व्हीएस न्युज - पॉस्कोसारख्या घटनेत काही पत्रकार, छायाचित्रकार हे पीडित मुलीचे किंवा कुटुंबाचे फोटो घेतात. या कृत्यामुळे पोलिसही हैराण होतात. त्यामुळे बदलत्या कायद्याची जाण पत्रकारांना हवी, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिसंवादात व्यक्त केले.
चिपळूण येथील पत्रकारांच्या राज्यस्तरीय संमेलनात माध्यमांची विश्वासार्हता या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाचे अध्यक्ष विश्वास मेहेंदळे होते. परिसंवादात जतीन देसाई, समीरण वाळवेकर, नितीन केळकर, जयू भाटकर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले. प्रेक्षकात उपस्थित असलेल्या माधव भंडारींना आयत्यावेळी परिसंवादात सहभागी करून भाजपची सत्ता आल्यावर माध्यमांवरील सरकारचा दबाव वाढला आहे का, असा प्रश्न प्रसन्न जोशींनी विचारला. त्यावेळी आणीबाणीचा संदर्भ देऊन गळचेपी कोणी केली,असा उलट प्रश्न भंडारींनी केला.
नितीन केळकर यांनी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियापेक्षा आजची पिढी सोशल मीडियावर अधिक विश्वास ठेवते. योग्य, अयोग्य काय याची पडताळणीही ही पिढी करते, असे मत व्यक्त केले. ब्रेकिंग न्यूज दाखविताना वाहिन्यांनी ताळतंत्र सोडू नये,अन्यथा विश्वासार्हतेला तडा जातो असे मत समीरण यांनी मांडले. प्रबोधनात्मक कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून टीआरपी मिळत नसल्याची खंत प्रसन्न जोशींनी व्यक्त केली.
माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. परिसंवादात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना वादाचा प्रसंगही उद्भवला. मात्र अध्यक्ष विश्वास मेहेंदळेंनी विनोदी शैलीतून हे वाद थांबविले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002