व्हीएस न्यूज – शिवसेनेने आता आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपला उंदीर घोटाळ्यावरुन फटकारले असून शेतकऱ्यासोबतच घोटाळेबाजांचाही उंदीर हा मित्र असल्याचे उघड झाले आहे. फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून पारदर्शक कारभाराचे ढोलही या उंदीर घोटाळ्याने फोडले आहे. राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले असून ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी भाजपची आहे. अन्यथा राज्यातील जनता पिंजरा लावून बसलीच आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उंदीर घोटाळ्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली आहे. मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’ झाल्याचा स्फोट एकनाथ खडसे यांनी केल्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली. कोणत्या हेतूने या घोटाळयाचा स्फोट खडसे यांनी केला हे त्यांनाच माहीत, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे कार्य करू शकतात, हे उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
मंत्रालयातील उंदरांचा राज्याच्या इतर भागातील उंदरांनाही हेवा वाटत आहे. त्यांची मंत्रालयात आपली निदान डेप्युटेशनवर नेमणूक व्हावी अशी इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समजते, असे सांगत शिवसेनेने भाजपला चिमटा काढला.
सरकारी कामकाजासंदर्भात ‘कागदी घोडे’ असा शब्द वापरला जातो. आता ‘कागदी उंदीर’ हा शब्द त्याची जागा घेईल, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही उंदीर घोटाळ्याने फोडले आहेत. तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत. मंत्रालयाची जमीन भुसभुशीत झाली असून मंत्रालयात धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना थारा दिला जात नसला तरी दलाल आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदरांच्या नावाने सरकारी तिजोरीतील ‘लोणी’ भलतेच ‘बोके’ खात असल्याचे आरोप भाजपचे लोकच करत आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय हे उंदरालय झाले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002