व्हीएस न्यूज - फेसबुक किंवा व्हॉट्सऍपवरील पोस्टला लाईक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमांचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम दिसत असले तरीही सकारात्मक उपयोग अधिक होत आहे, असे मत प्रसार माध्यमातील जाणकार शेफाली वैद्य यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले .
निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ ते ५ मे या कालावधीत ३४ व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प “सोशल मीडिया-संधी व आव्हाने” या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे, इंद्रायणी बँकेच्या संचालिका सुवर्णा झोळ, विनीता श्रीखंडे, अॅड. पद्मजा शिंदे, विनिता पाचरने, मिलिंद देशपांडे, सावरकर मंडळाचे अध्यक्ष एस.बी.पाटील, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, कार्याध्यक्ष विनोद बंन्सल, सचिव भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.
वैद्य पुढे म्हणाल्या की, ट्विटरच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट करून देण्याचा मार्ग सोशल मीडियात उपलब्ध झालेला आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी, पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री किंवा उच्चपदस्थ व्यक्ती ट्विट करून आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ट्विटरवर आलेल्या ट्टिटला रिट्विट करून त्याचे उत्तर अथवा प्रतिक्रियाही देण्याची व्यवस्था यात आहे. ट्विटरच्या माध्यमाने आलेल्या प्रतिक्रियेला अलीकडच्या काळात अधिक महत्व निर्माण झालेले आहे. त्यामुळे अनेक वेळा तात्काळ मदत उपलब्ध होऊन पुढील दुर्घटना टाळण्यास मदत होते. हे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. ट्विटरवर फोटो, व्हीडीओ क्लिप टाकण्याचीही व्यवस्था असल्याने फेसबुक,व्हॉट्सऍपप्रमाणे हेही अत्यंत लोकप्रिय माध्यम झालेले आहे.
हल्ली जगात कुठेही घडलेले अपघात, घातपात, हल्ले, बॉम्बस्फोट अशा कोणत्याही दुर्घटनांचं वृत्त त्या घडल्याच्या काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर येतं. ही बातमी कोण्या वार्ताहरानं केलेली आणि संपादकानं तपासून जबाबदारीनं दिलेली असतेच असं नाही. बहुसंख्य वेळा त्या घटनेमध्ये असलेल्या किंवा प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही बातमी पसरते. घटना अनुभवणारे किंवा प्रत्यक्ष पहाणारे त्यांना दिसणाऱ्या गोष्टी किंवा घटना पोस्ट करत राहतात. नेमकं काय घडत आहे आणि ते का घडत आहे याचा सर्वंकष विचार ते त्या क्षणी करू शकत असतातच असं नाही. त्यामुळे कुठेतरी काहीतरी भीषण घडलं आहे, घडत आहे हे सोशल मीडियावर लगेच पसरतं. परंतू त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. पण नेमकं काय घडलं आणि ते का हे समजण्यासाठी मात्र अनेक तुकड्यांमधली माहिती एकत्र जोडून पाहावी लागते किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहून एखाद्या जबाबदार वर्तमानपत्रात आलेलं वृत्तांकन वाचावं लागतं.
तंत्रज्ञान हे चांगलेच असते पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला. तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला. तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता कधी कधी लोकांच्या भावना भडकावण्यासाठीही केला जातो. याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत. हेही तितकेच खरे आहे. मात्र असे असले तरीही,सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, तो विधायक घटनांच्या बाबतीत शेअरिंग करणे होय.
अनुजा वनपाळ यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा बिबीकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा सांगळे यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002