न्यायव्यवस्थेत सरकार आपल्या आवडीनुसार करतेय नेमणुका
नवी दिल्ली
2018-03-31
व्हीएस न्यूज –काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) लोकांना न्यायव्यवस्थेत नेमण्यासाठी न्यायव्यवस्थेवर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. या अगोदर भाजपने देशातील शिक्षण संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर संघाच्या प्रचारकांना नेमले आहे. ते आता संघाच्या प्रचारकांना किंवा तशी विचारसरणी असणाऱ्या लोकांना न्यायव्यवस्थेत नेमत आहेत.
माजी कायदामंत्री सिबल पुढे म्हणाले की, हे आम्हाला मान्य नाही आणि याचा आम्ही विरोध करू. जर गरज पडली तर आम्ही हा मुद्दा न्यायसंस्थेत देखील मांडू. देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला होत असून माध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायव्यवस्था नियंत्रणाबाहेर जात असल्याचे या सरकारला वाटत असल्यामुळे ते न्यायव्यवस्थेला नियंत्रित करण्याचा विचार करत आहेत. तसे जर झाले तर लोकशाही कमकुवत होईल. सिबल यांनीहे सांगताना सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या विधानाचीही आठवण करून दिली. सरकार न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करत असल्याचे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी नुकतेच म्हणत हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते.