व्हीएस न्यूज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असे भाकित वर्तवले आहे. पण भाजप २५० जागा मिळवून केंद्रात सत्तेत येईल, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी भाजपच्या जागा कमी होण्याला दिला.
आठवलेंना यावेळी मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्या गृहखाते माझ्याकडे नाही. पण यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच, शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरे बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील, असे आठवले म्हणाले.