व्हीएस न्यूज - अखेर तब्बल साडे चार वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्तपुरवठा करतं त्या व्याजाचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे.
बँका ज्या दरानं आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) त्यांना 6 टक्के व्याज मिळेल. एप्रिल महिन्यामध्येच दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. आजच्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं व एकमतानं ही वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकांकडे सरकवतात. असा अनुभव आहे की सगळ्यात मोठी सरकारी बँक प्रथम व्याजदरात वाढ करते मग मागोमाग सगळ्या बँकांचे कर्जही महागते. जर का आत्तापर्यंतची ही प्रथा सुरू राहिली तर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व अन्य प्रकारची कर्जेही महागण्याची शक्यता आहे.
अर्थात, गेल्या आठवड्यातच स्टेट बँक, पंजाब नॅशनल व आयसीआयसीआय बँकेने प्रमाण कर्जाचा दर किंवा एमसीएलआर 0.1 टक्क्यांनी वाढवला होता व कर्ज महागत असल्याचे सूतोवाच केले होते. बहुतेक सर्व प्रकारची कर्जे या एमसीएलआरशी जोडलेली असतात, व त्यात होणारे बदल कर्जाच्या व्याजात किंवा हप्त्यात उमटतात. त्यामुळे एमसीएलआर किंवा प्रमाण दर वाढला की ईएमआय वाढतो. बुधवारच्या व्याजदर वाढीनंतर किती बँका हा प्रमाण दर वाढवतात व किती वाढवतात यावर कर्जे महाग होतील का व किती होतील हे ठरणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002