिल्डींग 20, रूम 06 यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या आई-वडीलांची नावे आहेत. समृध्दी (वय-10) असे दुर्देवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक काशिनाथ खंडाळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी माहिती दिली. राजेश भोसले व प्रतिभा भोसले यांचे अकरा वर्षापुर्वी लग्न झाले आहे. त्यांना पाच वर्षाचा शौर्य तर दहा वर्षांची समृध्दी आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून सतत वाद होत आहेत. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहत आहेत. प्रतिभा भोसले मुलाला सांभाळण्यास तयार झाल्या. तर मुलीला सांभाळण्यासाठी प्रतिभा यांनी पतीकडे पैसे मागितले. राजेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलीला सांभाळण्यास नकार दिला. त्यानंतर राजेश यांनीही मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याने हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. त्यांनी मुलीला गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी पोलीस ठाण्यात आणून सोडले. गेल्या तीन दिवसांपासून निगडी पोलीस व महिला दक्षता समितीच्या महिलांनीही भोसले दांपत्याला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. भोसले दांपत्यावर कलम 317, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे शौर्य व समृध्दी दोन दिवसांपासून निगडी पोलीस ठाण्यातच राहत असून पोलीस कर्मचारी त्यांचा सांभाळ करत आहेत. राजेश भोसले एक्साईड बॅटरीमध्ये कामाला आहेत. तर प्रतिभा भोसले या गृहिणी आहेत. समृध्दी ही निगडीतील अमृता शाळेत चौथी वर्गात शिकत आहे. दरम्यान, केंद्र सरकार 'बेटी बचाओ, बोटी पढाओ', असा नारा देत असले तरी 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आजही मुलीबाबतचे समाजमन बदलण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. आई-वडीलांच्या वादात दोन्ही चिमुकल्यांच्या मनावर काय परिणाम होतील याचा भोसले दांपत्याने जराही विचार केला नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.