राज्यात मागील तीन महिन्यात ६९६ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
मुंबई
2018-04-17
व्हीएसन्यूज - शेतकरी आत्महत्यांचे राज्यात सत्र सुरुच असून राज्यात ६९६ शेतकऱ्यांनी या वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये आपले जीवन संपवले. याच काळात गेल्या वर्षी ६७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. म्हणजेच यावर्षी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्यांचे सत्र राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही सुरुच आहे. या आत्महत्या केलेल्या ६९६ शेतकऱ्यांपैकी केवळ २०६ म्हणजे २९ टक्के शेतकरीच शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढ झाली आहे. तर या यादीत विदर्भ अव्वल स्थानावर आहे. मराठवाड्यात २४४, विदर्भात ३२९, उत्तर महाराष्ट्रात १०१ आणि पश्चिम महाराष्ट्रात २२ शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च या काळात आत्महत्या केली.