व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या मजकुरात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (एनसीईआरटी) समितीने अखेर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याबद्दल यापूर्वीच्या पुस्तकात असणाऱ्या ‘अवर पास्ट-2’ या विभागात अत्यंत त्रोटक माहिती असल्यामुळेपाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी सातवी इयत्तेच्या या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे खर्ची घालण्यात आली आहेत, तर केवळ ६ ओळींत छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडून संपवण्यात आला, असे शिवसेनेचे म्हणणे होते.
त्याचबरोबर शिवरायांचे चित्र पुस्तकात जागा असूनही छापले नाही. याउलट बाबर आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र पुस्तकात छापण्यात आली होती. शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. राज्य सरकारला ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार असतो. तत्कालीन काँग्रेस सरकारने गोव्यात आंदोलन केल्यानंतर पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. पण गेली ८ वर्षे केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकात काही बदल ‘एनसीआरटी’कडून करण्यात आले. त्यानुसार आता ‘अवर पास्ट-२’ या विभागातील तिसऱ्या आणि दहाव्या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या मजकुरात १०० शब्दांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे गनिमी पद्धतीचे युद्धतंत्र, लहान वयात त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि त्यांनी कशाप्रकारे भक्कम साम्राज्याची पायाभरणी केली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे चित्रही छापण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002