व्हीएस न्यूज - शिक्षणाची गुणवत्ता समाजातील सर्व घटकांवर अवलंबून असते. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी व पालक हे चार घटक एकत्रितपणे काम करून शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेऊ शकतात, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांनी केले.
इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित पदवीग्रहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माळी बोलत होते. विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्याना डॉ. माळी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. सत्यम सानप, डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सुरेश थरकुडे, स्वप्नाली सोनवणे, प्रा.योगिता शिंदे, श्रीकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माळी म्हणाले, शिक्षणाची इमारत ही चार खांबावर उभी असते, त्यातील विद्यार्थी हा एक प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करताना जिद्द, चिकाटी आणि अविरत परिश्रम घेणे गरजेचे असून, त्याशिवाय पर्याय नाही. आज नोकरी व व्यवसायिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती पात्रता धारण करून आपले ध्येय गाठले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वर्तमानातील ज्ञान ग्रहण केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपण प्राप्त केलेल्या पदवीचा जीवन जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असेही डॉ. माळी यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. बाळसराफ म्हणाले, प्रत्येक विध्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, त्याचा शोध घेऊन आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. शिक्षण आणि रक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना एकवेळ चांगली गोष्ट करता आली नाही, तरी चालेल; परंतु त्यांनी वाईट गोष्ट करू नये, असे आवाहनही डॉ. बाळसराफ यांनी केले.
दरम्यान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, मुकुंद खळदे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तम प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार डॉ. सत्यम सानप यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002