व्हीएस न्यूज - "परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात तर कधी रडवतात" असे उद्गार ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी निगडी येथे काढले.
निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात कवी बी.एस.बनसोडे लिखित, साहित्य सुधा आणि सूरज पब्लिकेशन आयोजित 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाच्या आणि 'जीवनगाणे' या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ए.के.शेख बोलत होते. प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाचे; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते 'जीवनगाणे' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत हुईलगोळकर, कवी बी.एस.बनसोडे आदी उपस्थित होते. गझलकार ए.के.शेख म्हणाले की, "आतड्याला पीळ पडणारे काव्य म्हणजे गझल होय; आणि अशा गझलसदृश्य रचना बी.एस.बनसोडे यांच्या 'तुझ्याविना' या गझलसंग्रहात आढळतात. डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले की, जीवन जगत असतानाअंत:प्रेरणेने त्यांना जे गाणे स्फुरले त्यातून 'जीवनगाणे' हा काव्यसंग्रह अस्तित्वात आला असावा. प्रा.तुकाराम पाटील यांनी, "स्वतः स्थिर राहून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी जगण्यातला अस्सल अनुभव लागतो; आणि तो कवी बी.एस.बनसोडे यांच्यापाशी आहे" असे मत मांडले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले. प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले, त्यात सुमारे वीस कवींनी सहभाग घेतला. रघुनाथ पाटील, दीपेश सुराणा, अशोक कोठारी, डॉ.सुधीर काटे, दीपक अमोलिक, आय.के. शेख, दत्तू ठोकळे, राजेंद्र सोनवणे, आदींच्या कविता उल्लेखनीय होत्या. नंदीन सरीन यांनी गझलगायन केले. दिनेश भोसले यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. आशा बनसोडे, सूरज बनसोडे, माधुरी विधाटे, दादा इंचलकर, राजेश जैन यांनी संयोजनात सहकार्य केले.