व्हीएस न्यूज - भारताचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी कंपन्या, उद्योजक आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायिकांना कुशल, अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी-शिक्षण संस्था-उद्योग संस्था जोपर्यंत एकत्र येत नाही; तोपर्यंत उद्योग क्षेत्र मोठे होऊ शकत नाही. इंजिनिअरिंग क्लस्टर सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी फायदेशीर आहेत, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी चिंचवड येथे व्यक्त केले.
पुणे, पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल व्हेंडर कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, सहसंचालक विश्वनाथ राजळे, पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, संचालक अभय दप्तरदार, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये 'कॉमन फॅसिलिटी सेंटर' सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा छोट्या उद्योजकांनी घ्यावा. महागडी मशिनरी खरेदी करून आर्थिक भार वाढवण्यापेक्षा फॅसिलिटी सेंटरमधून अपेक्षित उत्पादन घेता येईल. उत्पादित वस्तुंची उपयुक्तता, गुणवत्ता, दर्जा आदी बाबी तपासणीच्या सुविधादेखील अशा क्लस्टरमधून दिल्या जातात. त्यामुळे एमएसएमई उद्योजकांच्या उत्पादनांना मोठ्या कंपन्यांकडून तसेच जागतिक बाजारपेठे मधूनही मोठ्याप्रमाणावर मागणी असते, हे राज्यातील 14 क्लस्टरमधून होत असलेल्या कामावरून सिध्द झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून उपयोग नाही, तर सॉफ्ट स्किल असणे आवश्यक आहे. तरच चांगल्या रोजगारसंधी उपलब्ध होतील. उद्योग विश्वाला अपेक्षित कार्य पुण्यातील क्लस्टरकडून होत आहे, त्याबद्दल देसाई यांनी कौतुक केले. आज घडीला देशातील औद्योगिक क्षेत्रास विजेच्या समस्येने ग्रासले आहे. मुबलक पाणी उपलब्ध नाही, चांगल्या दर्जाचा कोळसा भारताला आयात करावा लागतो. यासाठी अधिक आर्थिकभार सोसावा लागतो. याचा परिणाम वीज निर्मितीवर होतो. त्याऐवजी आपण सौर, पवन ऊर्जा या अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविला पाहिजे. परंतु, या ऊर्जा स्त्रोतांच्या वापरासाठी आवश्यक तंत्रज्ञान, साधनसामुग्री यांची निर्मिती भारतामध्ये झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन स्वस्त आणि किफायतशीर वीज निर्मिती होऊन देशापुढील समस्या सुटण्यास मदत होईल. देशातील एकुण गुंतवणुकीचा विचार केल्यास 50 टक्क्यांहुन अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होते. उद्योग क्षेत्रात राज्याचा प्रथम क्रमांक अजुनही आबाधित आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्रालाच प्रथम पसंती देतात. मागील वर्षी मेक इन इंडिया मध्ये 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त प्रकल्प कार्यान्वित होण्यास सुरुवात झाली आहे, असे सुभाष देसाई म्हणाले. प्रास्ताविकात पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे म्हणाले की, 2011 मध्ये चिंचवड येथे क्लस्टरची स्थापना होऊन 2014 मध्ये प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली. या क्लस्टरमधील सुविधांचा लाभ तीनशेहुन अधिक लघु उद्योजकांना झाला असून सुमारे 800 कुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. महाराष्ट्रासह देशभरातून उद्योजक आणि कामगार येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून होस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी, शिंदे यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली. यावेळी राजीव गुप्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय दप्तरदार यांनी केले. कार्यक्रमास इंजिनिअरिंग क्लस्टरचे सदस्य, लघु उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमएसएमईशी संबंधित हे प्रदर्शन 6फेब्रुवारीपर्यंत विनामुल्य सुरू राहणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002