व्हीएस न्यूज – शिवसेनेने त्रिपुरातील भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांचे भरभरुन कौतुक केले असून आम्हाला त्रिपुरात भाजपला विजय प्राप्त करुन देणाऱ्या सुनील देवधर यांचा कौतुक आणि अभिमान असून त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून केशराचे पंचवीस मण पीक काढल्यासारखे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
भाजपने गेल्या २५ वर्षांपासून डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुराच्या लाल किल्ल्यामध्ये भगवा फडकवला. महाराष्ट्रातील सुनील देवधर यांचे भाजपच्या या विजयात मोलाचे योगदान आहे. देवधर यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भरभरुन कौतुक करण्यात आले. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांकडे कधीच गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे ईशान्येतील सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने अफाट मेहनत घेत त्रिपुरातील नापीक जमिनीत गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी जे पेरले ते आता उगवले. सभा, भाषणे किंवा थापेबाजीमुळे नव्हे तर देवधर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हा विजय मिळाला, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. भाजपचा एक तरी आमदार त्रिपुरात निवडून येईल का, अशी शंका असताना देवधर यांनी भाजपचे सरकार आणले. मेघालय व नागालँडमध्ये भाजपने विजयासाठी झोकून दिले. पण त्रिपुरात देवधर यांनी एकाकी खिंड लढवली. ‘त्रिपुरा’तील भाजप विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. आतापर्यंत देशाला भाजपला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे माहीत होती. मात्र, १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व असून ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे, असे सांगत शिवसेनेने देवधर यांचे कौतुक केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002