व्हीएस न्यूज - केंद्रात व राज्यात भाजपा सेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाली. तर पिंपरी चिंचवड मनपात भाजपाला एक वर्ष झाले. एक वर्षापुर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आरोप करणारे भाजपा सेनेच्या पदाधिका-यांनी नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत बहुमताच्या जोरावर ‘वेस्ट टू एनर्जी’ सारखी कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचाराची कामे मंजूर करुन घेतली. त्यामुळे मतदारांमध्ये ‘वेस्ट ऑफ वोट’ची भावना निर्माण झाली आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी चिंचवड मनपाच्या मागील सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपो येथे उभारण्यात येणा-या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची निविदा भाजपाने बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतली. त्यानंतर भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी व शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी शहर प्रमुखांसमवेत पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प ‘वेस्ट टू मनी’ असल्याचा आरोप केला. यावर सचिन साठे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपामध्ये भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांवरुन शिवसेना भाजपमध्ये सुरु असणारा ‘कलगीतुरा’ म्हणजे ‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना झाली आहे. शिवसेना मनपामध्ये विरोध केल्याचे चित्र निर्माण करते व प्रत्येक वेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देते. देशात, राज्यात हे सत्तेचे भागीदार,मनपात टक्केवारीत हिस्सेदार. आता शिवसेनेने आंदोलन करायचेच असेल तर भाजपालाही बरोबर घेऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच जाऊन आंदोलन केले तरच कदाचित त्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदारांना व नगरसेवकांना खरोखरच हा प्रकल्प रद्द व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी ‘नाणार’ प्रकल्पाप्रमाणे ‘वेस्ट टू एनर्जी’प्रकल्प देखील पर्यावरण मंत्र्यांकडून रद्द करुन आणावा व नागरिकांचा विश्वास संपादन करावा.
65 वर्षांच्या इतिहासात कॉंग्रेस सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचेच कार्यकर्ते सत्तेसाठी उपोषणास बसले असे कधी घडले नाही. प्रभाग समित्यांवर आपली वर्णी लागली नाही म्हणून भाजपाच्या निष्ठावंतांनी केलेले आमरण उपोषण अवघ्या बारा तासातच गुंडाळले. तत्वांचे आणि शिस्तिचे गोडवे गाणा-या व ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद मिरविणारे सत्तेसाठी कोणत्या थराला जातील हे त्यांनी अवघ्या एक वर्षात दाखवून दिले आहे. लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणूकीपूर्वी मतदारांना दिलेले एकही आश्वासन भाजप सेनेला पुर्ण करता आले नाही. हे अपयश झाकण्यासाठी भाजप सेनेने केलेला हा ‘शो’ आहे. अशीही टिका साठे यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले पतमानांकन, महागाईचा उसळलेला आगडोंब, बेरोजगारीत झालेली वाढ, शेतक-यांच्या आत्महत्या, देशभर कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि शहरातील नागरिकांना भेडसावणा-या शास्तीकराच्या समस्या, अनधिकृत बांधकाम, रेझ झोन, बीआरटी, चौविसतास मुबलक स्वच्छ पाणीपुरवठा या समस्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक मतदारांसह देशभरातील मतदारांमध्ये आता ‘वेस्ट ऑफ वोट’ ची भावना निर्माण झाली असल्याचीही टिका साठे यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002