व्हीएस न्यूज - , ः ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळ्या जवळ आला आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले.
आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याचे आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस, पालखी सोहळा समन्वयक उदयसिंह भोसले, समन्वयक तहसीलदार रुपाली सरनौबत, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, विभाग प्रमुख संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, राजेश पवार, मंडलाधिकारी चेतन चासकर, शासकीय खात्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी समीर भूमकर या बैठकीस अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माउली मंदिरातून 6 जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात सुविधा उपलब्द करून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांत प्रसाद यांनी विविध विभाग प्रमुख आणि शासकीय खात्याचे अधिकाऱ्यांना दिले. दिलेल्या नियोजनाचे प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे सूचना त्यांनी केल्या.
सोहळ्यात नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा यंत्रणा, दर्शन बारी, पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिक तसेच परिसराची सुरक्षा यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले. पाण्याचे टॅंकर, वाहन प्रवेश, पार्किंग, अतिक्रमण कारवाई, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पास शिवाय वाहनांना प्रवेश देऊ नये असे प्रांत प्रसाद यांनी सांगितले.
भाविकांसाठी केरोसीन आणि इंधन, गॅस पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्याचे आदेश देण्यात आले. मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सर्व प्रकारची माहिती विभाग निहाय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 2 तारखेपर्यंत सर्व प्रकारची तयारी पूर्ण करून अंतिम आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
पाणी नमुने आणि उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच हॉटेल तपासणी करून दोषींवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्याचे सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. रस्ते भाविक आणि नागरिकांना खुले राहतील याची दक्षता परिषदेने घेण्यास यावेळी त्यांनी आदेश दिले. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घेण्याचे आदेश देत संपर्क यंत्रणा सुरु राहील यासाठी त्यांनी सुनावले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला.
स्वच्छता गृहांची स्वच्छता, शहराची स्वच्छता, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण यावर स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002