व्हीएस न्यूज - - नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नेत्र रूग्णालयाच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून दिल्याने ही एक सामाजिक सेवा आहे, असे मत भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी व्यक्त केले. तसेच दृष्टीहीनांसाठी प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इंद्रायणी नदीच्या काठी देहूगाव येथे ‘नेत्र सेवेसाठी समर्पित’ या उद्देशाने सुरू केलेल्या इंद्रायणी नेत्र रूग्णालय व फेको सेंटरचे भारत नवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देहूनरीच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, संत तुकाराम महाराज देहूगाव संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे-इनामदार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला करंडे, औंध जिल्हा रूग्णालयाचे डॉ. बाळासाहेब शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, सुनिल घोडेकर, माजी सरपंच मधुकर यादव, ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अँड. सुग्रीव नेरे, सरकारी वकील अँड. प्रतिभा नेरे-तांबारे, डॉ. किशोर यादव, डॉ. संतोष सोमटकर, डॉ. परमेश्वर तिडके, डॉ. रोहन चव्हाण, ऍड. निर्मला यादव, डॉ. विद्या यादव, गंगा यादव, जेजेराम यादव, प्राचार्य सदाशिव कांबळे, पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार, कर्तव्य फांऊडेशनचे अमित शिवले यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”देशात लाखो लोक अंध आहेत. त्यांना जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना सुंदर सृष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे”, असे आवाहनही भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी केले. ”अंध व्यक्तींना नवीन नेत्र बसवून त्यांना नवसंजीवनी देण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने आपण गरजूंना नवीन नेत्र बसवू शकत नाही. जर आपण मरणोत्तर नेत्रदान केले तर निश्चित गरजूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना नवसंजीवनी देता येईल”, असेही नवले यावेळी म्हणाले. याप्रसंगी देहूच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, रत्नमाला करंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजेराम यादव यांनी केले. तर, अँड. निर्मला यादव यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002