व्हीएस न्यूज - परीक्षा संपल्या की सुट्टीच्या कालावधीत गावाकडे जाण्यासाठी बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. यंदापासून परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार असल्यामुळे एप्रिलच्या मध्यावर दरवर्षी बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी सुरू राहणार आहेत.
दरवर्षी वार्षिक परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असते. पण हे वेळापत्रक यंदापासून बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १ मे पर्यंत पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. मुलांसाठी या कालावधीत विविध उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002