व्हिएस न्यूज - भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांतील पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या यमुनानगर येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज गावच्या हद्दीत स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांचे पार्थिव दोन रुग्णवाहिकांमधून सकाळी त्यांच्या राहत्या घरी यमुनानगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अंत्यविधीसाठी निगडी परिसरातील नागरिक गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले असून अंत्यविधीला असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती.
आजोळी गेल्यामुळे बचावलेल्या या कुटुंबातील सदस्य विश्वराजच्या (वय 7) हातून या पाचही सदस्यांना अखेरचे पाणी देण्यात आले. तो आजोळी गेला असल्याने देवदर्शनसाठी गेला नव्हता. मात्र, त्याला आजी, आजोबा, आई, वडील आणि धाकटा भाऊ अभिराज सोडून केल्याने तो पोरका झाला आहे. तर, सर्वांना विश्वराजचे चुलत आजोबा सुभाष गायकवाड यांनी अग्नी दिला.
या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय30) व हेमलता प्रमोद गायकवाड (वय28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आई-मुलाला एकाच चितेवर अग्नी
शीतल गायकवाड आणि त्यांचा मुलगा अभिराज गायकवाड या दोन्ही मायलेकरांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांवर अंत्यसंस्कार करताना एकाच चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002