व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होत आहे, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात 30 सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी 21 सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणीही वाघेरे यांनी केली.
सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात 43 व्या क्रमांकावर फेकले गेले असून सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002