व्हीएस न्यूज - "कठीण प्रसंगातही धैर्याने सामोरे जात धाडसी निर्णय घ्यायला हवेत. तुमच्याकडे सुशासन, धोरणात्मक व्यवस्थापन आणि चांगल्या उपायांचे पर्याय असतील, तर जटील समस्या सोडविण्यात हमखास यश मिळते. नक्षलवादाच्या, मानवी तस्करीच्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक प्रसंगात या गोष्टींचा उपयोग झाला. समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधण्याची हातोटी यामुळे चांगले काम करणे शक्य होते,'' असे प्रतिपादन तेलंगणा राज्यातील राचकोंडाचे पोलीस पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (डीवायपीआयएमएस) वतीने आयोजित नवव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महेश भागवत बोलत होते. याप्रसंगी प्रसन्न ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न पटवर्धन, 'डीवायपीआयएमएस'चे कार्यकारी संचालक विंग कमांडर पीव्हीसी पाटील, संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, डॉ. जे. जी. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 'नेतृत्व, सुशासन आणि धोरणात्मक व्यवस्थापन ; यशाची गुरुकिल्ली' या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
भागवत म्हणाले, "आज भारतासह जगभरात मानवी तस्करीचा प्रश्न मोठा आहे. 1700 पेक्षा अधिक वेश्यावस्ती देशात असून, 30 लाख वेश्या यामध्ये काम करताहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. नक्षलवादाचा प्रभाव अलीकडे कमी झाला असला, तरी छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात नक्षलवाद अधूनमधून डोके वर काढतो. आपल्या कुशल नेतृत्वाचा, नियोजनाचा आणि विवेकबुद्धीला विचार करून काम केले, तर अनेक समस्या सुटतात. नक्षलवादी भागात ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या कामातून अनेक नक्षलवादी शरण आले.
डॉ. आशुतोष मिसाळ यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. तसेच परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दुपारच्या सत्रात इंडियन स्कुल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ व्यवस्थापक जे. संदीप, मकरंद ब्रम्हे यांनी मार्गदर्शन केले. तर चर्चासत्रात आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे मुख्याधिकारी रेखा दुबे, सुनील कोडे, चैत्राली पेट्रोकेमिकल्सचे चेतन यादव, बिझनेस स्टॅण्डर्डचे सुमेध गुप्ते, हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल माया महंत यांनी सहभाग घेतला. सोनिया राजगिरे आणि वृषाली डोके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय गायकवाड यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002