विविध संस्था संघटनांतर्फे श्रद्धांजली
व्हीएस न्यूज - राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले, त्यांचा आधारवड गेला या शब्दात भाईंना श्रद्धांजली वाहण्यात आली .
कष्टकरी कामगार पंचायततर्फे पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे गुरूवारी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा गुप्ते, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, समाजवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदींनी श्रद्धांजली वाहिली.
बाबा कांबळे म्हणाले की, सत्याग्रहाचे बाळकडू भाई वैद्य यांच्याकडून मिळाले घरकुलधारक, कष्टकरी, पथारीवाले, रिक्षाचालक यांच्या चळवळीस मार्गदर्शन करणारा नेता आपल्यातून गेला आहे.
नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, पत्रकार संघातर्फे 33 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. या आयोजनात भाईंनी महत्वाची भूमिका बजावली तेव्हापासून भाईंशी स्नेह जुळला तो अखेरपर्यंत कायम राहिला असे सांगत भाईंच्या जाण्याने कष्टकऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करणारा, कार्यकर्त्यांना बळ देणारा, आयुष्यभर साधेपणा जपलेला लढवय्या नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. सचिन साठे म्हणाले की, भाईंचा जीवनप्रवास एक आदर्श आहे. राजकारण्यांची ढासळलेली नीतिमत्ता पाहता आज भाईंसारख्या नेत्यांची समाजाला गरज आहे. माडगूळकर म्हणाले की, समाजवाद कृतीत यावा, यासाठी भाई आयुष्यभर चंदनासारखे झिजले उभे जीवन कष्टकऱ्यांसाठी वेचले. यावेळी बळीराम काकडे, रमेश शिंदे, धर्मराज जगताप, मल्हार काळे, संभाजी गोरे, विजय ओव्हाळ, आशा कांबळे, नरेंद्र बनसोडे, शोभा शिंदे, हिरा जादव, रवी शेलार आदी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002