व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या खर्चाला आळा घालून वाचलेल्या रक्कमेतून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी येथील शिवसेनाप्रणित काळूबाई प्रतिष्ठानने राबविला आहे. शिवसेनेचे काळेवाडी विभागप्रमुख व काळूबाई प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सुधाकर नलावडे व सुनिता संधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह प्रतिष्ठान या गरीब विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवाअधिकारी संजय संधू, गौरव केरकर, प्रशांत तरवटे, किशोर भंगाळे, देवेन मोटवाणी, शुभम उनवणे, अखिल सबॉस्टीएन, अनिरुद्ध पालांडे, संस्थेचे प्रकल्प समनव्यक रवींद्र अंबोरे, सीईओ श्रद्धा देव, श्रुती जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काळूबाई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेट वस्तू संस्थेला देण्यात आल्या. तसेच या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख सुधाकर नलावडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्वप्रथम गोरगरीब रयतेचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य केले. त्यांच्या ‘रयत सुखी तर राज्य सुखी’ या धोरणाचे पालन आम्ही करत आहोत. मागील काही वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा खर्च टाळून आम्ही समाजातील अशाच शोषित, पीडित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. यामाध्यमातून महाराजांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीचे आम्ही पालन करत असून यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा मानस नलावडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संयोजन संजय संधू यांनी केले होते. काळूबाई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002