व्हिएस न्यूज - चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात महापालिकेने घाई केल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाचे संयोजक अशोक मंगल यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे लोकार्पण सोमवारी झाले. परंतु लोकार्पण करताना महापालिकेने अतिघाई केली आहे. असे मंगल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले असून अनेक ठिकाणी अर्धवट कामे व राडारोडा पडला आहे असेही म्हटले आहे. व याच्या पुष्टयर्थ त्यांनी काही फोटो देखील पाठविले आहेत.
त्यांनी असे म्हटले आहे की, नव्याने सुरु झालेला हा उड्डाणपूल पाहण्यासाठी आम्ही गेलो. मात्र बऱ्याच ठिकाणी नवीन पुलाचे काम अपुरे असून राडारोडा पडलेला दिसून आला. त्यामुळे या वास्तूच्या उद्घाटनामुळे निर्माण झालेला आमचा उत्साह मावळला. ही कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करुन स्वच्छ व सुंदर उड्डाणपूल नागरिकांना द्यावा.
त्याचबरोबर काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता यामार्गावर या महत्वाच्या उड्डाणपुलाचे काम ऑटो क्लस्टरजवळ काही कंपन्याच्या इमारतीमुळे रखडले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण तयार आहेत. परंतु कंपनीच्या जागेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हा बीआरटी मार्ग कसा सुरु होणार, असा प्रश्न देखील अशोक मंगल यांनी उपस्थित केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002