व्हीएस न्यूज - सामाजिक कार्य करीत असताना कोणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यानुसार आपले कर्म असावे, असे उद्गगार आमदार राहुल कुल यांनी काढले.
दौंड येथे स्व. रोहीणी जाधव ट्रस्टच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून नियमीत दरवर्षी देण्यात येणारे राज्य पातळीवरील विविध सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी ऍड. असीम सरोदे, प्रेमसुख कटारिया, ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र जाधव उपस्थित होते. रक्तदाते अथवा रक्त मिळवुन मदत करणारे तसेच रक्तदान शिबीर घेवून रक्त मिळवुन देणाऱ्या कार्यकर्त्यास देण्यात येणारा 'रक्तमित्र पुरस्कार' पिंपरी- चिंचवड येथील सांगवी परीसर महेश मंडळचे अध्यक्ष सत्यनरायण लोहीया यांना देण्यात आल्या. तर गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त वेळा रक्तदान केल्याबद्दल राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कार जळगाव येथील राजेश यावलकर यांना बहाल करण्यात आला. तर एडस जनजागृती पुरस्कार मिरज येथील बारामतीचे आरटीओ अधिकारी अनिल शामराव वळीव यांना देण्यात आला. नंदुरबार जिल्हयातील तळोदे येथील विठ्ठल चंदु मगरे यांना निसर्ग पर्यावरण मित्र हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नैसर्गिक संपत्तीचा नाश करीत असून, मिडीया त्याला खतपणी घालत आहे, असे मत ऍड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. देशाची लोकशाही अबादीत राहण्यासाठी सर्वांनी निष्ठेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही ऍड. सरोदे यांनी यावेळी व्यक्त केली.